उलगुलान मोर्चाला मदत करणाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 09:51 PM2019-03-13T21:51:55+5:302019-03-13T21:59:26+5:30

सरकारच्या निषेधार्थ आदिवासी २४ मार्चला मुंबईवर धडकणार

Police notice to helpers of the Ulgulan Morcha | उलगुलान मोर्चाला मदत करणाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस

उलगुलान मोर्चाला मदत करणाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस

Next
ठळक मुद्दे५०० आदिवासी महिलांसह २४ मार्चला आझाद मैदान पोलिस ठाण्यावर धडकणार चार महिन्यांनंतर ५ मार्चला संबंधित विचारवंतांनी पुलवामा हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

मुंबई - आदिवासींच्या जमिनीसाठी ठाणे ते मुंबई निघालेल्या उलगुलान मोर्चाला मदत करणाऱ्या विचारवंतांना आझाद मैदानात पोलिसांनी चार महिन्यांनंतर नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी ५०० आदिवासी महिलांसह २४ मार्चला आझाद मैदान पोलिस ठाण्यावर धडकणार असल्याचे सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

आदिवासींना मदत करणाऱ्या शहरातील विचारवंतांवर गुन्हे दाखल करून मनोबल तोडण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रतिभा शिंदे यांनी केला. त्या म्हणाल्या की, आदिवासींनी हक्कासाठी २१ व २२ नोव्हेंबर २०१८ला ठाण्यापासून मुंबईपर्यंत काढलेल्या मोर्चात स्वत: पोलीस आयुक्तांसह सरकारचे मंत्री चालत होते. त्यावेळी कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा नोटीस प्रशासनाने दिली नाही. याउलट मुख्य सचिवांनी आदिवासींच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र चार महिन्यांनंतर ५ मार्चला संबंधित विचारवंतांनी पुलवामा हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी अचानक दंगलीचे कलम लावत पोलिसांनी संबंधितांना मोर्चाला मदत केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्या शिंदे यांचे नाव नोटीसमध्ये नाही. याचाच अर्थ संघटीतपणे सरकारला वठणीवर आणणाºया आदिवासी किंवा त्यांच्या नेत्यांवर कारवाई करता येत नसल्याने शहरात मदत करणाºया विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुुन्हे दाखल करून दबाव निर्माण केला जात असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.

या नोटीसमध्ये पत्रकार फिरोज मिठीबोरवाला, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती बडेकर, अफरोज मलिक, धनंजय शिंदे, स्मिता साळुंखे, सलिम अल्वारे आणि रवि भिलाने यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करा, किंवा आमच्याविरोधातही गुन्हे दाखल करा अशी मागणी करत शेकडो आदिवासी महिला आझाद मैदान पोलीस ठाण्यावर चालून येणार असल्याचे लोकसंघर्ष मोर्चाने स्पष्ट केले.

 

 

Web Title: Police notice to helpers of the Ulgulan Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.