धक्कादायक! फिन सूपसाठी त्यांनी केली 20 हजार शार्क माशांची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 11:58 AM2018-09-04T11:58:01+5:302018-09-04T12:05:29+5:30

मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरुन शार्क माशांचे जवळपास 8,000 किलोग्रॅम वजनाचे कल्ले जप्त करण्यात आले आहेत.

Mumbai : 8,000 kg shark fins worth Rs 45 crore seized, four arrested | धक्कादायक! फिन सूपसाठी त्यांनी केली 20 हजार शार्क माशांची शिकार

धक्कादायक! फिन सूपसाठी त्यांनी केली 20 हजार शार्क माशांची शिकार

Next

मुंबई - मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरुन शार्क माशांचे जवळपास 8,000 किलोग्रॅम कल्ले जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाची (DRI) ही कारवाई केली आहे. शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी करण्यासाठी जवळपास 20 हजार शार्क माशांची बेकायदेशीररित्या शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी 4 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून ही टोळी चीन, जपानमध्ये कल्ल्यांची विक्री करत असल्याचे माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शार्कच्या कल्ल्यांची किंमत 35 ते 40 कोटी रुपये एवढी आहे. फिन सूप आणि कामेच्छा वाढवणाऱ्या औषधांमध्ये शार्कच्या कल्ल्यांच्या वापर करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शार्कची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   

चार जणांची टोळी गजाआड
डीआरआयनं दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सेवरी आणि वेरावल येथे ग्लोबल इम्पेक्स ट्रेडिंग कंपनीमध्ये छापेमारी करत शार्क माशांचे कल्ले जप्त करण्यात आले. छापेमारीदरम्यान कंपनीचा मालक सराफत अली, त्याचा भाऊ हमीद सुलतान, मॅनेजर आर.अहमद असिफ आणि गोदामाचा प्रभारी आर शिवारामन या चार जणांना अटक करण्यात आली. या कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तस्करी प्रकरणाचा सराफत अली मुख्य सूत्रधार असून तो मच्छीमारांची नियुक्ती करुन त्यांना समुद्रात पाठवायचा आणि शार्क माशांची बेकायदेशीररित्या शिकार करायचा.

(शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश)


''शार्क माशांचे कल्ले सुखवण्यासाठी आरोपी असरफनं वेरावली आणि सेवरी येथे 1,500 चौरस फुटावर एक प्लांट उभारलं आहे. एका खेपेचा माल तयार होण्यासाठी जवळपास महिन्याभराचा कालावधी लागतो. दरम्यान, या टोळीनं दोन टन मालाच्या तीन खेप तयार केल्या होत्या आणि या मालाची फेब्रुवारी महिन्यात निर्यात होणार होती'', अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कल्ल्यांचं असं बनवलं जातं सूप 
शार्क माशाचे कल्ले कापून ते सुखवले जातात व त्याचं सूप बनवलं जातं. आशियाई देशांमध्ये शार्क फिन (कल्ले) सूपची खवय्यांमध्ये  मोठ्या प्रमामात क्रेझ वाढत जात आहे. मात्र वाढत्या शिकारीमुळए शार्क माशांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे.  
 
एक वाटी सूपची किमत7000 रुपये 
चीनमध्ये काही विशिष्ट प्रसंगी हे सूप बनविले जाते. परदेशात या सूपची किमत जवळपास 7000 रुपयांहूनही अधिक आहे. 

कामेच्छा वाढण्यास होते मदत 
हाँककाँग, सिंगापूर आणि चीनमधील काही भागांमध्ये शार्क माशाच्या कल्ल्यांचे सूप खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, कल्ल्यांचे सूप प्यायल्याने शरीरातील ताकद, ऊर्जा वाढण्यास मदत होते. दरम्यान, वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामध्ये या गोष्टी चुकीच्या ठरवण्यात आल्या आहेत. हे सूप कॅन्सरसारख्या आजारांवर प्रभावी उपाय असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य आढळून आलेले नाही.
 

Web Title: Mumbai : 8,000 kg shark fins worth Rs 45 crore seized, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.