नाशिकच नव्हे, पुण्यापर्यंत थेट लोकल हवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:26 AM2018-12-20T03:26:06+5:302018-12-20T03:26:21+5:30

मुंबईहून नाशिकला थेट लोकल सुरू करता येईल का, याची चाचणी घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.

Not only Nashik, you need local directly from Pune! | नाशिकच नव्हे, पुण्यापर्यंत थेट लोकल हवी!

नाशिकच नव्हे, पुण्यापर्यंत थेट लोकल हवी!

Next

मुंबईहून नाशिकला थेट लोकल सुरू करता येईल का, याची चाचणी घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. पूर्वी हा प्रयोग पुण्याच्या मार्गावर करण्यात आला होता. पण त्या वेळीही मध्य रेल्वेने त्यातील तांत्रिक अडचणी स्पष्टपणे समोर आणल्या नाहीत. आताही नाशिकसाठी चाचणी घेण्याचे जाहीर करताना आधीच्या अनुभवातील कोणत्या त्रुटींवर विचार केला आहे आणि या वेळी कोणते नवे प्रयोग केले जाणार आहेत, याचा तपशील जाहीर झालेला नाही, याकडे ‘लोकमत’च्या वाचकांनी लक्ष वेधले आहे. याचा तपशील जर जाहीर केला, तर त्यातून प्रवाशांसोबतच अन्य जाणकारही काही सूचना करू शकतील, असे वाचकांनी सुचवले आहे.

1सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या मुंबई-पुणे मार्गावर लोकल वाहतूक सुरू करण्यासाठी काही वर्षांपूर्वी चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली नसल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. लोकलला स्वत:च्या इंजिनाच्या क्षमतेवर खंडाळा घाट चढणे कठीण असल्याचे मत मांडण्यात आले. पुढे कर्जत-पुणे लोकल सुरू करण्यात आली. तिची एकच फेरी होते आणि तीही इतका वेळ घेते, की हा प्रवास कंटाळवाणा होतो. या प्रवासाचा वेळ वाचावा, त्याची गती वाढावी, यासाठी नंतर कोणतेच प्रयोग झाल्याचे दिसून आले नाही. ज्या काळी हे प्रयोग झाले तेव्हा मध्य रेल्वेवर डीसी वीज प्रवाहावर चालणाऱ्या जुन्या चॉकलेटी रंगाच्या लोकल होत्या. नंतरच्या काळात एसी वीज प्रवाहावर चालणाºया सीमेन्स आणि आता बम्बार्डियर लोकल ताब्यात आहेत. त्यांच्या इंजिनांची क्षमता चांगली आहे. त्या वजनानेही हलक्या आहेत. बांधणीतही बरेच प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या लोकलसह जर नव्याने या मार्गावर चाचणी झाली, तर मुंबईहून लोकलने थेट पुणे गाठणे शक्यही होईल, याकडे ‘लोकमत’च्या वाचकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मध्य रेल्वेच्या बांधणीतील मेधा लोकलचाही त्यासाठी वापर करून घेता येईल.

2मुंबई-पुणेदरम्यान मुख्य मार्गावरून धावणाºया गाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. प्रगती एक्स्प्रेस पनवेल-कर्जतमार्गे जाते. तर इंद्रायणी एक्स्प्रेस सोलापूरपर्यंत वाढवण्यात आल्याने त्यातील गर्दी वाढली आहे. डोंबिवली, कल्याणच्या प्रवाशांना इंटरसिटीचा काहीच उपयोग नाही. डेक्कन क्वीनही मुंबईतून पकडावी लागते. डेक्कन एक्स्प्रेस पकडली, तर प्रवासाचा वेळ वाचत नाही. अशा स्थितीत थेट लोकल वाहतूक सुरू झाली, तर प्रवाशांना दिलासा मिळेल. अगदी कर्जत-पुणे प्रवासाचा वेळ वाचला, गती वाढली तरी या शटल सेवेच्या फेºया वाढवता येतील. पण दीर्घकाळ मध्य रेल्वेने त्याबाबत काहीच केलेले नाही. नाशिकच्या प्रयोगानिमित्ताने ते करण्याची गरज आहे.

3मुंबईहून नाशिकला जायचे असेल तर कसाºयाहून जाणे सोयीचे पडते. पण अर्धा प्रवास लोकलचा आणि अर्धा बस किंवा मोडकळीस आलेल्या टॅक्सीचा अशी अवस्था असते. नाशिक रोडपर्यंत थेट गाड्या वाढल्या, तर तेथील प्रवाशांची सोय होईल. गेल्या काही वर्षांत मुंबईहून थेट नाशिकला जाणाºया गाड्यांची संख्या घटत गेली आहे. त्यांचा प्रवास वाढवण्यात आला आहे. त्यामुळे लोकलच्या चाचणीचा प्रयोग यशस्वी झाला, तर त्याचा या भागातील प्रवाशांना फायदाच होईल.

