छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 12:07 PM2018-08-06T12:07:14+5:302018-08-06T13:22:48+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Mumbai : Chhagan Bhujbal admitted to Jaslok Hospital | छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीएमएलए कोर्टात सुनावणीसाठी जात असताना भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले, शिवाय त्यांना श्वसनाचाही त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  छगन भुजबळ यांच्यावर डॉक्टर मेहता उपचार करत आहेत.  आवश्यक वाटल्यास पुढील उपचारांसाठी भुजबळ यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार 6 सप्टेंबरपर्यंत छगन भुजबळ यांच्यासहीत 35 आरोपींना वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, नव्या प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार की नाही? यावर 6 सप्टेंबरला निर्णय होणार आहे. 

नेमके काय आहे प्रकरण?

छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ईडीने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे काळा पैसा बाळगल्याप्रकरणी १७ जून, २०१५ रोजी मनी लाँडरिंगचे दोन गुन्हे दाखल केले होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामातील भ्रष्टाचार, कलिना येथील जमीन हडप करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.  तर दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आरोपपत्रात भुजबळ यांच्यासह पंकज, समीर आणि अन्य १४ जणांची नावे होती. महाराष्ट्र सदन बांधण्याचे कंत्राट मेसर्स चमणकर डेव्हलपर्स यांना देण्यात आले होते. अंधेरीतील आरटीओ कार्यालय इमारत, मलबार येथील सरकारी अतिथीगृहाच्या बांधकामाचे कंत्राट देताना, नियम धाब्यावर बसविण्यात आले व त्यात भुजबळ कुटुंबाला मोठी लाच देण्यात आल्याचा ‘ईडी’नं आरोप केला होता. भुजबळ हे उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हा हा आर्थिक घोटाळा झाल्याचे 'ईडी'चे म्हणणं आहे.

भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचाही ‘ईडी’चे सांगितले होते. भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराचा तपास करणाऱ्या ‘ईडी’ला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी म्हणजे भुजबळ कुटुंबाला मिळालेली लाच आहे. कंत्राटदारांना प्रकल्पाचे काम देण्याच्या बदल्यात भुजबळ कुटुंबाला रोख रक्कम मिळाली असून, ती रक्कम विविध कंपन्या व व्यवसायात गुंतविण्यात आली असल्याचे 'ईडी'ने सांगितले होते. 

Web Title: Mumbai : Chhagan Bhujbal admitted to Jaslok Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.