जुहू सिल्व्हर बीचवर आले जेलीफिश, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:15 AM2018-07-31T11:15:33+5:302018-07-31T11:16:28+5:30

मंगळवारी सकाळी जुहू सिल्व्हर बीचवर ब्लू जेली फिश आढल्यामुळे सकाळी येणाऱ्या पर्यटकांमध्ये व मॉर्निंग वॉकर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

jellyfish on juhu silver beach | जुहू सिल्व्हर बीचवर आले जेलीफिश, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जुहू सिल्व्हर बीचवर आले जेलीफिश, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गिरगाव चौपाटीवर जेलीफिश आल्यामुळे पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच आता मंगळवारी सकाळी जुहू सिल्व्हर बीचवर ब्लू जेली फिश आढल्यामुळे  सकाळी येणाऱ्या पर्यटकांमध्ये व मॉर्निंग वॉकर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सी गार्डीयन या संस्थेचे अध्यक्ष सुनील कनोजिया यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली. या बीचची कचराकुंडी झाली असून येथे गेल्या एक महिन्यापासून सुमारे 100 डंपर कचरा जमा झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी जेलीफिश सापडले असून मोठ्या प्रमाणात असलेल्या कचऱ्यामुळे येथे जास्त जेलीफिश असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या वॉकर्स, पर्यटक व नागरिकांनी बीचवर चालताना व पाण्यात जाताना काळजी घ्यावी असे आवाहन कनोजिया यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आहे.

जुहू सिल्व्हर बीचवर 100 डंपर 3 ते 4 फूट पाय येथील वाळूत जाईल इतका कचरा जमा झाल्यामुळे बीच अस्वच्छ झाला आहे.  लोकमतने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती तसेच ऑनलाईन लोकमतवरून देखील या बीचची दयनीय अवस्था विषद केली होती. मात्र येथील कंत्राटदराने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कनोजिया यांनी केला. आता येथे जेलीफिश आले म्हणून काळजी घ्या असे आवाहन पालिका प्रशासन करेल. मात्र आधी येथील 100 डंपर कचरा साफ करा असा टोला त्यांनी लगावला. गेली 10 वर्षे सी गार्डीयन या संस्थेचे अध्यक्ष सुनील कनोजिया हे सकाळी 7 वाजता जुहू सिल्व्हर बीचवर येतात आणि या बीचची आजची स्थिती काय आहे याची सविस्तर माहिती देणारे बुलेटिन, व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावरून थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन यांना पाठवतात. अनेक नागरिक व सेलिब्रेटीसुद्धा आपले सदर बुलेटिन आवर्जून पाहतात अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपूर्वी गणपती विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर जेलीफिश आल्यामुळे गणेश भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मत्स्यविभागाने केलेल्या पाहणीमध्ये गिरगाव चौपाटीवर ‘स्टिंग रे’ ही आढळले होते अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली. हे जेलीफिश गडद निळ्या रंगाचे  फुग्याच्या आकाराचे असून दरवर्षी पावसाळ्यात ते येथे समुद्रकिनारी येत असून ते गणपती विसर्जनाच्या वेळी देखील मुंबई समुद्रकिनारी आढळतात अशी माहिती त्यांनी दिली. जेलीफिश चावल्यावर गरम पाण्याचा मारा करावा असे उपचार त्यांनी सांगितले.

पालिकेच्या सेवेत लाईफगार्ड म्हणून 34 वर्षे रजनीकांत माशेलकर कार्यरत होते. आता सेवा निवृत्तीनंतर देखील ते आठवड्यातील शनिवार, रविवार व इतर दोन दिवस एक सामाजिक बांधिलकी म्हणून आकसा बीचवर बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी देवदूत म्हणून सामाजिक बांधिलकी यानात्याने आपली सेवा बजावतात. त्यांचा या जेलीफिशबद्दल खूप अभ्यास आहे. हे जेलीफिश पावसाळ्यात प्रजोत्पादनाच्यावेळी समुद्रकिनारी येतात, यंदा ते उशीरा आले. हे जेलीफिश निळ्यारंगाचे फुग्यासारखा त्यांचा आकार असून त्याच्या आत 7 ते 8 इंचाचा विषारी धागा असतो.

पाण्यात आपण गेल्यावर त्यांचा असलेला विषारी धाग्याने तो शरीरावर चाबकासारखा जोऱ्यात फटका मारतो. जर पायावर चावला यर शरीराच्या वरच्या भागात गाठ येते. जर वरच्या भागाला या जेलीफिशने डंख केला तर खालच्या भागाला गाठ येते आणि ती एक तास राहते अशी माहिती माशेलकर यांनी दिली. जेलीफिश चावल्यावर अंगाची लाहीलाही होते. समुद्रात जेलीफिशने डंख मारल्यावर मासे देखील मरतात. तर समुद्राच्या बाहेर आल्यावर हे जेलीफिश मरतात अशी माहिती माशेलकर यांनी दिली. त्यामुळे समुद्रात उतरणाऱ्या नागरिकांनी किमान पावसाळ्यात तरी गमबुट घाला असे आवाहन त्यांनी केले. समुद्राच्या या जेलीफिशच्या दंशामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, त्वचेची लाही होणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जाऊ नये असे आवाहन दोन वर्षापूर्वी गणपतीत गिरगाव चौपाटीवर जेलीफिश आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने केले होते.
 

Web Title: jellyfish on juhu silver beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई