पूरमुक्त मुंबईसाठी पालिका सरसावली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 05:58 AM2018-08-05T05:58:07+5:302018-08-05T05:58:17+5:30

काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरत नसल्याने, प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या नवीन ठिकाणांचा शोध लागत असल्याचा दावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला होता.

Municipality Sarsawali for flood-hit Mumbai | पूरमुक्त मुंबईसाठी पालिका सरसावली

पूरमुक्त मुंबईसाठी पालिका सरसावली

googlenewsNext

मुंबई : काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरत नसल्याने, प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या नवीन ठिकाणांचा शोध लागत असल्याचा दावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला होता. अशी ठिकाणे शोधून त्या परिसरांना पूरमुक्त करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यापैकी १०५ ठिकाणी पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. मात्र, यात सहा हजार २०८ एवढी बांधकामे बाधित होणार आहेत. त्यामुळे हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होत असल्याने, सखल भाग पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशा २२५ पैकी १२० ठिकाणी उपाययोजना केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद गतीने झाला. त्यामुळे उर्वरित १०५ सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन, हे परिसर पूरमुक्त होण्यासाठी पावसाळ्यानंतर म्हणजेच आॅक्टोबरपासून कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी या परिसरांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
त्यानुसार, या परिसरांना पूरमुक्त करण्यापूर्वी सहा हजार २०८ बांधकामांवर कारवाई होणार आहे.
पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेले प्रयोग
फितवाला लेन व सेनापती बापट मार्गाच्या जंक्शनजवळील १.६ मीटर ७ १.२ मीटर आकाराच्या जुन्या बॉक्स ड्रेनचे रूपांतर २.६ मीटर ७ १.२ मीटर आकाराच्या बॉक्स ड्रेनमध्ये करण्यात आले आहेत.
एल्फिन्स्टन स्टेशनजवळील ९०० मिमी व्यासाच्या पर्जन्यजल वाहिनीचे रूपांतर २.५ मीटर ७ १.६ मीटर एवढ्या आकाराच्या बॉक्स ड्रेनमध्ये करण्यात आले आहे.
टेक्सटाईल मिल नाल्यातील पाण्याच्या प्रवाहास अडथळा ठरणाऱ्या ७० झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.
उपाययोजनांची आखणी
उपाययोजना राबविताना शहर भागातील १,७०२, पूर्व उपनगरांमधील ३,१३४, तर पश्चिम उपनगरातील १,३७२, यानुसार एकूण सहा हजार २०८ एवढी बांधकामे बाधित होणार आहेत.
या परिसरांना पूरमुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून १६ कार्यादेश देण्यात आले आहेत, तर ६१ निविदांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कामांचे कार्यादेश सप्टेंबर अखेरपर्यंत देण्यात येतील.
हे परिसर पूरमुक्त करण्यासाठी या सर्व ठिकाणी पाणी साचण्यामागच्या कारणांचे मूळ शोधून सखोल अभियांत्रिकीय अभ्यास करण्यात आला. त्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
>पुनर्वसन करणार
बाधित होणारी बांधकामे अनधिकृत व अधिकृत असून अधिकृत लोकांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. मात्र, येथील लोकांनी पुनर्वसनास नकार दिल्यास, पूरमुक्त मुंबईसाठीच्या उपाययोजनांचे हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Municipality Sarsawali for flood-hit Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर