नालासोपारा स्फोटक प्रकरण : नाशिक, जळगावमध्येही होता घातपाताचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:07 AM2018-09-10T05:07:13+5:302018-09-10T05:07:27+5:30

नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय उर्फ भैया उखर्डू लोधी यांचा नाशिक आणि जळगावमध्ये घातपाताचा कट असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासातून उघड झाली.

Nalasopara explosive case: Nashik, Jalgaon also cut off the attack | नालासोपारा स्फोटक प्रकरण : नाशिक, जळगावमध्येही होता घातपाताचा कट

नालासोपारा स्फोटक प्रकरण : नाशिक, जळगावमध्येही होता घातपाताचा कट

Next

मुंबई : नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय उर्फ भैया उखर्डू लोधी यांचा नाशिक आणि जळगावमध्ये घातपाताचा कट असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासातून उघड झाली. दोघांकडून तीन गावठी बॉम्ब, दोन कार, सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दोघांनीही राज्यभरातील विविध ठिकाणांची रेकी केल्याचे या तपासात समोर आले. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर यांच्या चौकशीतून जळगावच्या साकळी गावातील सूर्यवंशी आणि लोधीचे नाव समोर आले. त्यानुसार, एटीएसच्या पथकाने जळगावमध्ये मोर्चा वळवला. दोघांवरही पाळत ठेवली. दोघांच्याही हालचाली स्पष्ट होताच, गुरुवारी सूर्यवंशी तर शुक्रवारी लोधीला ताब्यात घेत, शनिवारी अटक केली. सूर्यवंशीच्या घरातून डीव्हीडी, सीडी, पाच पॉकेट डायरी, सीम कार्ड असलेल्या मोबाईलसह गॅरेजमधून दोन कार आणि सहा बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. ही वाहने चोरीची असल्याचा संशय एटीएसला आहे.
लोधीच्या घरातून तीन गावठी बॉम्ब, स्फोटाचे साहित्य, सीम कार्ड असलेले दोन मोबाईल, चार पेन ड्राईव्हसह दोन नंबर प्लेट सापडल्या. एटीएसने गावठी बॉम्ब जप्त करुन बॉम्बशोधक व नाशक विभागाकडे (बीडीडीएस) तपासणीसाठी दिले होते. प्राथमिक तपासणीत सकारात्मक अहवाल आला.
स्निफर श्वानानेही हे बॉम्ब असल्याचे ओळखल्यानंतर हे पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. बीडीडीएसचा अहवाल आणि दोन्ही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी रात्री दोघांनाही अटक करण्यात आल्याचे आल्याचे एटीएसने न्यायालयात स्पष्ट केले. रविवारी दुपारी कोठडीसाठी त्यांना सुट्टीकालीन विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्यांच्या चौकशीत नाशिक आणि जळगावमध्ये त्यांचा घातपाताचा कट असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. शिवाय, हिंदू संस्कृती-परंपरांविरोधातील व्यक्ती, त्यांचे विडंबन करणारे चित्रपट, तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे या आरोपींच्या टार्गेटवर होते. त्यांनी अन्य आरोपींच्या मदतीने त्यांना संपविण्याचा कट आखला. तसेच काही ठिकाणांची रेकीही केली होती. त्याबाबतची माहिती सीडी, डीव्हीडीच्या तपशीलातून स्पष्ट होत आहे. त्यांच्या अधिक चौकशीसाठी न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
>दुचाकी पुरवल्याचा एटीएसला संशय
सूर्यवंशी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपींना गुन्ह्यासाठी मोटारसायकल पुरविल्याचा संशय एटीएसला आहे. त्या दिशेनेही अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Nalasopara explosive case: Nashik, Jalgaon also cut off the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.