LMOTY  2018 : समाजसेवेचा वसा घेणाऱ्या दिनकर कांबळे आणि शांतिलाल मुथ्था यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 06:44 PM2018-04-10T18:44:22+5:302018-04-10T18:45:17+5:30

आपल्या कार्याचा कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न राहता अव्याहतपणे समाजसेवा करत असलेले जीवरक्षक दिनकर कांबळे आणि पुण्यामध्ये सामाजिक कार्य करत असलेले शांतिलाल गुलाबचंद मुथ्था यंदाच्या समाजसेवा विभागातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.

Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Social Service Category Winner Dinkar Kamble & Shantilal Mutha | LMOTY  2018 : समाजसेवेचा वसा घेणाऱ्या दिनकर कांबळे आणि शांतिलाल मुथ्था यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

LMOTY  2018 : समाजसेवेचा वसा घेणाऱ्या दिनकर कांबळे आणि शांतिलाल मुथ्था यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

googlenewsNext

मुंबई - आपल्या कार्याचा कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न राहता अव्याहतपणे समाजसेवा करत असलेले जीवरक्षक दिनकर कांबळे आणि पुण्यामध्ये सामाजिक कार्य करत असलेले शांतिलाल गुलाबचंद मुथ्था यंदाच्या समाजसेवा विभागातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात दिनकर कांबळे आणि शांतिलाल मुथ्था यांना सन्मानित करण्यात आलं.

 

विजेत्यांचा अल्पपरिचय

दिनकर कांबळे  - कोल्हापूरचे जीवरक्षक दिनकर कांबळे यांचा जीवनप्रवासच तसा खडतर आणि आव्हानांवर मात करणारा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हळदी कांडगावचे दिनकर तुकाराम कांबळे सहा भावंडापैकी एक. वहिनीला बाळंतपणात हिस्टेरिया झाला आणि ती अर्धवट खणलेल्या विहिरीत पडली; कोणीही तिला बाहेर काढायला तयार होईना. शेवटी दिनकर यांनीच पेरूच्या झाडावर चढून अंदाज घेतला आणि तिचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हा ते २२ वर्षांचे होते. या घटनेनंतर त्यांनी निश्चय केला की, अशी वेळ कुणावर येऊ द्यायची नाही. तेव्हापासून त्यांनी स्वत:ला या कार्यात झोकून दिले. 

 

सातवीत असताना त्यांनी शाळा सोडली होती; पण नंतर जीवरक्षक आणि फूटपाथवर मेकॅनिकचे काम करता-करता त्यांनी दहावी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कोल्हापुरातच नव्हे तर अन्य जिल्ह्यातही जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती ओढावते, काही अघटित घडते तेव्हा पहिल्यांदा आठवण येते ती दिनकर कांबळे यांची. आपल्या जीवाची पर्वा न करता ते जिवंत अथवा मृतावस्थेत असलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम करतात.

 

अपघात, आत्महत्या, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती, पूर, माळीणची घटना, कुणकेश्वर, महाड येथील भूस्खलन, मांढरदेवसारख्या दुर्घटनांमध्ये अडकलेल्या जखमी व्यक्तींची सुटका व मृतदेह काढण्याचे कार्य त्यांनी केले. गेली २८ वर्षे ते हे काम विनामूल्य करत आहेत. त्यांनी आजवर ६५० जणांना जीवदान दिले आहे. जंगली हिंस्त्र प्राणी, पशु-पक्षी चुकून लोकवस्तीत येतात. काही कारणाने जखमी होतात. दिनकर कांबळे यांनी अशा अनेक जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले आहे. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मृत्यू पावलेले तसेच खून करून टाकलेले असे असे जवळपास ४ हजार मृतदेह काढून प्रशासनाला व नागरिकांना मदत केली आहे. हे काम करत असताना ते जवळपास नऊवेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले आहेत. ‘आपत्कालिन रेस्क्यू जीवरक्षक’ अशी त्यांची ओळख आहे. ते कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे सदस्य आहेत. राज्यातील विविध शहरांत जाऊन ते विद्यार्थ्यांना रेस्क्यू ट्रेनिंग देतात. नवे कार्यकर्ते घडावेत यासाठी त्यांनी डिझास्टर रेस्क्यू लाईफगार्ड सोसायटी या संस्थेची स्थापना केली असून प्रशिक्षणाद्वारे त्यांनी अनेक स्वयंसेवक व कार्यकर्ते घडविले आहेत. गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी अवॉर्ड (दिल्ली),राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीतर्फे ‘स्टार मेडल’, शाहू महाराज समाजजागृती पुरस्कार (नागपूर), नेहरु युवा केंद्र कोल्हापूरचा ‘युवा पुरस्कार’, जीवरक्षक सिल्व्हर मेडल ब्रेव्हरी (अकलूज) अशा विविध पुरस्कारांनी दिनकर कांबळे यांना गौरविण्यात आले आहे. 

