‘मोनो’मुळे वाहतूक व्यवस्थेला बळकटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:18 AM2019-03-11T01:18:12+5:302019-03-11T01:18:25+5:30

मोनो रेल्वेमुळे चेंबूरसह लगतच्या परिसरातून महालक्ष्मीसारखे कार्पोरेट हब गाठणे नागरिकांना सोयीचे झाले आहे.

'Mono' strengthening traffic system | ‘मोनो’मुळे वाहतूक व्यवस्थेला बळकटी

‘मोनो’मुळे वाहतूक व्यवस्थेला बळकटी

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : मध्य मुंबईतून चेंबूर गाठण्यासाठी बेस्ट उपलब्ध असल्या तरी प्रवासादरम्यान लागणारा वेळ आणि खर्च; या दोन्हीचा ताळमेळ बसत नाही. टॅक्सी, उर्वरित खासगी कंपन्यांच्या कार सेवा अस्तित्त्वात असल्या तरी आर्थिकदृष्ट्या त्या परवडत नाहीत. थेट हार्बर मार्गावरील स्थानकांशी अथवा परिसरांशी जोडणारी स्वतंत्र अशी वाहतूक यंत्रणा कार्यान्वित नव्हती. मात्र, आता मोनो रेल्वेच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा प्रश्न सोडवत, येथील वाहतूक व्यवस्था आणखी बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोनो रेल्वेमुळे चेंबूरसह लगतच्या परिसरातून महालक्ष्मीसारखे कार्पोरेट हब गाठणे नागरिकांना सोयीचे झाले आहे. मुळातच केवळ कॉर्पोरेट हब नाही, तर लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी, वडाळा, दादर आणि महालक्ष्मी ही ठिकाणे गाठण्यासाठी पूर्व उपनगरातील म्हणजे चेंबूर, वाशी नाका, कुर्ला पूर्व, घाटकोपर पूर्व, अमर महल जंक्शन येथील नागरिकांना मोनो रेल्वेचा प्रवास सुखद झाला आहे. मध्य मुंबईत कॉर्पोरेट हबसह अनेक कार्यालय, रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालय आहेत. परिणामी, महाविद्यालय आणि रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांना मोनो रेल्वे लाभदायी ठरणार आहे. मुळात छोट्या छोट्या ठिकाणांना छोट्या मार्गाद्वारे जोडणे; हा मोनो रेल्वेचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात हा उद्देश सफल झाला नसला, तरी दुसरा टप्पा आता कार्यान्वित झाल्याने प्राधिकरणाला लाभ होणार आहे. विशेषत: नोकरदार वर्गाला उचित फायदा होणार आहे. मध्य मुंबई आणि पूर्व उपनगर जोडले जात असतानाच, प्राधिकरणाला मोनोरेल्वेच्या तिकीटदरावरही प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. वेळ वाचण्यासह एसी प्रवास प्रवाशांना परवडणारा असला, तरी सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर महागडा असलेला हा प्रवास किफायतशीर कसा होईल? याकडे प्राधिकरणाला लक्ष द्यावे लागणार आहे आणि हे करताना प्राधिकरणाची मोठी कसरत होणार आहे. सुरुवातील मोनो रेल्वेची एक फेरी बावीस मिनिटांच्या अंतराने होत आहे. ही फेरी पंधरा मिनिटांवर आणण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न असला, तरी त्यास एप्रिल महिना उजाडणार आहे. तरीही मोनो मुंबईकरांच्या पसंतीला उतरावी, अशी अपेक्षा आहे़

