प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईकरांना हाक, अंनिस, आवाज फाउंडेशनचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 03:43 AM2018-11-04T03:43:10+5:302018-11-04T03:43:26+5:30

दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांना ध्वनी आणि वायुप्रदूषणाने घेरले आहे. त्यात आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली आहे़ फटाक्यांमुळे होत असलेल्या ध्वनी आणि वायुप्रदूषणावर सातत्याने चर्चा झडत आहेत.

Invitation of Hawk, Annyis and Voice Foundation to pollution-free Diwali Mumbaiites | प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईकरांना हाक, अंनिस, आवाज फाउंडेशनचे आवाहन

प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईकरांना हाक, अंनिस, आवाज फाउंडेशनचे आवाहन

googlenewsNext

मुंबई  - दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांना ध्वनी आणि वायुप्रदूषणाने घेरले आहे. त्यात आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली आहे़ फटाक्यांमुळे होत असलेल्या ध्वनी आणि वायुप्रदूषणावर सातत्याने चर्चा झडत आहेत. मात्र केवळ चर्चा न करता भविष्याचा विचार करत दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्यात यावी, असे आवाहन ‘आवाज’ आणि ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने केले आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर मुंबईकरांनी भर द्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.
सर्वसाधारणरीत्या दररोजच्या आवाजाचा विचार करता आवाजाची पातळी ५५-६० डेसिबलच्या वर गेली तर मनुष्याला त्रास होतो. दुसरीकडे सुतळी बॉम्बसारखे फटाके तर शंभर डेसिबलपेक्षा अधिक आवाज करतात. परिणामी, ध्वनी आणि वायुप्रदूषणाला सामोरे जावे लागते. ध्वनिप्रदूषणामुळे ताणतणाव, उच्च रक्तदाब, श्रवण दोष, निद्रा नाश अशा आजारांना सामोरे जावे लागते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना आवाजामुळे त्रास उद्भवतात. फटाक्यांच्या आवाजामुळे पशुपक्ष्यांना त्रास होतो. दिवाळी साजरी करताना फटाके वाजविल्यानंतर त्यातून बाहेर येत असलेला कार्बन मोनो आॅक्साईड, कार्बन डाय आॅक्साईड, नायट्रोजन ट्राय आॅक्साईड, नायट्रोजन डाय आॅक्साईड, मॅग्नेशियम ट्राय आॅक्साईड, मॅग्नेशिअम डाय आॅक्साईड, मॅग्नेशियम सल्फर आणि मॅग्नेशियम पेंटा आॅक्साईड यांसारख्या वायूंमुळे हानी होते. परिणामी, यावर सारासार विचार करत पर्यावरणासह मनुष्यप्राण्याची हानी होणार नाही याची दक्षता बाळगत दिवाळी साजरी करण्यात यावी, असे आवाहन ‘आवाज’ आणि ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोकण विभागाचे राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशिलकर यांच्या म्हणण्यानुसार, फटाक्यांमुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण होते. कोणताही पदार्थ जळताना कार्बन डाय आॅक्साईड बाहेर टाकत असतो. वायुप्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कांदिवली येथे नरवणे शाळेमध्ये फटाकेमुक्त दिवाळी अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना सुनीता देवलवार यांनी माहिती दिली. मालाड येथील डी. ए. व्ही. शाळेत फटाकेमुक्त दिवाळीसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

फटाके काय करतात...
फटाके प्रदूषण करतात, दुर्घटना घडल्यास आग लावतात, कानठळ्या देतात, शरीराला अपाय करतात, श्वसनाचे विकार देतात.

मानवी आरोग्य धोक्यात़़़
आवाजामुळे वयोवृद्ध व लहान मुलांना त्रास होतो हे सर्वज्ञ आहे़ तरीही दिवाळीत फटाके फोडताना कोणतेही निर्बंध पाळले जात नाहीत़ सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होते़ याविषयी आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमेरा अब्दुलाली यांनी उच्च न्यायालयातही याचिका केली आहे़ मात्र अद्यापही फटाक्यांचा वापर होतोच आहे़ आवाजावर नेमके कसे निर्बंध घातले जाऊ शकतात याविषयी त्यांच्याशी केलेली बातचित़

ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे?
मुंबईसह देशात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. फटाके वाजविल्याने निर्माण होणाऱ्या आवाजाने ध्वनी आणि धुरामुळे वायुप्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. फटाके वाजवून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. त्याचबरोबर अनेकांना विविध आजारांची लागण होते. त्यामुळे लोकांनी फटाक्यांविषयी जागरूक होणे आवश्यक आहे. स्वत:ला आणि दुसºयांच्या आरोग्याला फटाक्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक होऊन फटाके वाजविता कामा नये.