 

शांतिलाल मुथ्था  - 

सकारात्मक सामाजिक बदलासाठी उद्यमशीलतेचे बीज पेरणारे शांतिलाल मुथ्था ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळखले जातात. अत्यंत नम्र असलेले मुथ्था गेली ३० वर्षे सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करत आहेत. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही (ता.पाटोदा) या लहानशा गावात झाला. त्यांची घरची आर्थिक परिस्थती अतिशय बेताची, सहा महिन्यांचे असतानाच आईचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे वडील प्रवरानगर साखर कारखान्यावर जाऊन, तेथील छोट्या वस्तीमध्ये किराणा दुकान चालवायचे. आईचे निधन झाल्यामुळे शांतिलाल मुथ्था यांचे ११वीपर्यंतचे शिक्षण बीड जिल्ह्यातील कडा येथे अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ या वसतिगृहामध्ये झाले. वसतिगृहामध्ये शिक्षण घेत असताना, जैन समाजातील मोठ्या विवाह सोहळ्यामध्ये वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांना वाढपी म्हणून बोलाविले जात होते व त्यातून वसतिगृहाला देणगी मिळत होती. अशा प्रकारच्या मोठ्या लग्नसोहळ्यातील वाढपीचे काम त्यांनी चार वर्षे केले. त्या वेळी जैन समाजातील विवाहप्रसंगी होणारा अवाढव्य खर्च पाहून त्यांचे मन विचलित होई. त्याच वेळी त्यांनी लग्नातील खर्च कमी करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर, वसतिगृहात प्रवेश घेऊन खासगी नोकरी करत १९७६ साली बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, इस्टेट एजंटचा व्यवसाय सुरू केला. त्यातून जनसंपर्क वाढल्यामुळे त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. ७-८ वर्षे बांधकाम व्यवसाय अतिशय सचोटीने केल्यानंतर, वयाच्या ३१व्या वर्षी आयुष्यभर सामाजिक कार्य करण्याचा निर्धार करून ते या व्यवसायातून निवृत्त झाले. लहानपणापासून विवाहातील अनावश्यक खर्च कमी व्हावा, अशी इच्छा असल्यामुळे, त्यासाठी जनजागृती आणि कौटुंबिक समस्यांवर कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह, बिना हुंड्याचे विवाह, मुलींच्या घटत्या संख्येवर जनजागृती इत्यादी कामे वेगाने सुरू केली. सुरुवातीला जैन समाजाचे २५, ५१ व १०० सामूहिक विवाह आयोजित करून, संपूर्ण महाराष्ट्रात ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ३००० कि.मी. पदयात्रा केली. त्यानंतर, महाराष्ट्रामध्ये सर्व जाती-धर्मामध्ये वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सातत्याने होऊ लागले. १९८५ साली सर्व जाती-धर्माचे ६२५ सामूहिक विवाह पुणे येथील एस.पी. प्रांगणात आयोजित करण्यात आले. बघता-बघता एका छोट्या कार्याचे रूपांतर देशभरच्या चळवळीमध्ये झाले. १९८५ साली त्यांनी भारतीय जैन संघटनेची स्थापना केली. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन १९९३ च्या लातूर भूकंपात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करीत असताना, तेथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी १,२०० भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी पुणे येथे आणले व भारतीय जैन संघटनेचा वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पातून लातूरची मुले गेल्यानंतर, मेळघाट व ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सातत्याने आणले गेले. जमू-काश्मीर भूकंपातील ५०० विद्यार्थांना शिक्षणासाठी पुण्यात आणले. गेल्या तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ६०० मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन यशस्वीपणे सुरू आहे. या विद्यार्थ्यांसाठी या प्रकल्पामध्ये ‘मेंटल हेल्थ’ विभागाची स्थापना करण्यात आली आहे. लातूर भूकंपानंतर २००१ च्या गुजरात भूकंपामध्ये त्या ठिकाणी चार महिने राहून, ३६८ शाळा बांधून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुजरात सरकारला सुपुर्द करण्यात आल्या. या माध्यमातून १ लाख २० हजार विद्यार्थांची तीन महिन्यांत शाळेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली. २००५ मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये तामिळनाडू व अंदमान-निकोबार येथे मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. जमू-काश्मीरच्या भूकंपात एका महिन्यात १५ हजार लोकांची राहण्याची व्यवस्था एनडीएमए यांच्याबरोबर करार करून करण्यात आली. नेपाळ भूकंपात तीन महिने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करण्यात आले. महाराष्ट्राच्या दुष्काळामध्ये दरवर्षी सातत्याने कार्य केले जात आहे. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावातून २० लाख क्युबिक मीटर गाळ काढून एक उच्चांक प्रस्थापित करण्यात आला. एप्रिल-मे २०१७ मध्ये ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर श्रमदान करणाऱ्या ४०० गावांमध्ये ४९० जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने कठीण काम करून दिले. सन २००३ मध्ये भारतातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी व मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. यासाठी अधिस्वीकृती, शिक्षक प्रशिक्षण, मुख्याध्यापक प्रशिक्षण, पालक व इतर घटकांबरोबर संवाद असे वेगवेगळे मोड्युल्स तयार करून, महाराष्ट्र, गोवा, अंदमान-निकोबार, गुजरात, मध्य प्रदेश, मेघालय या राज्य सरकारबरोबर करार करून, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ठोस काम करण्याची संधी प्राप्त झाली. या सर्व अनुभवातूनच मूल्य शिक्षणावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रमाची निर्मिती २००९ मध्ये झाली. बीड जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांतील ३५ हजार विद्यार्थ्यांबरोबर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. सात वर्षांत या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या मूल्यमापनातून विद्यार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडत दिसून आले. या सर्व अनुभवावरून २०१५ मध्ये मूल्यवर्धनचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने हा आराखडा २०१६ पासून ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका केंद्रात सुरू केला आहे. २०१७ मध्ये त्याची व्याप्ती १०७ तालुक्यांतील २० हजार शाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या कामी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन शासनाला विनामूल्य सहकार्य करीत आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम म्हणजे, जिल्हा परिषद शाळांतील मोठे परिवर्तन ठरणार आहे. महाराष्ट्राबरोबरच गोवा राज्याच्या सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये मूल्यवर्धन दोन वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून यशस्वी झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. 

Web Title: Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Social Service Category Winner Dinkar Kamble & Shantilal Mutha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.