मतदारयाद्यांचं ठरलं; महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत आयोगानं महत्त्वाचं पत्रक काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:37 PM2023-07-07T12:37:01+5:302023-07-07T13:13:17+5:30

राज्यात २६ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत

Now it's your turn, munciple elections in the state soon; The circular of the Maharashtra Election commission came forward | मतदारयाद्यांचं ठरलं; महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत आयोगानं महत्त्वाचं पत्रक काढलं!

मतदारयाद्यांचं ठरलं; महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत आयोगानं महत्त्वाचं पत्रक काढलं!

googlenewsNext

मुंबई -  राज्यातील राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाल्यानंतर आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे दिसून येते. गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या नगरपालिका, महापालिका आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसदर्भात निवडणूक आयोगाचे एक परिपत्रक समोर आले असून त्यामध्ये आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ५ जुलै २०२३ रोजीचा हा आदेश आहे. त्यामुळे, या परिपत्रकानंतर राज्यात सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात निवडणुका होतील, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. त्यावर, निवडणूक आयोगाने खुलासाही केला आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उप-सचिव सुर्यकृष्णमूर्ती यांच्या आदेशाचे हे पत्र असून १ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करणाऱ्या याद्यांसाठी वापरण्यात येतील, असे या आदेश पत्रात म्हटले आहे. त्यामध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका माहे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतील, असे संकेतही आयोगाने दिले आहेत. त्यामुळे, आता राज्यात लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार असून मतदारराजाला मतदानाची संधी मिळणार आहे.  

दरम्यान, राज्यात २६ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याव्यतिरिक्त ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळेच, मागील जवळपास २ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यातच, राजकीय मैदानात अनेक चौकार-षटकार, गुगली आणि विकेट्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य मतदारही निवडणुकांसाठी उत्सुक आहे. 

आयोगाचे स्पष्टीकरण

राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही,अस आयोगाने स्पष्ट केले आहे. मदान म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी १ जुलै २०२३ ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना ५ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Web Title: Now it's your turn, munciple elections in the state soon; The circular of the Maharashtra Election commission came forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.