तिवरांची हानी : नौदल, लष्कर का असेना; कारवाई तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:26 AM2019-01-02T05:26:33+5:302019-01-02T05:30:20+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील तिवरांच्या जंगलाचे संवर्धन होण्याऐवजी तिवरांचे जंगल नष्ट होत आहे. परिणामी, तिवरांचे संवर्धन व्हावे आणि योग्य ती कारवाई व्हावी यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे.

 Loss of Thieves: Navy, Army of Asa; Action will take place | तिवरांची हानी : नौदल, लष्कर का असेना; कारवाई तर होणारच

तिवरांची हानी : नौदल, लष्कर का असेना; कारवाई तर होणारच

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील तिवरांच्या जंगलाचे संवर्धन होण्याऐवजी तिवरांचे जंगल नष्ट होत आहे. परिणामी, तिवरांचे संवर्धन व्हावे आणि योग्य ती कारवाई व्हावी यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी कोकण आयुक्त जगदीश पाटील असून, समितीच्या झालेल्या बैठकीतून ज्या ज्या जागांवरील तिवरांचे जंगल नष्ट होत आहे; त्या त्या जागांसंदर्भातील कारवाई करण्याचे निर्देश समितीने संबंधित विभागांना दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नौदल आणि लष्कराच्या परिसरातील तिवरांची हानी होत असल्याचे निदर्शनास आल्याने पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाच्या मार्वे येथील हमला आणि कुलाबा येथील सागर मठ क्लब परिसरातील तिवरांची हानी होत आहे. परिणामी, येथील तिवरांची हानी होऊ नये म्हणून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कोकण विभागाकडून पत्र दिले जाणार आहे; आणि येथील काम थांबविण्यासाठी सांगितले जाणार आहे. मुळात तिवरांच्या संरक्षणासाठी कोकण विभाग संवेदनशील असून, कोठेही तिवरांची हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. समितीने राज्य सरकारच्या गृह आणि नगर विभागालादेखील यासंदर्भातील विनंती केली असून, विनंतीनुसार स्थानिक पातळीवरील प्राधिकरणांनी याकामी पुढाकार घ्यावा. ज्या जागेवर तिवरांचे जंगल आहे त्या जागा निश्चित करण्यात याव्यात. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक महिन्याला याचा आढावा घेण्याबाबत समिती आग्रही असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने हे काम करण्यात येत आहे. ज्या जागेवरील तिवरांचे जंगल नष्ट होत आहे त्या जागेची पाहणीही समितीच्या सदस्यांकडून केली जाणार आहे.

तिवरांचे संरक्षण ही प्रमुख जबाबदारी
राज्य सरकारने तिवरांच्या संवर्धनासाठी ही समिती स्थापन केली असून, तिवरांचे संरक्षण करणे हे या समितीचे प्रमुख काम आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरात मोठ्या प्रमाणावर तिवरांची हानी होत असून, येथे कारवाई करण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आश्वासन देण्यात आले आहे.
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील तिवरांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील तिवरांची मोठी हानी होत आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या क्षेत्रातील तिवरांची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

या जागेशी संबंधित यंत्रणेला कळविण्याचे काम केले जाते. बफर झोनमध्ये काम होणार नाही याची काळजी घेतली जाते.
- जगदीश पाटील, आयुक्त, कोकण विभाग

तिवरांच्या संवर्धनासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर मी स्वत: सदस्य आहे. मुळात कसे आहे की, नौदल असो, लष्कर असो किंवा आणि कोणीही असो; ज्या परिसरात तिवरांची कत्तल होत आहे, त्या ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित आहे. सरकारने यासाठी वेगाने काम केले पाहिजे. आमची समिती तिवरांच्या संवर्धनासाठी काम करत असली तरी सर्व यंत्रणांनी आणि लोकांनी अपेक्षित सहकार्य केले पाहिजे.
- डी. स्टॅलिन,
प्रकल्प संचालक, वनशक्ती

लष्कर किंवा नौदल; कोणीही असो. प्रत्येकाने तिवरांच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे. पश्चिम उपनगरातील तिवरांचे जंगल नष्ट होत आहे. मुळात सरकारी यंत्रणांकडून अशा प्रकरणात कारवाई अपेक्षित असते. मार्वे येथील तिवरांचे जंगल मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असून, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
- गॉडफ्रे पिमेंटा,
संस्थापक, वॉचडॉग फाउंडेशन

Web Title:  Loss of Thieves: Navy, Army of Asa; Action will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई