'साठी बुद्धी नाठी'... मुंबईतील उच्चभ्रू आजीबाईंनी लग्नाच्या नादात गमावले साडेनऊ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 04:30 PM2018-03-31T16:30:08+5:302018-03-31T16:34:08+5:30

लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्याऐवजी आजींना पोलीस स्टेशन गाठावं लागलं.

man looted sixty years old lady | 'साठी बुद्धी नाठी'... मुंबईतील उच्चभ्रू आजीबाईंनी लग्नाच्या नादात गमावले साडेनऊ लाख

'साठी बुद्धी नाठी'... मुंबईतील उच्चभ्रू आजीबाईंनी लग्नाच्या नादात गमावले साडेनऊ लाख

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई- वयाच्या साठाव्या वर्षीही लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या एका आजीबाईंना लाखो रूपयांचा गंडा घातल्याची घटना वरळीतील उच्चभ्रू वसाहतीमध्ये घडली आहे. फसवणूक झालेली ही महिला जोडीदाराचा शोध घेत होती. तेव्हा या महिलेला एका व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचं स्थळ आलं. पहिल्या भेटीतच महिलेने त्या व्यक्तीला पसंत केलं. कुटुंबाच्या भेटीगाठ्या झाल्यानंतर लग्नाची तारीखही ठरली होती. पण लग्नाच्या आधी त्या व्यक्तीने महिलेला आई आजारी असल्याचं कारण देत नऊ लाख रूपयांची मागणी केली. त्या महिलेने नऊ लाख रूपये दिले. लग्नाच्या दिवशी ठरलेल्या वेळी नवरदेव न आल्याने आजीने त्यांना फोन केला पण फोन लागलाच नाही. त्यामुळे लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्याऐवजी आजींना पोलीस स्टेशन गाठावं लागलं. 

 60 वर्षीय शांता (नाव बदललेलं आहे) या त्यांची आई व बहिणीबरोबर वरळीच्या एक उच्चभ्रू वसाहतीत राहतात. शांता यांची बहिण पालिकेत नोकरीला आहे.  शांता अविवाहित आहेत. वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांचा वराचा शोध सुरु होता. त्यांनी १९ एप्रिल २०१५ मध्ये दैनिकात लग्नासाठी मुलाच्या स्थळाबाबत माहिती प्रसिध्द केली होती. तेच  बघून 8 दिवसांनी  मधुकर सिताराम आपटे या नावाने त्यांना फोन आला. आपटेने तो  ज्युपिटर केमिकल्स येथे व्यवस्थापक असल्याचे सांगितलं.  घटस्फोटीत असल्याने मुलुंड येथील घरी एकटेच राहत असल्याचे सांगून लग्नाची मागणी घातली. आपटेने स्वत:ला मुलगा असल्याचंही सांगितलं.

काही दिवसांनी आपटेने त्यांना  वरळी नाका येथे भेटण्याकरिता बोलाविले. प्रत्यक्षात बघुन त्यांची वैयक्तिक माहिती घेतली. परंतु आपटे घरातील लोकांना न भेटल्याने लग्नाबाबत पुढील निर्णय घेतला नाही. त्यानंतर आपटेबरोबर त्यांचे मोबाईलवरुन संभाषण होत होते. त्याने शांता यांचा विश्वास संपादन केला. मे 2015 मध्ये मधुकर आपटे  घरी बोलावुन घेतले. त्यावेळी शांता यांच्या आई व बहिणीस तो लग्नाकरिता योग्य वाटल्याने घरातील लोकांच्या सहमतीने त्यानी लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर  आपटची घरी ये-जा   सुरु  झाली . सुरूवातीला आपटेने मुलगा थायलंडमधून मुंबईत येणार आहे. तो आधी स्वतः लग्न करणार असून त्यानंतर आपले लग्न लावून देणार असल्याचे कारण पुढे केलं. 

सप्टेंबर 2015 मध्ये आई आजारी असल्याचं सांगून त्यांनी पैशांची मागणी केली. सुरूवातीला त्यानी १ लाख रूपये दिले. त्यानंतर  आपटेने यांनी त्याच्या आईला हदयविकाराचा झटका आल्याने ऑपरेशनसाठी पैशाची मागणी केली. त्यानी पुन्हा पैसे दिले. त्याच्याकड़े लग्नाबाबत विचारणा करताच आई बरी झाल्यानंतर काही दिवसातच लग्न करु असे सांगत क़ाही दिवस टाळलं. १४ फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याने आईचे निधन झाल्याचे सांगून लग्न पुढे ढकललं. 

त्यानंतर रत्नागिरी येथे प्लॉट खरेदी करण्याच्या नावाख़ाली पैसे काढण्यास सुरवात केली. शांता यांनी आपटेला साडे नउ लाख दिले. याच दरम्यान आरटीजीएसद्वारे केलेल्या व्यवहारादरम्यान ते पैसे अरुण जाधव याच्या खात्यात गेल्याचे समोर येताच शांता यांना संशय आला. याबाबत त्यांनी आपटेकडे जाब विचारताच मुलाला या व्यवहाराबाबत समजू नये म्हणून त्यांनी मित्राच्या नावे व्यवहार केल्याचे सांगितले. तो मित्र विलेपार्ले येथील अरुण चाळीत राहत असल्याचे सांगितले. 

पुढे मार्च मध्ये लग्नाची लगबग सुरु झाली असतानाच आपटेचा फोन नॉट रिचेबल झाला. आपटेचा मोबाईल बंद लागल्याने शांता यांच्या बहिणीने विलेपार्लेतील मित्राचं घर गाठलं. मात्र त्या व्यक्तीने आपटे नावाच्या व्यक्तिला ओळखत नसल्याचं सांगितल्याने शांता यांच्या बहिणीला  धक्का बसला. हि बाब शांता यांना समजताच त्याही गोंधळल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
 

Web Title: man looted sixty years old lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.