ठळक मुद्दे९११ साली राजे पंचम जॉर्ज भारत भेटीवर आले असताना त्यांच्याहस्ते ऑपेराचे उद्घाटनही करुन घेण्यात आले. कोलकात्याचे मॉरिस बँडमन आणि जहांगिर फ्रेमजी कराका यांनी या ऑपेरा हाऊसची सर्व संकल्पना मांडून ती तडीस नेली.

  मुंबई- १८९६ साली युरोपाप्रमाणे मुंबईतही ऑपेरा हाऊस असावे असा विचार सुरु झाला आणि चर्नी रोड परिसरामध्ये रॉयल ऑपेरा हाऊसची बांधणी सुरु झाली. टप्प्याटप्प्याने इमारती बांधकाम, आतील फर्निचर आणि इतर कामे पूर्ण होत गेली. पण १९११ साली राजे पंचम जॉर्ज भारत भेटीवर आले असताना त्यांच्याहस्ते ऑपेराचे उद्घाटनही करुन घेण्यात आले. त्यानंतर इतर कामे सावकाश पूर्ण होत १९१६ साली सर्व ऑपेरा खऱ्या अर्थाने रसिकांच्या भेटीला तयार झाले.  कोलकात्याचे मॉरिस बँडमन आणि जहांगिर फ्रेमजी कराका यांनी या ऑपेरा हाऊसची सर्व संकल्पना मांडून ती तडीस नेली. ब्रिटीश अधिकाऱ्यांचे आणि युरोपियन नागरिकांसाठी विरंगुळयाचे ते केंद्र बनले. बरोक शैलीमध्ये बांधलेली ही वास्तू आजही तितकीच देखणी आहे.
   १९५२ साली गोंडल संस्थानच्या महाराजा विक्रमसिंहजी यांनी ऑपेरा हाऊस घेतले. कालांतराने ८० च्या दशकानंतर सिंगल स्क्रीन बंद करण्यात आले. प्रेक्षकांची बदलती रुची आणि बदलत्या काळामुळे ऑपेरामध्ये होणारा व्यवसायही कमी होत गेला आणि अखेर १९९३ साली ते बंद करण्यात आले. बंद केल्यानंतर गोंडलच्या सध्याच्या राजेसाहेबांच्या म्हणजे ज्योतिंद्रसिंहजींच्या मनामध्ये ते पुन्हा सुरु व्हावे अशी नेहमीच इच्छा होती. अखेर त्यास २००८ साली मूर्त स्वरुप आले. गेल्या वर्षी या ऑपेरा हाऊसची डागडुजी करुन सुशोभीकरण करण्यात आले.
हाऊसचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खालच्या बाजूस ठेवण्यात आलेले सहा फॅमिली बॉक्सेस. या बॉक्समध्ये कोचावर बसून सर्व कुटुंबाला नाटकाचा, ऑपेराचा आनंद घेता येत असे. आज अशी बॉक्सची सोय इतरत्र आढळत नाही. आॅपेरा हाऊसच्या दुरुस्तीमध्ये या बॉक्सेसचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. . डेव्हीड ससून यांच्या कुटुंबाने दोन नाजूक सुबक झुंबरे ऑपेरा हाऊसला भेट दिली होती. आजही ती तेथे पाहता येतात. या झुंबरांप्रमाणेच शेक्सपिअर, बायरन यांच्या चित्रांचीही दुरुस्ती करुन ती लावण्यात आली.  आता युनेस्कोचा पुरस्कार मिळाल्याने ऑपेराने मुंबईच्या मुकुटात मानाचा नवा तुरा खोवला आहे.

ऑपेरा, पारशी-गुजराती-मराठी नाटके आणि सिनेमाही..
सुरुवातीच्या काळात येथे केवळ ऑपेराच होत असत मात्र नंतर इतर संगित मैफिली, नाटकांनाही परवानगी देण्यात आली. गुजराती, पारशी, मराठी रंगभूमीवरची नाटके येथे होऊ लागली.  नाटकांबरोबर काही वर्षांनी येथे सिनेमे दाखवण्यात येऊ लागले. बºयाच सिनेमांचा नारळही याच ऑपेरा हाऊसमध्ये फुटला, त्यातील भरपूर सिनेमांनी सिल्व्हर ज्युबिलीही पाहिली. काही सिनेमांचे चित्रिकरणही येथे झाले होते.  मुघल-ए-आझम, दो आंखे बारह हाथ, हिमालय की गोद मे, पूरब और पश्चिम, अमर अकबर अँथनी सारखे सत्तरीच्या दशकापर्यंतचे बॉलीवूड गाजवणारे चित्रपट येथे लावले गेले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांची नाटकासाठी आॅपेरा हाऊसला विशेष पसंती होती. बरोक शैली कोठे उदयाला आली ?
बरोक ही शैली साधारणत: १६०० वर्षाच्या आसपास इटलीमध्ये उदयास आली. बरोक शब्द पोर्तुगीज शब्द बरोकोपासून आला असावा असे मानले जाते. कला, साहित्य, संस्कृती, चित्रे, नाट्य, संगीत यांची मांडणी करण्यासाठी या शैलीचा विशेष उपयोग केला जात असे. बरोक शैलीमधील चित्रे आणि शिल्पेही युरोपात अल्पावधीत प्रसिद्ध झाली आणि इटलीमधून या शैलीचा स्वीकार सर्व युरोपने केला. बरोकमध्ये बांधण्यात आलेली चॅपेल्स अत्यंत सुबक व सुंदर आहेत. इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटलीमध्ये नाट्यगृहासांठी बरोक शैली मोठ्या प्रमाणात वापरली गेली. व्हॅटिकन सिटीमधील सर्व जगात प्रसिद्ध असणारे सेंट पिटर्स बॅसिलिका, रोममधील चर्च ऑफ द गेसू, सँटा सुसाना, पोलंडमधील क्रॅकाव्ह येथील सेंट पीटर अँड पॉल, लंडनमधील सेंट पॉल्स कॅथिड्रल ही सर्व सुंदर चर्चेस बरोक शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे वॉर्सामधील विलॅनोव्ह राजवाडा, प्रागमधील ट्रोजा राजवाडा, वुडस्टॉकमधील ब्लेनहाईम राजवाडा, सेंट पिटर्सबर्गमधील पीथरॉह राजवाडा हे देखिल याच शैलीमुळे प्रेक्षणीय झाले आहेत. बरोक शैलीचे इटालियन, सिसिलियन, पोलिश, इंग्लिश, स्पॅनिश, सायबेरियन, युक्रेनियन असे उपप्रकारही आहेत.