महात्मा फुले मंडई ठरणार आकर्षणाचे केंद्र, लॅण्डस्केपिंगमुळे मंडईचे देखणेपण वाढणार

By जयंत होवाळ | Published: April 20, 2024 08:37 PM2024-04-20T20:37:15+5:302024-04-20T20:37:27+5:30

मुंबई : पुरातन वारसा असलेल्या महात्मा जोतिबा फुले मंडईचा पुनर्विकास करताना आतील भागात एक एकर क्षेत्रफळामध्ये लॅण्डस्केपिंग देखील करण्यात ...

Mahatma Phule Mandi will be the center of attraction, landscaping will increase the beauty of Mandi | महात्मा फुले मंडई ठरणार आकर्षणाचे केंद्र, लॅण्डस्केपिंगमुळे मंडईचे देखणेपण वाढणार

महात्मा फुले मंडई ठरणार आकर्षणाचे केंद्र, लॅण्डस्केपिंगमुळे मंडईचे देखणेपण वाढणार

मुंबई : पुरातन वारसा असलेल्या महात्मा जोतिबा फुले मंडईचा पुनर्विकास करताना आतील भागात एक एकर क्षेत्रफळामध्ये लॅण्डस्केपिंग देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडईचे देखणेपण वाढणार आहे. मुंबईत येणारे परदेशी पाहुणे हमखास या मंडईला भेट देतात. पुनर्विकासानंतर विक्रेते, नागरिक यांच्यासाठी वाढीव सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहे.

महात्मा जोतिबा फुले मंडईचा महापालिकेकडून पुनर्विकास करण्यात येत आहे. या कामाचा आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी त्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. याठिकाणी मासळी विक्रेत्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन अद्ययावत इमारतीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. मंडई पुनर्विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, तसेच मासळी विक्रेत्यांसाठीच्या इमारतीची उर्वरित कामे देखील लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

मंडईचा चार भागात पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यातील भाग तीन व चारचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंडईतील तळघरातील सुविधा, वाहनतळ, गाळे, विद्युतीकरण कामे, उद्वाहन व्यवस्था आदींची आयुक्तांनी पाहणी केली. इमारतीमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मासळी विक्रेत्यांसाठी शीतगृहाचीदेखील तजवीज करण्यात आली आहे. या सर्व कामांचा गगराणी यांनी तपशिल जाणून घेतला. त्याचवेळी भाग तीन व चार मधील रंगरंगोटीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुरातन वारसा असलेल्या मंडईचा पुनर्विकास करताना आतील भागात एक एकर क्षेत्रफळामध्ये लॅण्डस्केपिंग देखील करण्यात येणार आहे.

यानंतर गगराणी यांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय आवारातील भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाला भेट दिली. या वस्तुसंग्रहालयाच्या पुरातन इमारतीची देखभाल व दुरुस्ती, संरक्षणाच्या दृष्टिने जीर्णोद्धाराची कामे सुरु आहेत. या भेटीच्या निमित्ताने त्यांनी प्राणिसंग्रहालयातील क्रॉक ट्रेल (मगर आणि सुसरसाठीचे मोठे तळे), पेंग्विन कक्ष तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाला देखील भेट दिली. नाट्यगृहात अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
 

Web Title: Mahatma Phule Mandi will be the center of attraction, landscaping will increase the beauty of Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.