मुंबईकरांनो, उकाडा वाढला; उष्माघातापासून सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:53 AM2019-05-09T06:53:12+5:302019-05-09T06:53:25+5:30

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राएवढ्या कमाल तापमानाचा सामना मुंबईकरांना करावा लागत नसला तरीदेखील येथील बदलते वातावरण, कडक उन्हामुळे मुंबईकर त्रासले आहेत.

 Mumbaikars, Ukada grew; Beware of heat! | मुंबईकरांनो, उकाडा वाढला; उष्माघातापासून सावधान!

मुंबईकरांनो, उकाडा वाढला; उष्माघातापासून सावधान!

Next

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राएवढ्या कमाल तापमानाचा सामना मुंबईकरांना करावा लागत नसला तरीदेखील येथील बदलते वातावरण, कडक उन्हामुळे मुंबईकर त्रासले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना उष्माघातापासून काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर स्थिर असले तरीदेखील दिवसासह रात्रीच्या हवेतील वाढता उकाडा मुंबईकरांना नकोसा झाला आहे. विशेषत: दुपारच्या वेळी वाहत असलेले उष्ण वारे आणि तापदायक सूर्यकिरणांमुळे उकाडा वाढला असून मुंबईकर घामाघूम होत आहेत. असे तापदायक वातावरण उष्माघातासारख्या विविध आजारांना आमंत्रण देत असल्याने मुंबईकरांनी वेळीच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
चंद्रपूरला रेड अलर्ट
९ मे रोजी विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या दिवशी चंद्रपूरमध्ये कमाल तापमान नेहमीच्या तुलनेत अधिक नोंदविण्यात येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

या गोष्टींना प्राधान्य द्या
पुरेसे पाणी प्या.
सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट, चप्पल वापरा.
प्रवास करताना पाणी प्या.
घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
डोके, गळा, चेहरा पुसण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
छत्रीचा वापर करा.
अशक्तपणा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक प्या.
प्राण्यांना सावलीत ठेवा. पुरेसे पाणी द्या.
थंड पाण्याने आंघोळ करा.

हे करू नका
दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका.
मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका.
उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.

मुंबई, आसपासच्या परिसरासाठी अंदाज\
९ आणि १० मे : आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यासाठी इशारा
९ मे : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
१० मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
११ आणि १२ मे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

Web Title:  Mumbaikars, Ukada grew; Beware of heat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.