‘कोविशिल्ड’चे ४३५ कोटी रुपये प्रताप पवार यांना कसे मिळाले? किरीट सोमय्या यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 05:45 AM2024-01-16T05:45:26+5:302024-01-16T07:07:28+5:30

किरीट सोमय्या म्हणाले की, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ही एक फ्रंट कंपनी असून, त्या कंपनीला कोव्हीशिल्ड विक्रीतील ४३५ कोटी रुपये देण्यामागे काय व्यावसायिक अट होती किंवा असे का केले, याची माहिती नाही.

How did Pratap Pawar get Rs 435 crores of 'Covishield'? Question by Kirit Somaiya | ‘कोविशिल्ड’चे ४३५ कोटी रुपये प्रताप पवार यांना कसे मिळाले? किरीट सोमय्या यांचा सवाल

‘कोविशिल्ड’चे ४३५ कोटी रुपये प्रताप पवार यांना कसे मिळाले? किरीट सोमय्या यांचा सवाल

मुंबई : कोरोनाकाळात अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड ही लस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात विकली गेल्यानंतर त्या विक्रीतील ४३५ कोटी रुपये शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीला कसे मिळाले, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यासंदर्भात त्यांनी कंपनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच काही कागदपत्रांची पाहणी करत हे आरोप केले आहेत. 

किरीट सोमय्या म्हणाले की, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ही एक फ्रंट कंपनी असून, त्या कंपनीला कोव्हीशिल्ड विक्रीतील ४३५ कोटी रुपये देण्यामागे काय व्यावसायिक अट होती किंवा असे का केले, याची माहिती नाही. मात्र, मार्च २०२१ मध्ये हे ४३५ कोटी रुपये अदर पूनावाला यांच्या कंपनीने पवारांच्या निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीमध्ये रिडीमेबल प्रेफरन्स कॅपिटल मार्गे ६ टक्के दराने सबस्क्राईब केले. रिडीमेबल प्रेफरन्स याचा अर्थ ज्या कंपनीला पैसे दिले त्या कंपनीची इच्छा झाली तर त्यांनी व्याज अथवा लाभांश ज्या कंपनीकडून पैसे घेतले त्यांना द्यायला हवे. 

सोमय्या आज दिल्लीत जाऊन तक्रार करणार 
या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारत सरकारचे कंपनी मंत्रालयाकडे करणार असून, ‘ईडी’नेदेखील चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष देण्याचे मान्य केल्याचेही ते म्हणाले. तर, मंगळवारी सोमय्या दिल्लीत जाऊन कंपनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून या प्रकरणाची अधिक माहिती घेणार आहेत.

३०० कोटी रुपये दुसऱ्या कंपनीमध्ये वळवले?
२०२१-२२ मध्ये निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने सीरम इन्स्टिट्यूटला एकही रुपयाचे व्याज अथवा लाभांश दिलेला नाही. विशेष म्हणजे, या ४३५ कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये प्रताप पवार यांनी आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये वळवल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. 
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या संचालक मंडळात मृणालिनी अभिजित पवार, भारती प्रताप पवार, जयदीप दिलीप माने तर शुभम नरेश परदेशी हे कंपनी सेक्रेटरी आहेत.

Web Title: How did Pratap Pawar get Rs 435 crores of 'Covishield'? Question by Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.