Jogeshwari's hostel dormitory | जोगेश्वरीतील मुलांच्या वसतिगृहाची दुरवस्था
जोगेश्वरीतील मुलांच्या वसतिगृहाची दुरवस्था

- सागर नेवरेकर 
मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील महात्मा जोतिबा फुले मुलांच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भोजनगृह आणि स्वयंपाक गृहाचे छत गळत आहे. बेसिन आणि शौचालयामध्ये बसविण्यात आलेले नळ निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यातूनही सतत पाण्याची गळती होते. विजेची उपकरणे खुली असून, त्यापासून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. अशा प्रकारच्या समस्या वसतिगृहात असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सांगितले.
समाज कल्याण विभागाचे हे वसतिगृह आहे. तसेच सावर्जनिक बांधकाम विभागाकडे वसतिगृहाच्या दुरुस्तीची जबाबदारी आहे. १४० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह असून अंध व अपंग विद्यार्थी वास्तव्यास आहेत. वसतिगृहात फक्त एक शिपाई कर्मचारी कार्यरत आहे. क्लार्कची दोन पदे रिक्त आहेत. तसेच कित्येक महिन्यांपासून गृहपालाचे पद रिक्त आहे. वसतिगृहाच्या खोल्यामध्ये पंखे व ट्युबलाईटचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, त्यातील पंचवीसहून अधिक पंखे व ट्युबलाईट्स नादुरुस्त झाली आहेत.
वसतिगृहाच्या गंभीर प्रश्नांसदर्भात अनेक वेळा संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही. वसतिगृहातील प्रश्न सुटत नसतील, तर भविष्यात विद्यार्थ्यांकडून आंदोलन छेडू, असा इशारा विद्यार्थी कृती समितीचा प्रमुख नामदेव गुलदगड यांनी दिला आहे.
याबाबत वसतिगृहाचे प्रभारी गृहपाल म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु असलेल्या या वसतिगृहाच्या दुरुस्तीकामातील काही त्रुटी सा.बां.च्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे सा.बां.कडून सांगण्यात आले आहे.
>जेवणासाठीच्या
भांड्याचाही तुटवडा
२३ जून रोजी पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. मात्र, पुन्हा वसतिगृहाच्या खोल्यामध्ये ढेकणांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची झोपमोड होत असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच विश्रांतीसाठी लागणाऱ्या गाड्या, उशा आणि जेवणासाठीच्या भांड्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
- प्रशांत एकाळ, विद्यार्थी,
महात्मा जोतिबा फुले वसतिगृह.


Web Title: Jogeshwari's hostel dormitory
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.