आमदारकीसाठी अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 02:00 AM2019-06-04T02:00:45+5:302019-06-04T02:00:58+5:30

लोकसभेच्या निकालानंतर आमदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

Internal marches for MLAs begin ... | आमदारकीसाठी अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू...

आमदारकीसाठी अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू...

Next

मनीषा म्हात्रे
विधानसभा । भांडुप

उत्तर पूर्व मुंबईतील भांडुप विधानसभा क्षेत्रात लोकसभेच्या निकालानंतर आमदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सेनेच्या अंतर्गत युद्धाबरोबरच भाजप उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत; तर वंचितसह मनसे, आघाडीच्या उमेदवारांनीही स्थानिक पातळीवर काम सुरू केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात मनोज कोटक यांनी सव्वादोन लाखांच्या फरकाने विजय मिळवत, ५ लाख १४ हजार ५९९ मते घेतली. त्यापैकी भांडुप विधानसभामधून त्यांना ९७ हजार ३५२ मते मिळाली. संजय पाटील यांना ५१ हजार ४०३ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या निहारीका खोंदले यांनीदेखील ९ हजार ३८६ मते मिळविली. भांडुपचे रहिवासी असलेले पाटील यांना भांडुप नेहमीच डेंजर झोन राहिले आहे. सेनेच्या पाठिंब्याबरोबरच भाजपच्या वर्चस्वामुळे कोटक यांनी भांडुपमध्येही बाजी मारली.

भांडुप ही कुशल, अकुशल औद्योगिक कामगारांची वस्ती. लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरील औद्योगिक पट्ट्यात हातावर पोट असलेल्या श्रमिक वर्गाने जागा मिळेल तिथे केलेली वस्ती. मधल्या काळात येथील एपीआय, जीकेडब्ल्यू आणि अन्य बंद पडलेल्या कंपन्यांच्या मोकळ्या जागेत गगनचुंबी गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. तेथे राहण्यासाठी आलेले लोक बहुभाषिक आहेत. मात्र, आजही एकूण विचार करता, भांडुपमध्ये मराठी आणि त्यातही कोकणाशी संबंध सांगणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

त्याच जोरावर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या या मतदारसंघाला २००९ मध्ये खिंडार पाडले. २००९च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेच्या शिशिर शिंदे यांनी १.९५ लाख मते घेतली. यात राष्ट्रवादीचे संजय पाटील यांचा विजय झाला. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतील भांडुपसह विक्रोळी, घाटकोपर पश्चिम मतदारसंघ मनसेने काबीज केले. त्यानंतर, मनसेची हळूहळू पिछेहाट सुरू झाली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सोमय्या येथून तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. भांडुपमधून त्यांना ६५ हजारांची आघाडी मिळाली होती.

सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्र लढले. त्यात स्थनिक शिवसैनिकांची इच्छा न जुमानता सेनेने माजी नगरसेवक अशोक पाटील यांना उमेदवारी दिली. भाजपनेही मुलुंडचे रहिवासी असलेल्या मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते नाराज होते. या लढतीत सेनेचा अगदी निसटता विजय झाला होता.

आता युती कायम राहिल्यास सेना ही जागा घेणार. त्यात सेनेचे स्थानिक आमदार अशोक पाटील पुन्हा एकदा आमदारकीसाठी सज्ज आहेत. त्याच बरोबरीने सेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकरही त्याच जोमाने प्रयत्नशील आहेत. कोटक यांच्या प्रचारात भांडुपमध्ये ते सर्वांत पुढे होते. मात्र, त्यांना आतापर्यंत डावलण्यात आले आहे. त्यामुळे यंदा तरी संधी मिळते की नाही? याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.
त्यात, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच मनसे पुन्हा एकदा तयारीला लागली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ते किती प्रभाव पाडतील, हे पुढील राजकीय घडामोडींतून स्पष्ट होईल.

वंचितनेही या भागातून ९ हजार मते घेतली. मुंबईतील ६ लोकसभांपैकी वंचितच्या उमेदवाराला उत्तर पूर्व मुंबईत सर्वाधिक मते मिळाली. त्यात भांडुपमध्येही त्यांनी ९ हजार मते घेतली. त्यामुळे त्यांनीही आखणी सुरू केली आहे.

Web Title: Internal marches for MLAs begin ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.