वाह गुरू; सत्संगावेळी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाराने वाटले १०,००० हेडफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 01:25 PM2019-02-11T13:25:50+5:302019-02-11T13:25:58+5:30

गुरुद्वाराच्या उपक्रमाचं हायकोर्टाकडून कौतुक

Mumbai Gurudwara Distributed 10000 Headphones To Devotees to Counter Noise Pollution | वाह गुरू; सत्संगावेळी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाराने वाटले १०,००० हेडफोन

वाह गुरू; सत्संगावेळी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाराने वाटले १०,००० हेडफोन

Next

मुंबई: ध्वनी प्रदूषण कमी व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र त्याची सुरुवात इतरांपासून व्हावी, असं वाटणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यात जर धार्मिक कारणांमुळे ध्वनी प्रदूषण असेल, तर मग एकमेकांकडे बोट दाखवलं जातं. मात्र असं करताना चार बोटं स्वत:कडे असतात, याचा सर्वांनाच विसर पडतो. उल्हासनगरमधल्या एका गुरुद्वाऱ्याच्या बाबतीत असं घडलेलं नाही. सत्संगावेळी होणारं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाऱ्यानं स्तुत्य पाऊल उचललं. या अभिनव उपक्रमाचं मुंबई उच्च न्यायालयानंदेखील तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

धार्मिक कार्यक्रम म्हटल्यावर ध्वनी प्रदूषण ठरलेलं असतं. याबद्दल कोणी आक्षेप घेतलाच की इतर धर्मीयांच्या मिरवणुका, जुलूस यांच्याकडे बोट दाखवलं जातं. मात्र एकमेकांकडे बोट न दाखवता स्वत:कडून सुरुवात केली जाऊ शकते, याचं उत्तम उदाहरण उल्हासनगरधील गुरुद्वाऱ्यानं समोर ठेवलं आहे. उल्हासनगरमधील गुरुद्वाऱ्याच्या अमृतवेला ट्रस्टनं 43 दिवसांच्या सत्संगाचं आयोजन केलं होतं. गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं आयोजित सत्संग किर्तनात हजारो शीख बांधव उपस्थित राहणार होते. यावेळी ध्वनीक्षेपक लावण्यात येणार होता. मात्र त्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण लक्षात घेता ट्रस्टनं तब्बल 10 हजार हेडफोन्सचं वाटप केलं. त्यामुळे कोणत्याही ध्वनी प्रदूषणाशिवाय सत्संग अगदी उत्तमपणे संपन्न झाला. 

गुरुद्वारा ट्रस्टनं घेतलेल्या या निर्णयाचं मुंबई उच्च न्यायालयानं कौतुक केलं. ट्रस्टच्या या अभिनव उपक्रमात उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे न्यायालयानं महापालिका आणि आयुक्तांचीही स्तुती केली. 'जर 99 टक्के अधिकारी नियमांच्या चौकटीत राहून काम करत नसतील, तर नियमाच्या अधीन राहून उत्तमपणे स्वत:ची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक व्हायला हवं,' असं उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलं. 
 

Web Title: Mumbai Gurudwara Distributed 10000 Headphones To Devotees to Counter Noise Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.