4पण हा प्रयोग करण्यापूर्वी घाटातून लोकल वाहतुकीत येणारे अडथळे, त्यातील अडचणी, त्यावर उपलब्ध असलेले तोडगे, सध्या केला जाणारा प्रयोग, त्यात कशाकशाचा विचार केला आहे याचा तांत्रिक तपशील मध्य रेल्वेने जाणकारांसाठी उपलब्ध करून दिला, तर त्याचा उपयोगच होईल. ही चाचणी झाल्यावर तिची आणि पुण्याच्या आधीच्या चाचणीची तुलनाही उपलब्ध करून द्यायला हवी. तरच मुंबईहून पुणे, नाशिकचा रेल्वे प्रवास आवाक्यात येईल. तो सुलभ, वेगवान, सोयीचा आणि स्वस्तही होईल.

नाशिकपर्यंत खरेच धावेल का लोकल?
मुंबई उपनगरीय लोकल नाशिकपर्यंत धावेल का हा प्रश्न जरी गहन असला तरी आजच्या आधुनिक युगात सर्व काही शक्य आहे. तथापि रेल्वे प्रशासन जो प्रकल्प आखते त्याची नियोजन पद्धत फार दयनीय आहे. सर्वेक्षण, नीती आयोग, सुरक्षा प्रमाणपत्र, रेल्वे बोर्डाची परवानगी अशा सर्व गोष्टीत वेळ जातो. परिणामी प्रकल्पाचा खर्च वाढल्याने आणि झालेल्या विलंबामुळे प्रकल्प लांबला जातो. अशा सर्व गोष्टीचा विचार करता डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग जो प्रकल्प सर्व्हे होऊनही रखडवला गेला आणि त्यादृष्टीने जर पाहिले तर मुंबई-नाशिक लोकल सुरू करण्याऐवजी जर डहाणू-नाशिक मेमू गाड्या सुरू केल्या तर थेट प्रवास साधता येईल. तसेच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे एकमेकास जोडले जाऊन सर्वच रेल्वे प्रवाशांना फायदेशीर ठरेल...!
- दयानंद पाटील, सचिव -डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

लोकल नजीकच्या
काळात तरी अशक्य
मुंबई - पुणे - नाशिक हा औद्योगिक त्रिकोण एकमेकांना जोडण्यासाठी, जलद गतीने प्रवास व्हावा यासाठी अनेक दळणवळणाची साधने उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक चौपदरीकरण हे रस्ता मार्ग सध्या कार्यान्वित आहेत. तर नाशिक - पुणे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आता या शहरांना रेल्वेने देखील लोकल सेवेने जोडण्याची संकल्पना पुढे आली आहे. बºयाच वर्षांपूर्वी मुंबई - पुणे अशी लोकल सेवा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात आली. मात्र खंडाळा घाटातील मोठा अडथळा दूर न झाल्याने ती योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. आता नवीन बांधणीच्या लोकल उपलब्ध झाल्यानंतर परत एकदा नाशिक - कल्याण मार्गावर लोकल ट्रेन चालविण्यासाठी चाचणी करण्यात येत आहे. पण यातील मुख्य अडथळा हा कसारा घाटाचाच ठरणार आहे. शिवाय घाटातील संभाव्य अपघातांचा विचार करून, दरवाजावर लटकणाºया प्रवाशांचा विचार करून स्वयंचलित दरवाजे असलेल्याच लोकल चालवाव्या लागतील. तसेच कल्याण येथील नियोजित टर्मिनल परिचालित झाल्याशिवाय, आणि कल्याण - कसारा अतिरिक्त मार्ग टाकल्याशिवाय हे शक्य नाही. कारण अगोदरच या मार्गावरून सध्याच उत्तर भारतात होणाºया वाहतुकीचे परिचालन करण्यातच रेल्वेला फार मोठी कसरत करावी लागत आहे. या भागातील प्रवाशांची मागणी आणि गरज असताना देखील सद्यस्थितीत अतिरिक्त लोकल सेवा रेल्वे देऊ शकत नाही. लोकल रेकची उपलब्धता तसेच त्यांचे परिचालन करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची देखील गरज आहे. तेव्हा जरी चाचणी यशस्वी झाली तरी, सध्यातरी कल्याण - नाशिक अशी लोकल सेवा परिचालित होईल अशी शक्यता वाटत नाही.
- अनंत बोरसे, शहापूर

Web Title: Not only Nashik, you need local directly from Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई