'टक टक गँग'नं मनसे नगरसेवकाला गंडवलं, क्षणात पळवला महागडा मोबाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 12:24 PM2018-05-09T12:24:08+5:302018-05-09T12:24:08+5:30

कुर्ला येथे प्रवास करत असताना या टोळीने त्यांचा मोबाइल लांबविला.

MNS corporator loses cellphone to 'tak tak gang' | 'टक टक गँग'नं मनसे नगरसेवकाला गंडवलं, क्षणात पळवला महागडा मोबाइल

'टक टक गँग'नं मनसे नगरसेवकाला गंडवलं, क्षणात पळवला महागडा मोबाइल

Next

मुंबई- मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुरडे 'टक टक' गँगच्या निशाण्यावर आले होते. कुर्ला येथे प्रवास करत असताना या टोळीने त्यांचा मोबाइल लांबविला. कुर्ला पश्चिमेतील एलबीएस रोडवरून तुरडे यांची गाडी जात असताना तुरडे ट्रॅफिकमध्ये अडकले होते. यावेळी या चोरट्यांनी त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवून मोबाइल चोरला. सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. ' वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारच्या घटना एकामागे एक घडत आहेत. पण पोलीस प्रशासन त्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याचं संजय तुरडे यांनी म्हटलं. 

कुर्ला येथून चेंबुरमध्ये नातेवाईकांच्या घरी जात असताना ही घटना घडली आहे. सुरूवातीला एका व्यक्तीने त्यांच्या कारच्या डाव्या बाजूला येऊन काही तरी लागल्याचं नाटक केलं. तुरडेंच्या गाडीचं चाक त्याच्या पायावरून गेल्याचं नाटक त्याने केला. तुरडेंना ही गोष्ट सांगण्यासाठी त्याने गाडीचा दरवाजा वाजवला. काय घडलं, हे पाहण्यासाठी तुरडेंनी गाडीची काच खाली केली. त्याच वेळी एका दुसऱ्या व्यक्तीने उजव्या बाजूने गाडीचा दरवाजा वाजवला. त्यामुळे तुरडेंचं लक्ष गाडीच्या उजव्या बाजूला गेलं. त्याचवेळी लागल्याचं नाटक केलेल्या चोरट्याने कारच्या डॅशबोर्डवर असलेला संजय तुरडे यांचा मोबाइल उचलून तेथून पळ काढला. 

काही सेकंदात हे सगळं घडलं. त्यांनी मुद्दाम गोंधळाची परिस्थिती निर्माण केली व मोबाइल चोरला. हे चोरटे एका लोकप्रतिनिधीबरोबर असं वागू शकतात तर सर्वसामान्य लोकांबरोबर कसे वागत असतील, ही विचार करण्याची बाब असल्याचं तुरडे यांनी म्हटलं. 
दरम्यान, संजय तुरडे यांनी त्यांच्या पक्षाच्या काही लोकांना मोबाइल चोरीला गेलेल्या ठिकाणावर गर्दीच्या वेळी नजर ठेवायला सांगितलं आहे. असा प्रकार पुन्हा करण्याचा ते प्रयत्न करतील तेव्हा त्यांना पकडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. 

गर्दीच्या वेळी गाडीच्या दरवाज्यावर टक-टक करून हे चोरटे महागाच्या वस्तू लांबवतात म्हणून या टोळीला टक-टक गँग असं नाव पडलं आहे. चोरी करून काही क्षणात हे चोरटे पसार होतात. 
 

Web Title: MNS corporator loses cellphone to 'tak tak gang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.