बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:48 AM2023-11-04T08:48:29+5:302023-11-04T08:48:50+5:30

प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कंबर कसली

On Builder Radar, 97 construction notices in Malad | बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा

बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली असून मालाड पी- उत्तर विभागातील ९७ बिल्डर तसेच सरकारी प्रकल्प सुरू असलेल्या २७ बांधकामाच्या ठिकाणी उपाययोजना करण्यासंदर्भात इशारा देणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत. पालिकेने दिलेल्या मुदतीत प्रदूषण रोखणारी यंत्रणा उभी करावी, असे या नोटिशीत म्हटले आहे. 

प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आयुक्तांनी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार उपाय योजण्यासाठी १५ ते ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाडकाम सुरू आहे, त्या ठिकाणी आच्छादने उभारणे, धूळ उडू नये म्हणून पाण्याची फवारणी करणे, नव्या बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंकल, सीसीटीव्ही स्मॉग गन मशीन ठेवणे, बांधकामाभोवती विशिष्ट उंचीची पत्र्याची शेड उभारणे आदी उपाय योजण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पालिकेने दिलेली मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल. काही विभागांत मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांना थेट बांधकाम थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासंदर्भात पी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांनी ९७ बिल्डरांना नोटीस धाडली आहे. याबाबत सहायक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत बिल्डरांना इशारा देण्यात 
आला आहे. 
 अद्याप कुणालाही बांधकाम थांबवण्याची नोटीस देण्यात आलेली नाही. बिल्डरांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात यासाठी तूर्तास आम्ही इशारा देणाऱ्या नोटिसा पाठवल्या आहेत.

गोरेगाव मुलुंड लिंक रोड 
प्रकल्पाला नोटीस
 प्रकल्पाच्या ठिकाणी खोदकाम आणि चर पडण्यापूर्वी आवश्यक ती परवानगी घ्यावी, अशी नोटीस या प्रकल्पस्थळी पाठवण्यात आली आहे. 
 या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यास सांगण्यात आले आहे. रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिन्या विभागाची कामे जिथे सुरू आहेत तिथेही अशाच सूचना देण्यात आल्या आहेत.  
मार्बल दुकाने बंद
 प्रदूषण केल्याबद्दल अंधेरीतील काही मार्बलची दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले आहे. 
 या ठिकाणी मार्बल कापण्याचे काम होते. त्यातून बारीक पावडर उडते. हे प्रदूषण रोखण्यासाठी या ठिकाणी कोणतीही उपाययोजना नसते.

Web Title: On Builder Radar, 97 construction notices in Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.