पोलीस महासंचालक कार्यालयातून राणीहार चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:48 AM2018-10-22T05:48:07+5:302018-10-22T05:48:15+5:30

राज्य पोलीस दलाच्या महासंचालक कार्यालयातूनच एका वरिष्ठ लिपिक महिलेचा राणीहार चोरीला गेला.

Ranvir stole from the DGP's office | पोलीस महासंचालक कार्यालयातून राणीहार चोरीला

पोलीस महासंचालक कार्यालयातून राणीहार चोरीला

Next

- मनीषा म्हात्रे 
मुंबई : राज्य पोलीस दलाच्या महासंचालक कार्यालयातूनच एका वरिष्ठ लिपिक महिलेचा राणीहार चोरीला गेला. कडेकोट सुरक्षा असताना मुख्यालयात चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस चक्रावले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून या राणीहार चोरी प्रकरणाचे गूढ कायम असून, कुलाबा पोलीस तपास करत आहेत.
पनवेल येथील रहिवासी असलेल्या अनिता आरेकर (२५) या पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. लग्नात आई-वडिलांनी त्यांना राणीहार भेट म्हणून दिला होता. गुरुवारी नवरात्रौत्सवानिमित्त पोलीस महासंचालक कार्यालयात त्या राणीहार घालून कामावर आल्या. मैत्रिणींसोबत सेल्फीचा आनंद लुटला. तोपर्यंत हार गळ्यातच होता. आपली ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले. तेथे लोकलच्या प्रतीक्षेत असताना गळ्यात राणीहार नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बॅग तपासली. मात्र, त्यात हार न मिळून आल्याने त्यांना धक्का बसला.
तेथून त्या पुन्हा मुख्यालयाच्या दिशेने फिरल्या. कार्यालय गाठून तेथील लॉकर तपासले. त्यातही हार नव्हता. निघताना शौचालयात गेल्यामुळे त्यांनी शौचालयात हाराचा शोध घेतला. तेथेही तो नव्हता.
दुसऱ्या दिवशी कामावर लवकर येऊन त्यांनी हाराचा शोध सुरू केला, अन्य सहकाºयांकडे चौकशी केली. सहकाºयांनाही हाराबाबत माहिती नसल्याने अखेर त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. शौचालयातूनच हा हार चोरीला गेल्याची तक्रार आरेकर यांनी दिली आहे.
>अद्याप कोणालाही अटक नाही!
कुलाबा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच शौचालयात अखेरचे कोण-कोण गेले? आदींमार्फत ते चोराचा शोध घेत आहेत. मात्र, आठवडा उलटत आला, तरी चोरापर्यंत पोहोचणे कुलाबा पोलिसांना शक्य झालेले नाही. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती कुलाबा पोलिसांनी दिली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत, तर एसीपी सुभाष खानविलकर हे रजेवर असल्याने त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.

Web Title: Ranvir stole from the DGP's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.