ट्रॅश ब्रुममुळे झाला पावसाच्या पाण्याचा जलद निचरा; पालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 02:54 AM2018-07-11T02:54:55+5:302018-07-11T02:55:12+5:30

पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने करण्यासाठी बांधलेले पंपिंग स्टेशन कचऱ्यामुळे बंद पडत होते. मात्र, यासाठी आणलेल्या ट्रॅश ब्रुमचा प्रयोग सफल झाला आहे.

 Rapid drainage of rain water due to trash bream | ट्रॅश ब्रुममुळे झाला पावसाच्या पाण्याचा जलद निचरा; पालिकेचा दावा

ट्रॅश ब्रुममुळे झाला पावसाच्या पाण्याचा जलद निचरा; पालिकेचा दावा

googlenewsNext

मुंबई : पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने करण्यासाठी बांधलेले पंपिंग स्टेशन कचऱ्यामुळे बंद पडत होते. मात्र, यासाठी आणलेल्या ट्रॅश ब्रुमचा प्रयोग सफल झाला आहे. लव्हग्रोव्ह व इर्ला पंपिंग स्टेशनवर बसविलेल्या या झाडूमुळे वाहून येणारा कचरा बाजूला होऊन पाण्याचा निचरा जलद गतीने होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
मुंबईत गेले चार दिवस सलग मुसळधार पाऊस सुरू आहे. या काळात अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबत आहे. या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी महापालिकेने मुंबईत पाच पंपिंग स्टेशन बांधले आहेत. मात्र गेल्या वर्षी कचरा अडकून पंपिंग स्टेशन बंद पडले होते. त्यामुळे ट्रॅश ब्रुम बसवून हा कचरा बाजूला करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार लव्हग्रोव्ह व इर्ला पंपिंग स्टेशनमध्ये हा प्रयोग करण्यात आला.
‘ट्रॅश ब्रुम’मुळे काही प्रमाणात वाहून येत असलेला कचरा अडविला जात आहे. परिणामी ८ व ९ जुलै रोजी अतिवृष्टीच्या काळात ७८२.४ कोटी लीटरहून अधिक पाण्याचा निचरा या उदंचन केंद्रांमधून करण्यात आला आहे. उदंचन केंद्रे चालू झाल्यापासून सर्वाधिक म्हणजेच २२ पंप हे गेल्या वर्षी पावसाळ्यात चालू झाले होते. मात्र या वर्षी अधिक पाऊस झाल्याने ९ व १० जुलै रोजी २८ पंप कार्यरत झाले. यामुळेच ४८ तासांच्या कालावधीत एकूण ७८२.४ कोटी लीटर एवढ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सक्षमपणे करण्यात आला असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पाच उदंचन केंद्रे कार्यरत
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू) या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच उदंचन केंद्रे कार्यरत आहेत.
या सर्व केंद्रांत एकूण ३७ पंप आहेत. या प्रत्येक पंपाची क्षमता ही प्रत्येक सेकंदाला सहा हजार लीटर पाण्याचा निचरा करण्याची आहे. याचाच अर्थ पाच उदंचन केंद्रांमधील ३७ पंपांची पाणी उपसा करण्याची अधिकतम क्षमता ही प्रत्येक सेकंदाला दोन लाख २२ हजार लीटर एवढी आहे.
उदंचन केंद्रांमधील पंपांमध्ये पावसाच्या पाण्यातून वाहून येणारा कचरा अडकल्यास हे पंप बंद पडतात, असा यापूर्वीचा अनुभव आहे. मात्र, या वर्षी महापालिकेच्या उपाययोजना व ‘ट्रॅश ब्रुम’मुळे कचरा अडविला गेला.

Web Title:  Rapid drainage of rain water due to trash bream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.