आत्महत्येचा तपास सीआयडीकडे, ‘त्यावेळी’ चार गार्ड कोठडीत होते तैनात, गुन्हे शाखेला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:49 AM2024-05-03T06:49:00+5:302024-05-03T06:49:11+5:30

सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने सागर पाल (२१), विकीकुमार गुप्ता (२४), सोनूकुमार बिश्नोई (३५) आणि अनुज थापन यांना बेड्या ठोकल्या होत्या.

Investigation of suicide by CID at that time four guards were posted in custody | आत्महत्येचा तपास सीआयडीकडे, ‘त्यावेळी’ चार गार्ड कोठडीत होते तैनात, गुन्हे शाखेला धक्का

आत्महत्येचा तपास सीआयडीकडे, ‘त्यावेळी’ चार गार्ड कोठडीत होते तैनात, गुन्हे शाखेला धक्का

मुंबई : सलमान खान गोळीबार प्रकरणातील कुख्यात बिश्नोई टोळीतील आरोपी अनुज थापन (२३) कोठडी आत्महत्या प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) गुरुवारी वर्ग करण्यात आले आहे.  आत्महत्याप्रकरणात सीआयडीसह न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. सीआरपीसी कायद्याच्या कलम १७४ अन्वये सीआयडी तपास करत आहे, तर, सीआरपीसी कायद्याच्या कलम १७६ अन्वये न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे कोठडीत सुरक्षेसाठी चार गार्ड तैनात असतानाही घटना घडल्याने गुन्हे शाखेला मोठा धक्का बसला आहे.

सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने सागर पाल (२१), विकीकुमार गुप्ता (२४), सोनूकुमार बिश्नोई (३५) आणि अनुज थापन यांना बेड्या ठोकल्या होत्या. पोलिस कोठडीतील आरोपी गुप्ता, पाल आणि थापन यांना गुन्हे शाखेने मुंबई पोलिस आयुक्तालयातील कोठडीत ठेवले होते. मुंबई पोलीस आयुक्तालयातील ज्या कोठडीत अनुज थापन याला ठेवण्यात आले होते. तेथे आर्थिक गुन्हे शाखेचे आणि गुन्हे शाखेचे आरोपी एकत्र ठेवण्यात आले होते.

कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

मृतदेहाचा इंक्वेस्ट पंचनामा केल्यानंतर गुरुवारी दुपारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सर जे. जे. रुग्णालयात करण्यात आले. याचे नमुने पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सीआयडीने कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीआयडीकडून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

मृतदेहाचे विच्छेदन

 सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनुजकुमार थापन याने बुधवारी तुरुंगाच्या आवारातच गळफास लावून आत्महत्या केली.

 त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात आणण्यात आला असून, गुरुवारी व्हिडीओ चित्रीकरण करून विच्छेदन प्रक्रिया पार पडली.

 प्रथमदर्शनी अहवाल कळू शकला नसला तरी अधिक तपासासाठी मृतदेहाचा व्हिसेरा जतन करून ठेवण्यात आला आहे.  शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल येण्यात काही दिवस लागणार असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.

तपासात सहकार्य करत होता...

अनुज थापन हा पोलिस अभिलेखावरील आरोपी होता. मुंबई पोलिसांनी अटक करण्याच्या आधी पंजाबमधील स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करत गुन्ह्याशी संबंधित आवश्यक माहिती घेण्यात आली होती. तसेच, त्याच्याकडे आणखी चौकशी बाकी होती. तो तपासात ठिकठाक सहकार्य करत होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तर, सुरक्षा आणि देखरेखीसाठी चार पोलिसांना गार्ड म्हणून तैनात करण्यात आले होते. एवढा बंदाेबस्त असताना थापन याने कोठडीतील शौचालयात सतरंजीच्या फाडलेल्या पट्टीच्या सहाय्याने खिडकीच्या जाळीला गळफास लावून आत्महत्या केली.  याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. सीआयडीकडून सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून, त्याच्यासोबत असलेल्या कोठडीतील सर्व आरोपींची चौकशी हाेणार आहे.

Web Title: Investigation of suicide by CID at that time four guards were posted in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.