‘हरित फटाके’ बाजारात आहेत का?
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांऐवजी ‘हरित फटाके’ वाजविण्यास परवानगी दिली आहे. मात्र मुंबईतील बाजारातपेठेमध्ये कुठेही हरित फटाके दिसून आले नाहीत. त्याचबरोबर चेंबूर येथे फटाक्यांची चाचणी करण्यात आली. तेव्हादेखील कोणताही फटाका हरित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले नाही. पर्यावरणपूरक फटाके सध्यातरी बाजारात उपलब्ध नाहीत. प्रत्येक फटाक्यामुळे प्रदूषण होत आहे. फटाक्यांमधील रासायनिक घटकांमुळे प्रदूषण जास्त प्रमाणात होत आहे.

मागील पाच वर्षांच्या आवाज फाउंडेशनच्या अहवालातून काय सिद्ध होत आहे?
आवाज फाउंडेशन मागील १८ वर्षांपासून ध्वनिप्रदूषणावर काम करीत आहे. फटाक्यांमुळे आवाजाची मर्यादा ओलांडली जाऊन याचा परिणाम नवजात बालके, गरोदर स्त्री, आबालवृद्ध यांना होतो. यासह हृदयरोगाची समस्या, फुप्फुसांचे आजार, श्वासासंबंधी समस्या यांना सामोरे जावे लागते. आवाज फाउंडेशनने आवाजाची मर्यादा ओलांडून जाऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहे. मागील काही वर्षांच्या अहवालात फटाक्यांची आवाजाची पातळी १४० डेसिबलच्या पुढे जात होती. मात्र आता २०१८ च्या अहवालानुसार आवाजाची पातळी ११३ डेसिबलपर्यंत पोहोचली आहे. आवाज फाउंडेशनची ही यशस्वी घोडदौड आहे. परंतु ११३ डेसिबल आवाजाची पातळी मानवी आरोग्यासाठी घातक असून फटाक्यांचा आवाज कमी होणे आवश्यक आहे.

धर्म आणि फटाके यांचा संबंध लावणे योग्य आहे का?
धर्म आणि फटाके यांचा संबंध लावणे चुकीचे आहे. कोणताही धर्म मानवी आरोग्य चांगले राहावे, दुसºयाबद्दल प्रेमाची भावना ठेवणे यांची शिकवण देतो. शांती, सुख, आनंद, मनन यांची शिकवण देतो. मात्र फटाक्यांमुळे ही शिकवण मागे जात आहे. फटाक्यांमुळे स्वत:सह दुसºयांच्या आरोग्याला त्रास होतो. नागरिक आपल्या पाल्यांच्या हातात धोकादायक फटाके सोपवत आहेत. त्यामुळे हानी होण्याची भीती आहे. फटाके वापरणे नागरिकांनी स्वत:हून बंद केले पाहिजे. सरकारने नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. तेव्हाच प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग मोकळा होईल.

मुंबईतील प्रदूषणात वाढ होतेय?
मुंबई धूरक्याच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे मुंबईतील वातावरण मानवी आरोग्यासाठी योग्य नाही. यामध्ये फटाक्यांची भर पडल्यास मुंबईतील प्रदूषणात आणखी वाढ होण्याची भीती आहे. हिवाळ्यात धूक्याचे प्रमाण वाढते. धुक्यामध्ये फटाक्यांचा धूर आणि रासायनिक कण एकत्र जमतात. त्यामुळे श्वास घेताना मानवाला त्रास संभवू
शकतो.
 

Web Title: Invitation of Hawk, Annyis and Voice Foundation to pollution-free Diwali Mumbaiites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.