मुंबई पोलिसातील 'बजरंगी भाईजान', बेपत्ता मुलीला 8 दिवसांत शोधून काढलं!    

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 11:47 AM2018-12-28T11:47:14+5:302018-12-28T12:23:46+5:30

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमातील सुपरहिट आणि हृदयाला स्पर्श करणारी भावनिक कहाणीशी मिळती-जुळती घटना वास्तविक आयुष्यातही घडली आहे.

mumbai police bajrangi bhaijan who found missing child after eight days | मुंबई पोलिसातील 'बजरंगी भाईजान', बेपत्ता मुलीला 8 दिवसांत शोधून काढलं!    

मुंबई पोलिसातील 'बजरंगी भाईजान', बेपत्ता मुलीला 8 दिवसांत शोधून काढलं!    

ठळक मुद्दे16 डिसेंबरला आग्रीपाड्याहून चिमुकली झाली होती बेपत्ताबोलूदेखील न शकणाऱ्या मुलीला शोधण्याचं होतं आव्हानपोलिसांनी आंध्र प्रदेश, पुणे, हैदराबादसहीत अन्य ठिकाणी केला तपास आठ दिवसांच्या मेहनतीनंतर सापडली मुलगी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमातील सुपरहिट आणि हृदयाला स्पर्श करणारी भावनिक कहाणीशी मिळती-जुळती घटना वास्तविक आयुष्यातही घडली आहे. कुटुंबीयांपासून ताटातूट होऊन पाकिस्तानातील एक लहान मुलगी नजरचुकीनं सीमारेषा ओलांडून भारतात येते आणि बऱ्याच संकटांचा सामना करत बजरंगी भाईजान तिची आई-बाबांसोबत भेट घडवतो. अशीच काहीशी घटना मुंबईमध्येही घडली आहे. 

आग्रीपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पीएसआय अमित बाबर यांनीही 'बजरंगी भाईजान' बनून एका बेपत्ता मुलीचा शोध लावला. 
पुराव्यांशिवायच अमित यांनी एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा सुखरुप सुटका करुन तिला कुटुंबीयांकडे सोपण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे केवळ आठ दिवसांत त्यांनी बेपत्ता मुलीला शोधलं. ऑपरेशन 'मुस्कान'मध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणातील गोष्टी अमित यांनी योग्यरितेनं लक्षात ठेवल्या आणि बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत झाली. 16 डिसेंबरच्या संध्याकाळी तीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली. यानंतर मुलीच्या शोधासाठी अमित यांनी जंग जंग पछाडण्यास सुरुवात केली. यासंदर्भात अमित यांनी सांगितले की, अद्यापपर्यंत नीट बोलण्यासही न शिकलेल्या मुलीला शोधून काढणं केवळ आव्हानात्मक बाब नव्हती तर यामध्ये बरीच जोखीम देखील होती. 

(...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज)

16 डिसेंबरला मुलगी झाली बेपत्ता
मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाली तेव्हाच पीएसआय अमित बाबर यांनी ठरवलं होतं की, काहीही झालं तरी मुलीला सुखरूप शोधून तिच्या आईवडिलांकडे सोपवणार. भायखळा रेल्वे स्टेशन परिसरातून ज्या ठिकाणाहून मुलगी बेपत्ता झाली होती, तेथे त्यांनी सुरुवातीस चौकशी केली. येथून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे ते आधी कल्याण आणि त्यानंतर पुण्याकडे रवाना झाले. पण हाती यश लागले नाही. 

बॅगवाल्या महिलेचा लागला शोध 
17 डिसेंबरला पोलीस पुन्हा मुंबईत परतले. या प्रकरणाची पुन्हा नव्यानं चौकशी सुरू करण्यात आली. त्यावेळेस घटनास्थळी एका महिलेच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी टिपल्या. तिच्या हातात बॅगवरुन पोलिसांचा संशय अधिक बळावला. याबाबत अधिक चौकशी केली असता महिलेनं भायखळा बाजारातून बॅग खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून महिला प्रवासासाठी निघाली होती.  

अपंग करुन भीक मागायला लावणाऱ्या टोळीवर संशय
यानंतर पोलिसांनी या महिलेचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पीएसआय अमित मुंबईहून आंध्र प्रदेशकडे रवाना झाले. येथे पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशयित महिलेव्यतिरिक्त आणखी एका महिलेची माहिती बाबर यांच्या हाती लागली. या महिलेची चौकशी केली असता तिनं संशयित महिला हैदराबादमध्ये नसून पुण्यात वास्तव्यास असल्याचे सांगितले. यादरम्यान, अपंग करुन लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या टोळीच्या हाती मुलगी पडल्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त करण्यात आली. पण सुदैवानं पोलिसांची ही भीती खोटी ठरली. आंध्र प्रदेशातून पुन्हा पुणे गाठून पोलिसांनी लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या टोळीच्या ठिकाणांवर छापा मारला. या कारवाईदरम्यान त्यांना आरोपी महिला शकीना(वय 28 वर्ष) भेटली, तिनं आपल्या घरातच मुलीला लपवून ठेवलं होतं. 

(दहा हजारी विक्रमानंतर विराटला मुंबई पोलिसांकडून 'सुस्साट' भेट!)

नि:संतान जोडप्याला देण्यासाठी मुलीची चोरी
यानंतर पोलिसांनी आरोपी शकीनाच्या मुसक्या आवळल्या आणि तिच्या तावडीतून चिमुकलीची सुखरुप सुटका केली. चौकशीदरम्यान शकीनानं पोलिसांनी सांगितले की, निःसंतान जोडप्याला देण्यासाठी तिनं मुलीला पळवलं होते. अशा कित्येक निःसंतान जोडप्यांना मुलं देण्यासाठी नेहमी मुंबई, पुणे, आंध्र प्रदेशसहीत अन्य शहरांमध्ये भटकत असल्याचंही शकीनानं कबूल केलं.

तब्बल आठ दिवस अथक मेहनत घेतल्यानंतर मुंबई पोलिसातील 'बजरंगी भाईजान' अमित बाबर यांनी मुलीला शोधून तिच्या आईवडिलांकडे सोपवलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.

Web Title: mumbai police bajrangi bhaijan who found missing child after eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.