कामगार संघटनांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद; वाहतुकीवर परिणाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:36 AM2020-01-09T06:36:05+5:302020-01-09T06:36:18+5:30

धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात, बँक आणि विमा कर्मचारी, आशा सेविका, आंगणवाडी सेविका, रेल्वे कामगार सहभागी झाले होते.

A mixed response to the unification of trade unions; No effect on traffic | कामगार संघटनांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद; वाहतुकीवर परिणाम नाही

कामगार संघटनांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद; वाहतुकीवर परिणाम नाही

googlenewsNext

मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात, बँक आणि विमा कर्मचारी, आशा सेविका, आंगणवाडी सेविका, रेल्वे कामगार सहभागी झाले होते. रेल्वे, एसटी, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी वाहतुकीवर संपाचा काही परिणाम झाला नाही, तर मालवाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात बंद होत्या.
यावेळी आझाद मैदान येथे बोलताना कामगार संघटना कृती समिती सहनिमंत्रक विश्वास उटगी म्हणाले की, केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. देशातील सुमारे २५ कोटी कर्मचारी संपावर आहेत. त्यात महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी कामगारांचा समावेश आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, असंघटित कामगार, बँक कर्मचारी, गोदी कामगार इत्यादी संघटनांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांत रोजगार वाढण्याऐवजी कमी झाला आहे. सहा वर्षांत सुमारे पाच कोटी कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. भविष्यात सर्व सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा कुटिल डाव आहे.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले की, देशातील ५ हजार बँका बंद आहेत. यात नागरी, सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कारण १० राष्ट्रीयकृत बँकेचे विलीनीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. त्याला आमचा विरोध आहे. बँकेत नोकरभरती करा, भांडवलदारांकडून थकीत कर्ज वसूल करा, अशी आमची मागणी आहे, तसेच कर्ज देण्यास भांडवलदार-केंद्र सरकार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला. आज सर्वसामान्यांनी पैसे काढल्यास बँक सेवेचे पैसे घेते. रस्त्यावर आल्याशिवाय न्याय मिळत नाही, म्हणून आम्ही या बंदला पाठिंबा देत आहोत, असे ते म्हणाले.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे मध्य रेल्वे विभागाचे महामंत्री वेणू नायर म्हणाले की, आमचा हा लढा सर्वसामान्य, गरीब प्रवाशांसाठी आहे. रेल्वे प्रशासनाने भाडे दरवाढ करून सर्वसामन्यांवर अन्याय केला आहे. अर्ध्या तासात रेल्वे वाहतूक ठप्प करण्याची ताकद आहे, परंतु सामान्यांना वेठीस धरायचे नव्हते. त्यामुळे शांततेने आंदोलन केले.
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक म्हणाले, शिवसेनाप्रणीत सर्व कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाली आहे. ही लढाई केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणाविरोधात आहे. संघटित कामगार कमी होऊन आउटसोर्सिंग वाढत आहे. कामगारांचा पगार कापला जात आहे. कामगार आंदोलन करू शकत नाहीत. कामगारांची संख्या आता २५ टक्के इतकी आहे. या कामगारांना काढून कंत्राटी पद्धतीने कामगार नेमले जात आहेत. हे कंत्राटी कामगार आज अक्षरश: गुलामगिरीच्या अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारची एकाधिकारशाही सुरू आहे. देशात फक्त दोन माणसांचे भले होत आहे. एक अदानी आणि दुसरा अंबानी. त्यांच्यासाठी रोज कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारची ही हुकूमशाही मोडून काढायची आहे, असेही त्यांनी सांगितले. गोदी कामगार नेते एस. के. शेट्ये म्हणाले की, पूर्वी मुंबईत बंदरावर सुमारे ४५ हजार गोदी कामगार काम करत होते. आज ती संख्या ६,५०० झाली आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कामगार कपात केली जात आहे. या विरोधात आवाज उठविला पाहिजे. दरम्यान, राज्य कामगार विमा योजना चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेने मुलुंड येथे मुलुंडच्या कामगार रुग्णालयाबाहेरच ठिय्या केला. काम बंद करून कर्मचाºयांनी रुग्णालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेनाचा संपाला पाठिंबा, पण सक्रिय सहभाग नाही. कामगार संघटनांच्या संपाला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. त्यानुसार, शिवसेनेच्या सहभागामुळे संप जास्त प्रमाणात होईल, असा काही नेत्यांनी दावा केला होता. कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक आणि काही शिवसैनिक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले होते, परंतु शिवसेनाप्रणीत रिक्षा टॅक्सी, बेस्ट, एसटी, रेल्वे, विमान वाहतूक संघटनांनी काही अपवाद वगळता संपात सक्रिय सहभागघेतला नाही. कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात एमआयडीसीमध्ये सीआयटीयू, एआयटीयू, भारतीय कामगारांचे जास्त विभाग आहेत. या ठिकाणी संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे, सिप्झमध्ये एआयसीटीयू अनिल त्यागी यांच्या नेतृत्वाखाली काही संघटनांनी संप केल्याचे कामगार कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी सांगितले.

>रिक्षा-टॅक्सी संघटनांची संपाकडे पाठ
कामगार संघटनांच्या संपात रिक्षा, टॅक्सी संघटना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कामगार संघटनांचा संप आहे. त्याच्याशी रिक्षा टॅक्सीचा संबंध नाही. त्यामुळे आम्ही संपात सहभागी झालो नाही, असे मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए.एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपात कामगार संघटना सहकार्य करत नाहीत, त्यामुळे आम्ही संपात सहभागी झालो नाही, असे स्वाभिमान टॅक्सी आॅटो युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी म्हणाले.
<आजच्या संपात मालवाहतूकदारांचा सक्रिय सहभाग होता. मालवाहतूक करणाऱ्या ७० टक्के गाड्या बंद होत्या. यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. मालवाहतुकीच्या गाड्या भरण्यासाठी क्रेन आॅपरेटर होते. मात्र, माथाडी आणि इतर कामगार कामावर नसल्याने कंपन्यांमध्ये चार हजार गाड्या उभ्याच राहिल्या. वाशी मार्केट, तळोजा, उरण, रांजणगाव आदी ठिकाणी या गाड्या उभ्या होत्या. भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला नाही.
- राजेंद्र वनवे, अध्यक्ष,भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशन.

Web Title: A mixed response to the unification of trade unions; No effect on traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.