नाणार प्रकल्पाची अधिसूचना अखेर रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 05:57 AM2019-03-03T05:57:05+5:302019-03-03T06:03:15+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेची अट भाजपाने मान्य केल्यानंतर बारा दिवसांच्या आत त्यासंबंधीच्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली.

Nanar project notification canceled | नाणार प्रकल्पाची अधिसूचना अखेर रद्द

नाणार प्रकल्पाची अधिसूचना अखेर रद्द

Next

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेची अट भाजपाने मान्य केल्यानंतर बारा दिवसांच्या आत त्यासंबंधीच्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. राजकीय युतीसाठी शासकीय निर्णय झाला आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांना सांगितले की, या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची सही झाली, आता नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही. प्रकल्पासाठीची जमीन विनाअधिसूचित करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून लवकरच राजपत्रात (गॅझेट) ती प्रकाशित केली जाईल.
१८ फेब्रुवारीला भाजपा-शिवसेना युतीची घोषणा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली तेव्हा हा प्रकल्प जिथे स्थानिक जनतेचा विरोध नसेल अशा ठिकाणी नेला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. युती करताना शिवसेनेची प्रमुख अट नाणार प्रकल्प रद्द करा अशी होती. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती.
सुभाष देसाई यांनी पत्रकारांना सांगितले की, स्थानिकांनी भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला होता. १४ ग्रामपंचायतींनी प्रकल्पाच्या विरोधात ठरावही मंजूर केला होता. त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला मी स्थगिती दिली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रकल्प नको, अशी मागणी केली होती. त्यानुसार युतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प तेथे होणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानुसार मूळ भूसंपादनाची अधिसूचना विनाअधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. त्याबाबतचा प्रस्ताव आपल्या खात्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठविला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सही केली आहे.
हा प्रकल्प रद्द झाला असला तरी राज्यातील गुंतवणुकीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकचेच राज्य असल्याचेही देसाई म्हणाले. तसेच प्रकल्पाला आमचा विरोध नाही. स्थानिक जनता या प्रकल्पाचे जेथे स्वागत करेल तेथे तो नेला तर आमची काहीच हरकत नसल्याचेही ते म्हणाले.
कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा
नाणारमध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसीचा शिक्का बसल्याने त्यांना जमिनीवर कर्ज मिळत नव्हते. मात्र आता विनाअधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
नाणारचा विषारी राक्षस घालवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. कोकणातील जनतेच्या एकजुटीचा आणि संघषार्चा हा विजय असून सरकारला लोकभावनेचा आदर करावाच लगला, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने विकासाला कधीच विरोध केला नाही. नाणारसारखे प्रकल्प निसर्ग, पर्यावरण, शेती, फळबागांचा विध्वंस करतील व त्या विरोधात कोकणची जनता उभी राहिली. शिवसेनेने कोकणी जनतेला साथ दिली. नाणार प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही न्यावा. प्रकल्पाला विरोध असण्याचे कारण नाही. या प्रकल्पाचे कोणी स्वागत करणार असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण लोकांचा विरोध असेल तर शिवसेना नक्कीच लोकांबरोबर राहील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला.

>धनिकांना चाप बसविणार
नाणारच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या आसपास काही बाहेरच्या धनिकांनी स्थानिकांकडून कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे भविष्यात अन्य ठिकाणी प्रकल्पाची अधिसूचना निघाल्यानंतर जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ नयेत. मोबदला स्थानिक गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी कायद्यात बदल करण्याचे सुचविणार असल्याचेही सुभाष देसाई यांनी सांगितले.

Web Title: Nanar project notification canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.