एक रिक्वेस्ट... मैत्री... आणि विश्वासघात !

By मनीषा म्हात्रे | Published: February 9, 2018 02:04 AM2018-02-09T02:04:26+5:302018-02-09T21:49:04+5:30

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारली. दोघांची ओळख झाली. वृद्धापकाळात कोणीतरी विचारपूस करतोय.

A request ... friendship ... and betrayal! | एक रिक्वेस्ट... मैत्री... आणि विश्वासघात !

एक रिक्वेस्ट... मैत्री... आणि विश्वासघात !

googlenewsNext

मुंबई : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारली. दोघांची ओळख झाली. वृद्धापकाळात कोणीतरी विचारपूस करतोय. तसेच श्रीमंतीचे स्वप्न दाखवतोय म्हणून दोघांमधील संवाद वाढला. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला म्हणून एका निवृत्त शिक्षिकेला लाखोंचा फटका बसल्याची घटना पवईत उघडकीस आली. अशा सायबर गुन्ह्यांबरोबरच हत्या, लूट, जबरी चोरी, फसवणुकीच्या घटनांमध्ये वृद्ध सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. या घटनांमुळे वृद्ध मुंबईत असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
पवई हिरानंदानीतील उच्चभ्रू वसाहतीत ६० वर्षांच्या निवृत्त शिक्षिका रेखा (नावात बदल) पती आणि दोन मुलांसोबत राहतात. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांना देवेंद्र शर्मा नावाने फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्यात संवाद सुरू झाला. तो अमेरिका येथील बेलफास्ट शहरात कन्स्ट्रक्शन मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. मुंबईत लवकरच इमारत बांधकाम सुरू होणार असून त्यासाठी लोकांची गरज लागणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रेखा यांनी त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
अशातच ३ आॅक्टोबर रोजी शर्माने मुंबईला येत असल्याचे सांगितले. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर इंडनबर्ग ते लंडन व लंडन ते दिल्ली असे ब्रिटिश एअरवेज विमानाचे तिकीट पाठविले. अशात श्रीमंतीचे स्वप्न पाहणे सुरू असतानाच खणाणलेल्या फोनने रेखा यांची तारांबळ उडाली. दिल्ली विमानतळावरून फॉरेन विभागाची अधिकारी असल्याचे सांगून, देवेंद्र शर्माला ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्याच्याकडे आवश्यक प्रमाणपत्र नसल्याने ३८ हजारांचा दंड भरण्यास सांगितले. शर्मा याने मुंबईत आल्यावर पैसे देतो असे सांगितले. रेखा यांनी सांगितल्याप्रमाणे ३८ हजार रुपये भरले. त्यानंतर तासा-तासाने शर्माकडे विदेशी चलन, ड्रग्ज अशा विविध कारणांसाठी रेखा यांना ४ लाख १६ हजार रुपये भरण्यास सांगितले. एवढे पैसे भरूनही तेथून आणखी ६ लाख रुपये भरण्यास सांगितले. अखेर संशय आल्याने त्यांनी मंगळवारी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अशा अनेक वृद्ध रेखा हत्या, जबरी चोरी, लुटीसह आॅनलाइन विश्वातीत सायबर गुन्हेगारांच्या सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरापासून वृद्धांवरील अत्याचाराचा डोके
वर काढणारा आकडा चिंताजनक
ठरत आहे.
>ठोस कारवाई हवी... महाराष्ट्र वृद्धांसाठी सर्वाधिक असुरक्षित असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून समोर येत आहे. २०१६मध्ये राज्यात ४,६९४ गुन्हे दाखल झाले. त्यात मुंबईची परिस्थिती तितकीच भयावह होती. मुंबईत १ हजार २१२ गुन्ह्यांची नोंद झाली. आकडेवारीतली सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठांवरील सर्वाधिक हत्या महाराष्ट्रात घडल्या आहेत.
>एकटेपणातील सहानुभूती फसवतेय...
अनेक घरांमध्ये अडचण ठरत असलेल्या वृद्धांना एकटे सोडून मुले परदेशी स्थायिक झाली. वार्धक्यात पती-पत्नीनेही साथ सोडल्यानंतर असे अनेक वृद्ध एकटे असतात. यामध्ये फोनवर अथवा सोशल मीडियावर कुणाचेही सहानुभूतीचे बोल त्यांना हवेहवेसे वाटतात. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहे.
>घरात एकटे असताना अनोळखी व्यक्ती, सेल्समनला आत घेऊ नका.
जवळचे नातेवाईक अथवा मित्राची ओळख सांगून कोणी प्रवेश करीत असेल, तर त्याची खातरजमा करा.
नोकर, केअर टेकरवर संपूर्ण विश्वास ठेवू नका. त्यांच्यासमोर दागिने, पैसे बाहेर काढू नका.
गोपनीय माहिती शेअर करू नका.
अनोळखी व्यक्तीच्या फ्रेण्ड रिक्वेस्टची खातरजमा करा.
>मित्रासाठी वृद्ध वडिलांची हत्या : २७ जानेवारी - पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो म्हणून वडिलांनी मुलाच्या मित्राला झापले. ही बाब धाकट्या मुलाला समजताच त्याने मित्रासोबत घर गाठून ६५ वर्षांच्या वृद्ध वडील भीमा अर्जुन बरेडिया यांची हत्या केली. त्यांनी विल्हेवाट लावण्याच्या प्रतीक्षेत वडिलांचा मृतदेह सात दिवस चादरीत गुंडाळून ठेवला होता. विल्हेवाट लावण्यापूर्वीच पोलीस तेथे धडकले आणि धाकट्या मुलासह मित्राला बेड्या ठोकल्या.
>परिचारिकेने गमावले १७ लाख
५ फेब्रुवारी - सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या एका ६६ वर्षीय वृद्धेसोबत फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरून ओळख वाढवत गिफ्ट देण्याच्या बहाण्याने तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांना चुना लावला. त्या एका नामांकित रुग्णालयातील निवृत्त परिचारिका आहेत. या प्रकरणी एमएचबी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
>स्वस्त घर पडले महाग!
६ फेब्रुवारी - मालाडमधील ७४ वर्षीय वीणा सदारंगांनी यांना स्वस्त घर भलतेच महागात पडले. स्वस्त घराच्या आमिषाला बळी पडून ठगाने त्यांना ३३ लाखांचा गंडा घातला.
>सतर्क राहणे गरजेचे
आॅनलाइन व्यवहार करताना तसेच अनोळखी व्यक्तींसोबत ओळख करताना वृद्धांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कुणालाही गोपनीय माहिती शेअर करू नये. नवी ओळख झालेल्याने पैशांची मागणी केल्यास नकार देणे गरजेचे आहे. तसेच जिथे फसवणूक होतेय असे वाटत असेल तर सायबर पोलिसांशी संवाद साधा.
- अकबर पठाण,
पोलीस उपायुक्त, सायबर सेल, मुंबई

Web Title: A request ... friendship ... and betrayal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.