हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:42 AM2019-03-10T06:42:10+5:302019-03-10T06:42:30+5:30

बार्कच्या संशोधनाला मिळाले पेटंट; जतिंदर याखमी यांचे सादरीकरण

The man who can live for life after heart failure | हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस

हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस

Next

- निशांत वानखेडे 

नागपूर : हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्य केले आहे. अशुद्ध रक्त शुद्ध करून आॅक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे, हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम जर कृत्रिमरीत्या चालविणे शक्य झाले तर..? या तरचे उत्तर भाभा ऑटोमिक रीसर्च सेंटरने (बार्क) संशोधनातून समोर आणले आहे. बार्कच्या टीमने ‘आर्टिफिशियल मॅग्नेटिक हार्ट पंप’चे तंत्र साकारले असून अमेरिका, जर्मनी व फ्रान्सकडून त्याचे पेटंटही मिळविले आहे.

बार्कचे निवृत्त सहसंचालक व डीएईचे माजी चेअरमन डॉ. जतिंदर याखमी यांनी ‘लोकमत’ला याची माहिती दिली. आर्टिफिशियल हार्ट पंपिंगचे उपकरण जर्मनीने विकसित केले आहे; मात्र ते शरीराशी जुळलेले नसते. ते वॉकरसारखे चालवत न्यावे लागते व त्याचे वजनही खूप असते. त्याची किंमतही ४० लाख रुपये असून, ते विजेवर चालते. वीज नसेल, तर ते बिनकामाचे ठरण्याची शक्यता आहे. चेन्नईचे कार्डिओसर्जन डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी एक आव्हान आमच्यासमोर ठेवले होते. त्यावर बार्कचे एस. एम. युसूफ यांनी कार्य सुरू केले. डॉ. याखमी हे त्याचे समन्वयक होते. त्यांच्या मते, हे तंत्र मॅग्नेटिक इफे क्टशी जुळलेले आहे.

बार्कच्या संशोधकांनी मॅग्नेटिक प्रभावाने कृत्रिमपणे हृदय पंपिंगचा फॉर्म्युला विकसित केला. पॉलियुरिथेन या पॉलिमर लिक्वीडमध्ये मॅग्नेटेड नॅनो पार्टिकल्सच्या मिश्रणाने मॅग्नेटिक इफेक्ट तयार केला जातो व त्याद्वारे हार्ट पंप केले जाऊ शकते. हृदयाच्या झडपांचा वेग कमी-जास्त करण्याचे व ते सतत सुरू राहील, याचे तंत्रही बार्कच्या फॉर्म्युल्यामध्ये मांडण्यात आले आहे. याचे वजन एक ते दीड किलोच्या वर नाही व ते सहज हृदयाजवळ जोडणे शक्य आहे.

तज्ज्ञांनी मूर्तरूप द्यावे : या तंत्राला आंतरराष्ट्रीय पेटंट म्हणून मान्यता मिळाली आहे. अणुऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बार्कने हा फॉर्म्युला मांडला असून, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्याला मूर्तरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. हे उपकरण विकसित झाले तर क्रांतिकारी ठरेल, असा विश्वास डॉ. याखमी यांनी व्यक्त केला.

Web Title: The man who can live for life after heart failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.