'त्या' एका कुटुंबामुळे दीड कोटी धनगर अडचणीत; हायकोर्टाची निरीक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:07 AM2024-02-17T10:07:51+5:302024-02-17T10:08:25+5:30

'धनगड' समाजाचे एकही कुटुंब राज्यात नाही, या समाजाला फाटा देणारे छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब आहे

One and a half crores of money in trouble because of 'that' one family; Observations of the High Court | 'त्या' एका कुटुंबामुळे दीड कोटी धनगर अडचणीत; हायकोर्टाची निरीक्षणे

'त्या' एका कुटुंबामुळे दीड कोटी धनगर अडचणीत; हायकोर्टाची निरीक्षणे

मुंबई : राज्यात 'धनगड' समाजातील एकही कुटुंब नाही, हा धनगर समाजाचा व राज्य सरकारचा दावा छत्रपती संभाजीनगर येथील खिल्लारे कुटुंबीयांनी हाणून पाडला. या कुटुंबाच्या पूर्वजांनी 'धनगड' समाजाचे जात प्रमाणपत्र घेतल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे 'धनगर' ऐवजी 'धनगड' अशी चुकून नोंद केल्याचा बचाव 'धनगर' समाजाला घेणे अशक्य ठरणार आहे.

'धनगड' समाजाचे एकही कुटुंब राज्यात नाही, या समाजाला फाटा देणारे छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब आहे आणि ते कुटुंब धनगर समाजासाठी समस्या आहे, असे न्या. गौतम पटेल व न्या. कमल खटा यांच्या खंडपीठाने म्हटले. छत्रपती संभाजीनगर येथील भाऊसाहेब नामदेव खिल्लारे यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दावा केला आहे की, ते धनगर असून, भटके व विमुक्त जमातीतील आहेत. पण, खरी मेख येथे आहे, १९५२पासून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या शाळेच्या दाखल्यांवर व जातप्रमाणपत्रावर 'धनगड' असा उल्लेख आहे आणि त्याद्वारेच त्यांनी 'अनुसूचित जमाती' प्रवर्गातून आरक्षण घेतले आहे, असे न्या. पटेल यांनी निकालात नमूद केले आहे.

न्यायालयाची निरीक्षणे
• खिल्लारे यांच्या प्रतिज्ञापत्रामुळे प्रश्न पडण्याऐवजी आम्हाला उत्तर मिळाले. जात प्रमाणपत्र १९५२ पासून आहे. पण, कागदपत्रे नाकारण्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
• आता कागदपत्रे नाकारण्याचे कारण ते आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे देत असले तरी इतकी वर्षे ते घेत असलेल्या आरक्षणाच्या फायद्यामुळे एखादा गरजू त्याच्या अधिकारापासून वंचित राहात होता.
• खिल्लारे कुटुंबीयांनी २०२३च्या प्रतिज्ञापत्रात शाळेत प्रवेश घेतल्याची व शाळा सोडल्याची कागदपत्रे खोटी किंवा बनावट असल्याचे कुठेही नमूद केले नाही.
• जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने केलेल्या कारवाईला कायदेशीर आधार नाही. तसेच, १९५२-५३च्या कागदपत्रात छेडछाड केल्याचे आम्हाला पटत नाही. कारण कागदपत्रे आधीपासून आहेत आणि याचिका दाखल केल्यानंतर २०२३मध्ये खिल्लारे कुटुंबीयांनी जात प्रमाणपत्रे नाकारली आहेत. कारण, त्यांच्या जातीमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी समस्या निर्माण होणार आहे.

खिल्लारे कुटुंबीयांनी 'धनगड'वर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'धनगर' व 'धनगड' एकच समाज आहे, असा त्यांचा समज झाला आणि प्रमाणपत्रावरील नोंद चुकीची आहे.
• त्यामुळे त्यांनी 'धनगड' म्हणून मिळालेले जात प्रमाणपत्र नाकारल्याचेही न्यायालयाने राज्य सरकार व याचिकादारांच्या निदर्शनास आणून दिले.
• भाऊसाहेब खिल्लारे यांनी सक्षम प्राधिकरणाकडे आपण 'धनगड' नसून 'धनगर' समाजाचे असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
• भाऊसाहेब यांच्या आजोबांच्या व वडिलांच्या शाळेच्या प्रवेश अर्जावर व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'धनगड' जातीचा उल्लेख आहे.
• भाउसाहेब खिल्लारे यांच्या जात प्रमाणपत्रावरून त्यांच्या कुटुंबातील सर्वांना 'धनगड' जातीचे प्रमाणपत्र मिळाले असावे.
• त्यांचा शेती आणि मेंढ्या पालनाचा व्यवसाय आहे. सर्व कुटुंब एकाच गावात राहाते,' असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
 

Web Title: One and a half crores of money in trouble because of 'that' one family; Observations of the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.