"मुंबईकरांनो, मतदान अवश्य करा", अभिनेता अमीर खानकडून नागरिकांना आवाहन

By मनोहर कुंभेजकर | Published: April 4, 2024 01:25 PM2024-04-04T13:25:37+5:302024-04-04T13:26:16+5:30

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मतदार जनजागृती कार्यक्रमात अभिनेता अमीर खान यांचा मोलाचा सहभाग

"Mumbai people, must vote", appeals to citizens from actor Aamir Khan | "मुंबईकरांनो, मतदान अवश्य करा", अभिनेता अमीर खानकडून नागरिकांना आवाहन

"मुंबईकरांनो, मतदान अवश्य करा", अभिनेता अमीर खानकडून नागरिकांना आवाहन

मुंबई- मुंबईकरांनी आपापले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, नाव नसेल तर नोंदणी करावी. येत्या निवडणुकीत मतदान अवश्य करावे, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांनी केले. त्याचबरोबर आपण निवडणुकीत मतदान करणार, हे देखील त्यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात आवर्जून नमूद केले आहे.

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४' साठी मुंबईमध्ये सोमवार दि, २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या मतदानात मुंबईतून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये मतदार जनजागृती विषयक उपक्रमांनी वेग घेतला आहे.

या अंतर्गत विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्तिमत्वांची भेट निवडणूक 'स्वीप' कार्यक्रमांतर्गत घेण्यात येत आहे. त्यानुसार  डॉ. सुभाष दळवी , विशेष कार्य अधिकारी, मुंबई महानगर पालिका तथा मुंबई शहर व उपनगराचे 'निवडणूक 'स्वीप' कार्यक्रम' समन्वय अधिकारी आणि खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन माने यांनी अभिनेता अमीर खान यांच्या खार पश्चिम येथील निवासस्थानी जाऊन त्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबाने मतदान करावे, अशा आशयाचे जिल्हाधिकारी महोदयांचे स्वाक्षरी असलेले पत्र त्यांना देण्यात आले. 

अमीर खान यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे, अशी विनंती देखील डॉ . सुभाष दळवी यांनी सदर भेटीदरम्यान केली होती. या विनंतीला मान देत त्यांचे आवाहन असलेला व्हिडिओ संदेश नुकताच उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय पाठवला आहे. आपल्या प्रभावी आणि सुस्पष्ट आवाजात मतदारांना आवाहन करताना अमीर खान म्हणाले की, नमस्कार दोस्तो,आपल्या देशाच्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि मतदान आपला फक्त अधिकार नसून ती आपली जबाबदारीही आहे.

मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत भेट घेण्यास गेलेल्या 'स्वीप' चमूची त्यांनी आस्थेने स्वागत केले . या भेटीदरम्यान खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधताना त्यांनी मतदार जागृतीचा स्वीप कार्यक्रम समजून घेतला. त्यांची भेट व्हावी, यासाठी पश्चिम विभागाचे अपर पोलिस आयुक्त परमजित सिंह दहिया आणि परिमंडळ नऊचे पोलिस उपायुक्त  राज तिलक रौशन तसेच खार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  मोहन माने यांचे सहकार्य मिळाले अशीही माहिती  दळवी यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी  दूरध्वनीवर अमीर खान यांचे आभार मानले .

मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अथवा Voter Helpline Mobile App किंवा मतदार मदत क्रमांक १८००-२२-१९५० यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी पुन्हा केले आहे.

Web Title: "Mumbai people, must vote", appeals to citizens from actor Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.