मेट्रोमुळे एमयूटीपी ३ अ च्या प्रकल्पांचा होणार फेरविचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 01:13 AM2019-03-10T01:13:09+5:302019-03-10T01:13:26+5:30

३३ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; रेल्वे विकास महामंडळाला सूचना

RETIRED OF MUTP-3A projects due to Metro | मेट्रोमुळे एमयूटीपी ३ अ च्या प्रकल्पांचा होणार फेरविचार

मेट्रोमुळे एमयूटीपी ३ अ च्या प्रकल्पांचा होणार फेरविचार

Next

मुंबई : उपनगरीय रेल्वेचे स्वरूप बदलून टाकण्याची क्षमता असलेले इलिव्हेटेड रेल्वेचे दोन मार्ग फेरविचारांसाठी परत पाठवण्यात आले आहेत. मेट्रो आणि इतर प्रकल्पांमुळे हा फेरविचार करा,असे केंद्राने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला सुचविले आहे. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल आणि विरार-पनवेल या दोन मार्गांचे भवितव्य धूसर झाले आहे.

मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरातील भविष्यात होणाऱ्या मेट्रोच्या प्रकल्पांमुळे आणि इतर प्रकल्पांमुळे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५५ किमी लांबीचा सीएसएमटी-पनवेल जलद मार्गिका, ७० किमी लांबीचा विरार-पनवेल मार्गिका या प्रकल्पांवर फेरविचार करण्याच्या सूचना मंत्रिमंडळाकडून मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) या प्रकल्पाला शेवटच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. मात्र मूळ ५४ हजार ७७७ कोटी रुपयांपैकी ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक उपसमितीने मंजुरी दिली आहे.

हे दोन प्रकल्प आणि १९ वातानुकुलीत लोकल यांच्यावर आता नवीन सरकारचा निर्णय होईल. या प्रकल्पांच्या आड येणाऱ्या इतर प्रकल्पांचा अभ्यास करून त्यांना पुढील बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल सेवा, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि सीडकोची बेलापूर ते पनवेल व खारघर मेट्रो २ या प्रकल्पांमुळे सीएसएमटी ते पनवेल जलद मार्गावर कोणते परिणाम होऊ शकतात, याची माहिती घेण्यात येणार आहे. यासह विरार ते अलिबाग कॉरिडोर प्रकल्प व रेल्वेचे इतर नवीन प्रकल्पांमुळे येथील वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे पनवेल ते विरार मार्गिकेवर कोणता परिणाम होऊ शकतो किंवा या प्रकल्पांमुळे मुंबईकरांना फायदा होऊ शकतो का याचा विचार करण्यास उपसमितीने सांगितले. त्यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळ आता या प्रकल्पांचा पुन्हा अभ्यास करणार आहे.

मंजुरी मिळालेले प्रकल्प
गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गिकेचे विस्तारीकरण, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका आणि १९१ वातानुकूलित लोकल, बोरीवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका, कल्याण यार्ड नुतनीकरण, तिन्ही मार्गावर सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा, ११९ स्थानकांचे नुतनीकरण, लोकलची देखभाल व दुरूस्ती, स्टॅबलिंग लाईन्स, विद्युत पुरवठा आणि इतर तांत्रिक बाबी या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी ३३ हजार ६९० कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे. यासह हे प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होणार असल्याची अपेक्षा आहे.

कसे होते मूळ प्रकल्प ?
सीएसएमटी ते पनवेल जलद मार्गिका
एकूण ५५ किमी लांबीची जलद मार्गिका तयार झाल्यास सीएसएमटी ते पनवेल हे अंतर ५० मिनिटांत पूर्ण होईल.
या प्रकल्पाला १२ हजार ३०१ कोटी रूपये खर्च येणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईतील सांताक्रुझ आणि नवी मुंबई येथे तयार होणाºया विमानतळावर पोहोचण्यास सोयीस्कर होईल.
सध्या मेगाब्लॉकवेळी हार्बर मार्गिकेवर लोकल रद्द करण्यात येतात. जलद मार्ग झाल्यास या लोकल रद्द होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

पनवेल-विरार मार्गिका
देशाचा उत्तर-पश्चिमेकडील भाग आणि देशाचा दक्षिणेकडील भाग आणि कोकण रेल्वे यांना जोडण्यासाठी पनवेल-विरार-वसई रोड हा मार्ग सोयीस्कर होईल.
या मार्गिकेमध्ये एकूण २४ स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये ११ नवीन स्थानके उभारण्यात येणार असून १३ स्थानके सध्यस्थितीत आहेत.
या प्रकल्पासाठी ७ हजार ८९ कोटी खर्च येणार असून एकूण ७० किमी लांबीचा प्रकल्प आहे.
एमयूटीपी ३ मधील पनवेल-कर्जत प्रकल्प तयार झाल्यास डहाणू ते कर्जत प्रवास करणे सोयीचे होईल.

Web Title: RETIRED OF MUTP-3A projects due to Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.