मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे बळकट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:23 AM2019-02-12T02:23:16+5:302019-02-12T02:23:29+5:30

मुंबईतील नदी, नाले आणि समुद्रात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे बळकट करण्यासाठी महापालिकेने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.

The network of Malinisaran channels will be strengthened in Mumbai | मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे बळकट होणार

मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे बळकट होणार

Next

मुंबई : मुंबईतील नदी, नाले आणि समुद्रात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे बळकट करण्यासाठी महापालिकेने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पंपिग स्टेशन आदी प्रकल्पांचे तीन टप्प्यांमध्ये काम सुरू आहे. यासाठी ८६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०३० पर्यंत मलनिस्सारण वाहिन्यांचे काम पूर्ण होणार आहे.
मुंबईत सध्या २००६ कि़मी. लांबीचे मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे आहे. त्याद्वारे ८३ टक्के विकसित भागासह मुंबईच्या एकूण ६३ टक्के लोकसंख्येला मलनिस्सारण सुविधा दिली जात आहे. मुंबईकरांना शंभर टक्के मलनिस्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम (एमएसआयपी) २०१६ पासून हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ९४ कि़मी. लांबीच्या मलजल वाहिन्या टाकण्यात येणार होत्या. यापैकी ३३ कि़मी. वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यासाठी ३८५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. २०२३-२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
दुसऱ्या टप्प्यात विकाय नियोजनातील अविकसित रस्ते आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यांमध्ये १४३ कि़मी. लांबीच्या मलजल वाहिन्या टाकण्याच्या कामांचा समावेश आहे. त्यानुसार विकासकांना दहा कि़मी. लांबीच्या विकास नियोजन रस्त्यांवर मलजल वाहिन्या टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर तिसºया टप्प्यात सध्या झोपडपट्टी विभागातून नाल्यांमार्फत थेट समुद्रामध्ये जाणाºया मलजलास अटकाव करून ते मलनिस्सारण प्रणालीमध्ये आणून मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे.

सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प
गेली १४ वर्षे लांबणीवर पडलेल्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाला वेग देण्यात येणार आहे. त्यानुसार वरळी, घाटकोपर, कुलाबा, भांडुप, वांद्रे आणि मालाड, धारावी येथील प्रकल्पाची दर्जोन्नती होणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १४ हजार कोटी रुपये आहे. सध्या २४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: The network of Malinisaran channels will be strengthened in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई