मुंबई मराठी ग्रंथालय ; सांस्कृतिक आणि भाषिक चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:39 AM2019-02-06T04:39:48+5:302019-02-06T04:40:48+5:30

गेल्या निदान दोन वर्षात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबाबत वर्तमानपत्रातून अधून मधून उलट-सुलट बातम्या वाचनात येत होत्या. कधीतरी या बातम्यांचा स्फोट होईल असे ठामपणे वाटले नाही तरी चाहुल लागली होती.

Mumbai Marathi Library; Cultural and linguistic move | मुंबई मराठी ग्रंथालय ; सांस्कृतिक आणि भाषिक चळवळ

मुंबई मराठी ग्रंथालय ; सांस्कृतिक आणि भाषिक चळवळ

Next

- रत्नाकर मतकरी

गेल्या निदान दोन वर्षात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबाबत वर्तमानपत्रातून अधून मधून उलट-सुलट बातम्या वाचनात येत होत्या. कधीतरी या बातम्यांचा स्फोट होईल असे ठामपणे वाटले नाही तरी चाहुल लागली होती. शेवटी २८ जानेवारीला तो झालाच. अन्याया विरूद्ध कायम पोटतिडकिने लढा देणाऱ्या मेधाताई पाटकर यांना या लढ्यात उतरावे लागले. त्याचबरोबर कुमार केतकर आणि विशेष म्हणजे पद्मश्री डॉ. गणेश देवींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे साहित्यविश्व हलले तर नवल नाही. पूर्वी साहित्यसंमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीही संस्थेच्याच व्यासपीठावरून पदाधिकाºयांना संस्थेच्या जागा विकू न देण्याबद्दल ताकिद दिली होती. त्यांनीही आताच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काही वर्षांपूर्वी दुर्गाबाई भागवतांच्या नेतृत्वाखाली निखिल वागळे प्रभूतींनी अशाच आंदोलनाचा मार्ग अनुसरला होता.
प्रश्न केवळ आंदोलनाचा नाही. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या मराठी भाषेला आधार आणि ललामभूत संस्थेत हे आंदोलन भ्रष्ट कारभाराविरूद्ध होते हे महत्वाचे आहे. २८ जानेवारीला आयोजित केलेल्या खुल्या सभेत प्रा. विजय तापस यांनी मागील आंदोलनाचा हवाला देत ‘आंदोलने संपली तरी प्रश्न तसेच असल्याचे’ स्पष्टीपणे सांगितले. मराठी साहित्यिक, संशोधकांची मांदियाळी असलेल्या या संस्थेत हे घडते, ही स्थिती चिंताजनक आहे.
कर्मचाºयांनी केलेल्या आमरण उपोषणाच्या निमित्ताने हा प्रश्न उसळी मारून वर आला. कर्मचारी आक्रमक झाले. त्या निमित्ताने तीन-चार राजकीय पक्षांनी यात उडी घेतली तरी आपआपली राजकीय विचारधारा बाजूला ठेवून या प्रश्नांचा राजकीय आखाडा होऊ दिला नाही. विशेषत: या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार असताना आणि संस्थेच्या महत्वाच्या पदावर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचा वरचष्मा दिसताना त्याचे भांडवल केले गेले नाही हे महत्वाचे आहे.

ही वास्तू वाचनाची पुस्तके पुरवणारी सामान्य ‘लायब्ररी’ नाही तरी मराठी भाषेतील एक सांस्कृतिक आणि भाषिक चळवळ आहे. आज जिथे शारदा सिनेमा (सद्या एक वर्ष बंद आहे) आहे तिथे खुले नाटयगृह होते. अनेकदा नाटकाच्या तालमी, चिंतामण राव कोल्हटकर नाटयस्पर्धा, व्याख्यानमाला तिथे झाल्या आहेत. सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम हे या संस्थेचे वैभव होते. गेल्या काही वर्षात हे लयाला गेलेले दिसते. या संस्थेच्या संदर्भ विभाग ओस पडत चाललेला दिसतो. मुंबई-पुण्याकडे विस्तारलेल्या या संस्थेच्या शाखा हळूहळू बंद पडत तेथील जागांच्या व्यवहारांबाबत वाद सुरू झालेले दिसतात.
शारदा सिनेमा वर्षभर बंद असल्यामुळे (की ठेवल्यामुळे) संस्थेला आर्थिक फटका बसणे अगदी शक्य आहे. नायगाव येथील संस्थेची ही वास्तु मोक्याचे ठिकाण असलेली असल्याने येथे टोलेजंग इमारत, मॉल उभारण्याचा प्रयत्न असल्याची भीती उत्पन्न झाल्यास दोष कोणाचा. या इमारतीच्या समोर असलेल्या इमारतींचा हवाला त्यासाठी
दिला जातो. एकूण मुंबईतील मराठी वस्त्यांची वाताहात पाहता ही भीती अनाठायी म्हणता येणार नाही.
या स्थितीला जबाबदार संस्थेच्या पदाधिकाºयांना धरले जाते. या संस्थेच्या अध्यक्षपदावर गेले निदान ३५-४0 वर्षात शरद पवार आहे.
त्यांना या संस्थेची होत असलेली अधोगती माहित नाही असे कसे मानता येईल? शरद पवार हे या महाराष्ट्रात काहीही करू शकतात. अनेक संस्थांशी ते संबंधित आहेत. अनेक संस्था त्यांनी नावारूपाला आणल्या आहेत.
मुबंई मराठी ग्रंथ संग्रहालय वाचवणे, ही संस्था पूर्वीच्या वैभवाप्रत नेणे त्यांना अशक्य नाही. आता तर सुप्रिया सुळेंची त्यांना साथ आहे. त्यांनी ते करावे ही अपेक्षा विजय तापस, मेधा पाटकर, यशवंत किल्लेदार, धनंजय शिंदे इत्यांदींनी व्यक्त केली. मॉल संस्कृतीपासून हे ग्रंथालय वाचावे ही अपेक्षा आहे.

ग्रंथालय वाचवण्यासाठी साहित्यिक सरसावले

मुंबई मराठी ग्रंथालय वाचवण्यासाठी, पुन्हा ही चळवळ जोम धरून पुढे जाण्यासाठी वाचक, प्राध्यापक, साहित्यिक सरसावले आहेत. या चळवळीतून परिवर्तन घडून मुंबई मराठी ग्रंंथसंग्रहालय ही साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ कात टाकून उभी राहिली पाहिजे. या संग्राहालयाचा व्याप आणि कार्यकक्षा वाढून हे एक जागतिक अभ्यास केंद्र व्हावे ही अपेक्षा आहे. त्यासाठी राजकीय, वर्गीय अभिनिवेष बाजूला ठेवून सर्व मराठी भाषिकांनी कंबर कसायला हवी. अन्यथा ‘एक लायब्ररी बंद पडली’ असेच इतिहासात लिहिले जाईल.

Web Title: Mumbai Marathi Library; Cultural and linguistic move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.