मोनो रेल्वेची कनेक्टिव्हिटी
मोनोरेल्वेची कनेक्टिव्हिटी वडाळा ते जीपीओ या मार्गावरील मेट्रो-११ ला वडाळा आरटीओ परिसरात असणार आहे. १४ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो रेल्वे प्रकल्प ८ हजार कोटी रुपये खर्च करून उभा केला जाणार आहे.
वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडवली या मेट्रो-४ च्या ३२ किलोमीटर मार्गालाही मोनो रेल्वेची कनेक्टिव्हिटी वडाळा परिसरात असेल. हा मार्ग ३२ किलोमीटरचा असेल. या मार्गासाठी साडेचौदा हजार कोटी रुपये खर्च केला जाईल.
डी.एन.नगर ते मानखुर्द हा मेट्रो २-ब मार्गही हार्बर रेल्वे मार्गाशी जोडला जाणार असून, या मार्गामुळे चेंबूर परिसर, पर्यायाने मोनो रेल्वेशी जोडला जाईल. २३ किलोमीटरच्या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च केले जातील.
सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड धावत असून, अमर महल जंक्शन येथून चेंबूर परिसर मोनो रेल्वेशी जोडला गेला आहे.
कुलाबा, वांद्रे, सीप्झ हा भुयारी मेट्रो मार्ग ३ महालक्ष्मी येथे संत गाडगे महाराज चौक परिसराशी जोडला गेल्याने, साहजिकच प्रवाशांची दमछाक होणार नाही.
प्राधिकरणाकडून उभारण्यात येत असलेल्या दहा मेट्रोच एकमेकांशी कनेक्ट असून, याचा फायदा तुलनेने मोनो रेल्वेलाही होणार आहे.

वेळेचे अंतर कमी होणार
सध्या धावत असलेल्या चार मोनो रेल्वेमध्ये आणखी दोन मोनो रेल्वेची भर पडणार आहे. दोन मोनो रेल्वे दाखल झाल्यानंतर, मोनो रेल्वेमधील वेळेचे अंतर कमी होईल.
अत्याधुनिक सुरक्षा
प्राधिकरणाला सुरक्षेच्या मुद्द्यांकडेही प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. विशेषत: आजघडीला स्थानकांवर पुरेसे सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेची व्यवस्था चोख असली, तरीदेखील भविष्याचा विचार करता यात आणखी अत्याधुनिकता आणावी लागेल.

एकात्मिक तिकीट प्रणाली
एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्यासाठी प्रशासन आग्रही असले, तरी याकरिता बेस्टचा गाडा प्रशासनाला रुळावर आणावा लागेल. तेव्हा कुठे बेस्ट, मोनो रेल्वे, रेल्वे, मेट्रो या सर्वांना एकात्मिक तिकीट प्रणाली लागू करता येईल. एकात्मिक तिकीट प्रणाली हे दूरवरचे लक्ष्य असले, तरी हे लक्ष्य गाठण्यासाठी मोनो रेल्वेच्या प्रवासात कुठेही बाधा येणार नाही आणि मोनो रेल्वेचा प्रवास अखंड सुरू राहील, यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे.

चारऐवजी सहा डबे
अत्याधुनिकतेकडे लक्ष देतानाच चार डब्याची मोनो रेल्वे सहा अथवा आठ डब्यांची कशी करता येईल? यावरही लक्ष केंद्रित करावे लागले. मात्र, डबे वाढविण्याचा मुद्दा हा प्रवासी संख्या, याद्वारे प्राप्त होणारा महसूल यातून सुटणार आहे. यासाठी मोनो रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल.

तिकीट दर मात्र चढेच
तिकीट दराबाबतचा मुद्दा अधोरेखित करावयाचा झाल्यास सरसकट सर्वांनाच एकच तिकीट लागू झाले आहे. विद्यार्थी अथवा हाफ तिकीट याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. मुळात चाळीस रुपये तिकीट हे अत्यंत महागडे असून, यात कपात करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मोनो रेल्वेचा गाडा रुळावर
अगदी सुरुवातीचा विचार करता मोनो रेल्वे स्कोमीकडे होती. मध्यंतरी झालेल्या वादानंतर प्राधिकरणाने ती आपल्या ताब्यात घेतली. आता प्राधिकरणाला मोनो रेल्वेची संपूर्ण जबाबदारी उचलावी लागत आहे़ मोनो रेल्वेचा गाडा रुळावर ठेवण्यासह त्यात सलगता ठेवणे हे प्राधिकरणासमोरेचे मोठे आव्हान आहे.

दीडशे कोटींची तरतूद
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मोनो रेल्वेसाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 'Mono' strengthening traffic system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.