Mumbai Marathon : हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी धावपटूंचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 09:18 AM2018-01-21T09:18:08+5:302018-01-21T13:06:06+5:30

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई मॅरेथॉनची चुरस आज रविवारी पहाटे ५.४० वाजल्यापासून सुरु झाली

Mumbai Marathon: Marathi runners Win Half Marathon | Mumbai Marathon : हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी धावपटूंचा दबदबा

Mumbai Marathon : हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी धावपटूंचा दबदबा

googlenewsNext

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई मॅरेथॉनची चुरस आज रविवारी पहाटे ५.४० वाजल्यापासून सुरु झाली. सलग पंधराव्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रोकॅम इन्टरनॅशनलच्या वतीनं आज टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. 

अर्धमॅरेथॉन शर्यतीत सैन्यदलाच्या धावपटूंनी आपला ठसा उमटवला आहे. प्रदीपकुमारसिंग चौधरी अर्धमॅरेथॉनचा विजेता ठरला. दुसऱ्या स्थानावर शंकरपाल थापा असून मराठमोळा धावपटू दीपक कुंभारनं तिसरा क्रमांक मिळवला आहे. दीपक हा मूळ कोल्हापूरचा धावपटू आहे. दुसरीकडे, महिला अर्धमॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मराठमोळ्या धावपटूंनी ठसा उमटवला आहे. संजीवनी जाधवने पहिला, तर मोनिका आथरेने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

हाफ मॅरेथॉन (पुरुष)

प्रथम : प्रदीपकुमारसिंग चौधरी
द्वितीय : शंकरपाल थापा
तृतीय : दीपक कुंभार

हाफ मॅरेथॉन (महिला)

प्रथम : संजीवनी जाधव
द्वितीय : मोनिका आथरे

हौशी धावपटूंच्या मॅरेथॉन (अमॅच्युअर फुल मॅरेथॉन) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तर एलिट मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील नामवंत धावपटूही सहभागी झाले आहेत. या दोन शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती आहेत. अर्धमॅरेथॉनची सुरुवात वरळी सीफेसवरच्या वरळी डेअरीसमोरुन झाली.

 

विशेष लोकल
पश्चिम रेल्वे दोन विशेष लोकल चालवणार आहे. पहिली लोकल विरार येथून रात्री २.४५ मिनिटांनी सुटणार असून चर्चगेट येथे ४.२३ वा. पोहचेल. दुसरी लोकल विरार येथून रात्री ३.०५ मिनिटांनी सूटणार असून चर्चगेटला ४.४३ वा. पोहचेल. कल्याणवरुन रात्री ३ वाजता लोकल निघणार असून सीएसएमटी येथे पहाटे ४.३० वा. पोहचेल. पनवेल स्थानकातून ३ वाजून १० मिनिटांनी निघणारी लोकल सीएसएमटी येथे ४.३० मिनिटांनी पोहचेल.

अशी असेल व्यवस्था...
स्पर्धा आयोजकांनी मॅरेथॉन मार्गावर धावपटूंसाठी चोख व्यवस्था केली असून यावेळी सहभागी स्पर्धकांसाठी एकूण १.५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मार्गावर एकूण २७ पाण्याचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. दोन बेस कॅम्पसह एकूण १२ वैद्यकीय केंद्रही उभारण्यात येणार असून ११ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. संपूर्ण मार्गावर ५०० डॉक्टर्स स्पर्धकांची काळजी घेण्यास सज्ज असतील. त्याचप्रमाणे एकूण ९ हजार पोलिसांचा फौजफाटा, १६०० सुरक्षा रक्षक आणि १४०० स्वयंसेवकही तैनात असतील.

पहिल्यांदाच १० किमी शर्यत
यंदाच्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच १० किमी अंतराच्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. एकूण ४ लाख ५ हजार अमेरिकी डॉलर रक्कमेचे पारितोषिक असलेल्या या धनाढ्य मॅरेथॉनमध्ये मुख्य मॅरेथॉनसह अर्धमॅरेथॉन (२१ किमी), ड्रीम रन (६.६ किमी), वरिष्ठ नागरिक गट (४.६ किमी) आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी (२.४ किमी) या गटातही चुरस रंगेल.
 

Web Title: Mumbai Marathon: Marathi runners Win Half Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.