म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी जूनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:11 AM2019-04-24T06:11:47+5:302019-04-24T06:12:06+5:30

निवडणूक कामांमुळे सर्वेक्षण रखडले; आढावा घेणार मे अखेरपर्यंत

List of dangerous buildings in MHADA in June | म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी जूनमध्ये

म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी जूनमध्ये

Next

मुंबई : दरवर्षी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विभागाकडून मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींचे पावसाळापूर्वी सर्वेक्षण करण्यात येते. म्हाडामार्फत दरवर्षी हे सर्वेक्षण मार्च-एप्रिल महिन्यात करण्यात येते. मात्र यंदा लोकसभेच्या निवडणुका असल्याने म्हाडातील अधिकारी आणि कर्मचारीही निवडणूक कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे आढावा घेऊन त्यानंतर इमारतींच्या नावांची घोषणा करण्यात जून उजाडणार आहे.

शहरामध्ये म्हाडाच्या या उपकर प्राप्त इमारतींची संख्या सुमारे सोळा हजार आहे. या इमारतींचा आढावा घेऊन त्याप्रमाणे त्यांची वर्गवारी करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या आढाव्यानुसार आठ इमारतींचा समावेश अतिधोकादायक इमारतींमध्ये करण्यात आला होता.
यंदा म्हाडाच्या धोकादायक, अतिधोकादाकय इमारतींचा आढावा घेण्याची ही प्रक्रिया मे अखेरपर्यंत चालणार आहे. यानंतर जूनमध्ये या इमारतींच्या नावांची घोषणा करण्यात येणार असून यापुढील प्रक्रिया यानंतर करण्यात येणार असल्याने यंदा ही प्रक्रिया बरीच लांबेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्येच जीव मुठीत घेऊन रहिवाशांना राहावे लागेल, अशी भीती रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे यादी जाहीर करूनही अनेक रहिवासी धोकादायक इमारत खाली करत नसल्याचे चित्र गेली काही वर्षे पाहायला मिळत आहे.

प्रक्रिया लांबणीवर
धोकादायक इमारती जाहीर करण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक धोरण आखले आहे. त्यानुसार इमारती अतिधोकादायक, धोकादायक तसेच दुरुस्ती करणे आदी प्रकारच्या प्रवर्गानुसार इमारतींची यादी जाहीर केली जाते. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार ज्या इमारती धोकादायक ठरल्या होत्या त्यातील काही इमारती तोडण्यात आल्या, काही रिकाम्या करण्यात आल्या तर काही इमारतींना न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली. काही इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, यंदा म्हाडातील अधिकारी आणि कर्मचारीही निवडणूक कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे आढावा घेऊन त्यानंतर इमारतींच्या नावांची घोषणा करण्यात जून उजाडणार असून एकंदरच सर्वेक्षणाची ही प्रक्रियाच लांबणीवर पडणार आहे.

Web Title: List of dangerous buildings in MHADA in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा