Mumbai-Pune Expressway breathed freely, due to frequent vacations, three-day traffic movement | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास, सलग सुट्टयांमुळे तीन दिवस होती वाहतूक कोंडी

लोणावळा - सलग सुट्टयांमुळे वाहतुक कोंडीने बेजार झालेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज सकाळी पहायला मिळाले. मागील दोन दिवस द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने यंत्रणा हतबल तर वाहनचालक व पर्यटक नागरिक बेजार झाले होते.

शनिवार, रविवार व सोमवार हे तीन दिवस सलग सुट्टयां आल्याने पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता लाखोंच्या संख्येने पर्यटक वेगवेगळ्या पर्यटनस्थळांकडे निघाले. यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गासह, गोवा हायवे, नाशिक हायवे, सातारा हायवे, कोल्हापुर हायवे हर सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तर खालापुर टोलनाका ते खंडाळा एक्झिट पर्यत पुणे मार्गीकेवर वाहनांची गर्दीच गर्दी झाल्याने ही कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान यंत्रणांच्या समोर उभे राहिले होते. याकरिता रविवारी मुंबईकडे जाणारी वाहने तासभर रोखून धरत सर्व मार्गीका पुण्याकडे येणार्‍या वाहनांकरिता खुल्या केल्या जात होत्या. याकरिता एक एक तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. रात्री उशिरा खंडाळा घाटातील वाहनांची कोंडी संपली व आज सकाळपासून द्रुतगती मार्गाने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र पहायला मिळाले. अमृतांजन पुल परिसरातील तिव्र चढणीवर काहीशी रांग दिसत असली तरी आज कोठेही कोंडी नसल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.