जेट एअरवेजच्या वैमानिकांचे काम बंद आंदोलन पुढे ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:10 AM2019-04-15T06:10:48+5:302019-04-15T06:10:59+5:30

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले असल्याने वैमानिकांमध्ये असलेल्या संतापाने उग्ररूप धारण केले आहे.

Jet Airways pilots postponed stop movement | जेट एअरवेजच्या वैमानिकांचे काम बंद आंदोलन पुढे ढकलले

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे काम बंद आंदोलन पुढे ढकलले

googlenewsNext

मुंबई : जेट एअरवेजच्या वैमानिकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले असल्याने वैमानिकांमध्ये असलेल्या संतापाने उग्ररूप धारण केले आहे. आर्थिक अरिष्टामुळे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सोमवारपासून उड्डाणे न करण्याचा निर्णय वैमानिकांची संघटना नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने घेतला होता. मात्र, सोमवारी जेटच्या व्यवस्थापनामध्ये व स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याने वैमानिकांनी संपाचा निर्णय पुढे ढकलला आहे. जेट एअरवेजला या संकटातून बाहेर येण्याची संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुंबई विमानतळाजवळील जेट एअरवेजच्या कार्यालयावर युनिफॉर्ममध्ये वैमानिक मोर्चा काढणार होते. जेटचे अध्यक्ष नरेश गोयल कंपनीतून पायउतार झाल्यानंतर जेट एअरवेजचा ताबा स्टेट बँक आॅफ इंडियाकडे गेला आहे. त्यांनी १५०० कोटी रुपये देऊन कंपनीला आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप पैसे मिळालेले नसल्याने वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले आहे. २५ मार्चला स्टेट बँकेने पैसे देण्याची घोषणा केल्यानंतर वेतन होण्यासाठी वैमानिकांच्या संघटनेने १४ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अद्यापही काही समाधानकारक तोडगा यामध्ये निघू शकला नसल्याने अखेर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय काही मार्ग उरलेला नाही, असे गिल्डचे अध्यक्ष करण चोप्रा यांनी स्पष्ट केले होते.
१ एप्रिलपासून काम बंद करण्याचा इशारा यापूर्वी गिल्डने दिला होता, मात्र ३१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत १ एप्रिलपासून काम बंद आंदोलन करण्याऐवजी १४ एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत दिल्यानंतरही वेतन झालेले नसल्याने अखेर वैमानिकांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
आता बैठकीमध्ये काही सकारात्मक निर्णय होतो का, हे पाहण्यासाठी संपाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. जेटच्या एकूण १६०० वैमानिकांपैकी सुमारे ११०० वैमानिक यामध्ये सहभागी होतील, असा दावा चोप्रा यांनी केला होता. सोमवारी होणाºया बैठकीमध्ये होणाºया निर्णयानंतर पुढील
दिशा ठरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
>दुसºया कंपनीत कमी वेतनावर काम करण्याची वेळ
जेट एअरवेजचे भवितव्य धोक्यात असल्याने वैमानिक, अभियंत्यांनी दुसºया ठिकाणी नोकरी शोधण्यास प्रारंभ केला आहे. वैमानिकांना दुसºया कंपनीत सध्याच्या वेतनापेक्षा ३० टक्के कमी वेतनावर काम करण्याची संधी देण्यात येत आहे. तर अभियंत्यांना सध्याच्या वेतनापेक्षा तब्बल ५० टक्के कमी वेतनावर नोकरी दिली जात आहे. काही कर्मचारी व अधिकारी आपली वरिष्ठता कायम ठेवण्यासाठी जेटची नोकरी सोडून दुसºया कंपनीत जाण्यासाठी तयार नाहीत. वेतन होत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडलेले आहे. जेट एअरवेजमध्ये मिळणारे वेतन इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त होते, त्यामुळे जेटमधील वैमानिक, अभियंते व इतर कर्मचाºयांना दुसºया कंपनीत कामाला जाताना कमी वेतनावर जाणे भाग पडत आहे.

Web Title: Jet Airways pilots postponed stop movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.