मुंबईमध्ये बाहेरून वीज वाहून आणणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 03:45 AM2019-01-06T03:45:08+5:302019-01-06T03:46:21+5:30

वहन क्षमतेची मर्यादा : सद्य:स्थितीत फक्त बाराशे मेगावॉट वीज वाहणे शक्य

It is impossible to carry electricity from outside in Mumbai | मुंबईमध्ये बाहेरून वीज वाहून आणणे अशक्य

मुंबईमध्ये बाहेरून वीज वाहून आणणे अशक्य

Next

मुंबई : मुंबईत वीज वितरण करण्याची महावितरणची अनेक वर्षांची महत्त्वाकांक्षा असली तरी नुकत्याच पार पडलेल्या टाटा आणि बेस्ट यांच्या निविदा प्रक्रियेत पुन्हा एकदा या महत्त्वाकांक्षेला धक्का बसला आहे. कारण मुंबईला वीजपुरवठा करण्यासाठी ३२०० मेगावॉटची गरज आहे. पण बाहेरून मुंबईत वीज आणणाऱ्या वीज वाहिन्यांची क्षमता ही अवघी बाराशे मेगावॉट आहे. परिणामी, मुंबईत बाहेरून वीज आणणे अद्याप तरी अशक्य असल्याचे वीज तज्ज्ञांनी सांगितले.

मुंबईत वीज वाहून आणण्यासाठी असलेल्या वीज वाहिन्यांची क्षमता सुमारे बाराशे मेगावॉट आहे. पण जर मुंबईत बाहेरून वीज आणायची झाल्यास या वाहिन्यांची क्षमता साडेतीन हजार मेगावॉट इतकी असणे गरजेचे आहे. मुंबईमधील या वीज वाहिन्या उभारण्याचे काम महापारेषणचे असून, वीज वाहून नेण्याबाबतचे पैसे दिले तर अदानी, टाटा, बेस्ट किंवा महावितरण या कंपन्यांची वीज वाहिन्यांवरून वाहून नेता येईल. मात्र या वीज वाहिन्यांची क्षमताच केवळ हजार ते बाराशे मेगावॉट असल्याने सद्य:स्थितीमध्ये बाहेरून वीज मुंबईत वाहून आणणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबईला वीजपुरवठा करण्याच्या निर्णयापासून महावितरणला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने बेस्टला टाटा पॉवरसोबतच्या सहयोगाने १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ट्रॉम्बे थर्मल व हायड्रो केंद्रामधून पुरवठा करण्यात येणारी वीज ६७६.६९ मेगावॉटपर्यंत वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले की, बेस्टला वीजपुरवठा करता यावा म्हणून लॉट वनच्या २५० मेगावॉटसाठी साईवर्धा आणि महावितरणमध्ये स्पर्धा होती. दोघांचेही वीज दर ३ रुपये ९८ पैशांच्या आसपास आले. बेस्टने साईवर्धाकडून केवळ १०० मेगावॉट वीज घेण्याचे कबूल केले; मात्र महावितरणकडून वीज घेतली नाही. हा करार करण्यापूर्वी बेस्टने महावितरणला पत्र लिहिले की, याबाबतची महावितरणची भूमिका काय आहे? पण महावितरणने बेस्टला उत्तर दिले नाही. परिणामी, यानंतर आयोगानेही महावितरणला त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले. मात्र महावितरणने काहीच उत्तर दिले नाही. महावितरणकडून यासंदर्भातील कोणतीच भूमिका सादर केली जात नसल्याने शेवटी बेस्टने साईवर्धाशी करार केला.

मुंबईतील वीज वाहिन्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात यावा. दर तीन महिन्यांनी वीज वाहिन्यांच्या कामाचा आढावा, त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात यावा. मुंबईच्या वीज वाहिन्यांची क्षमता वाढविल्याशिवाय त्याचे जाळे सक्षम करणे अशक्य आहे. विजेच्या मागणीएवढा पुरवठा करणेही शक्य नाही. यासाठी सरकारनेही त्यांना सहकार्य करावे, असे निर्देश आयोगाने महापारेषणच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे.

महावितरण काय म्हणते?
ओपन ग्रीडमधून कोठूनही कोठे वीज वाहून नेली जाऊ शकते. समजा कोयना येथे वीजनिर्मिती केली जात असेल; आणि ती वीज येथे वाहून आणायची असेल तर ओपन ग्रीड हा पर्याय आहे. महावितरणला दक्षिण मुंबईपर्यंत वीज वाहून न्यायची असल्यास ओपन ग्रीडचा पर्याय उपलब्ध आहे. महावितरणला स्वत:चे विजेचे जाळे उभे करायचे म्हटले तर ते अंडरग्राउंड असावे किंवा टॉप असावे हा तांत्रिक विषय आहे. मात्र ओपन ग्रीडचा पर्याय उपलब्ध असल्याने कोठूनही कोठेही वीज वाहून नेण्याबाबत अडचणी येत नाहीत.

मुंबईला टाय लाइनची समस्या आहे. मुंबईमध्ये अतिरिक्त वीज वाहून नेण्याची मोठी समस्या आहे. मुंबईमध्ये टाटाची वीज बंद पडली तर समस्या आणखी वाढू शकते. मुंबईला महावितरणने जरी पूर्ण वीज द्यायची ठरविले तरी त्यांना ती वीज देता येणार नाही. कारण वीज वाहून नेणारी पारेषण वाहिन्यांची तेवढी क्षमता नाही.
- अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ
१ एप्रिल २०१९ पासून सुरू होणाºया पाच वर्षांच्या कालावधीसाठी बेस्टने त्यांच्या ग्राहकांसाठी २०१७-१८ मध्येच ऊर्जा सहयोगाची प्रक्रिया सुरू केली होती. बेस्ट व टाटा पॉवर यांच्यामधील ६७७ मेगावॉटचा विद्यमान ऊर्जा सहयोग ३१ मार्च २०१९ रोजी संपणार आहे. आता नव्या कराराद्वारे या सहयोगामधून ग्राहकांना स्वस्तात वीज प्राप्त होईल.
- प्रवीर सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा पॉवर

महावितरणचे जाळे कांजुरमार्ग ते मुलुंडपर्यंत मर्यादित
च्टाटा पॉवरचे स्वत:चे विजेचे जाळे मुंबईत आहे. टाटाचे ट्रॉम्बे येथे वीज निर्मिती केंद्र असून, तेथे निर्माण केली जाणारी वीज त्यांना स्वत:च्या विजेच्या जाळ्यातून आवश्यक ठिकाणी पोहोचविता येते. अदानीचा विचार करता त्यांचे वीजनिर्मिती केंद्र मुंबईलगत
असून पूर्व आणि पश्चिम
उपनगरात त्यांचे स्वत:चे विजेचे जाळेही आहे.
च् महत्त्वाचे म्हणजे टाटादेखील उपनगरात काही ठिकाणी अदानीच्या विजेच्या जाळ्याचा वापर वीज वहनासाठी करते. टाटाला त्या मोबदल्यात अदानीला व्हिलिंग चार्जेस द्यावे लागतात. महावितरणचा विचार केला तर मुंबईत त्यांच्या विजेचे जाळे केवळ कांजूरमार्ग ते मुलुंड या परिसरात आहे. मुंबईत इतरत्र महावितरणचे विजेचे जाळे नाही.

Web Title: It is impossible to carry electricity from outside in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई