बोरीवली किंवा कांजूरमध्ये गिरणी कामगारांसाठी घरे; म्हाडाचे महत्त्वपूर्ण पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:36 AM2018-11-01T05:36:42+5:302018-11-01T05:37:05+5:30

बोरीवलीमधील म्हाडाच्या जागेवर किंवा कांजूरमार्ग येथील खार जमिनीवर गिरणी कामगारांसाठी गृहप्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

Homes for Mill Workers in Borivali or Kanjur; MHADA Important Steps | बोरीवली किंवा कांजूरमध्ये गिरणी कामगारांसाठी घरे; म्हाडाचे महत्त्वपूर्ण पाऊल

बोरीवली किंवा कांजूरमध्ये गिरणी कामगारांसाठी घरे; म्हाडाचे महत्त्वपूर्ण पाऊल

Next

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरासाठीच्या लॉटरीत १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांनी अर्ज भरले आहेत. यातील ज्या गिरणी कामगारांना लॉटरीत घर लागेल त्यांच्यासाठी म्हाडाने आता जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. बोरीवलीमधील म्हाडाच्या जागेवर किंवा कांजूरमार्ग येथील खार जमिनीवर गिरणी कामगारांसाठी गृहप्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

गिरणी कामगारांच्या घरांसाठी अनेक गिरणी कामगार संघटना गेली अनेक वर्षे म्हाडाविरोधात लढा देत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी म्हाडा अध्यक्षांनी नुकतीच गिरणी कामगारांच्या नेत्यांची म्हाडात बैठक बोलावली होती. या वेळी कामगार नेत्यांनी आपल्या समस्या मांडल्या. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले की, आजपर्यंत घरांसाठी १ लाख ७५ हजार कामगारांनी अर्ज केले आहेत. लॉटरीत एका वर्षाला एक हजार घरे मिळत असतील तर सर्व कामगारांना घरे मिळण्यासाठी १७५ वर्षे लागतील. त्यामुळे म्हाडाने आधी घरांची नुसती लॉटरी न काढता त्या घरांची जागा उपलब्ध करावी, असे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडा अध्यक्षांनी गिरणी कामगारांच्या घराबद्दल तातडीने पावले उचलण्यासाठी बोरीवलीमधील प्राधिकरणाची जागा किंवा कांजूरमार्गमधील खार जमिनीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. येत्या काही दिवसांतच म्हाडाची मंजुरी मिळाल्यानंतर या दोन ठिकाणांपैकी एका ठिकाणी गिरणी कामगारांच्या घरांसाठी गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू होईल, अशी ग्वाही खुद्द उदय सामंत यांनी दिली आहे.

...तर शासकीय जमीन उपलब्ध करून देणार
या बैठकीदरम्यान गिरणी कामगारांकडून म्हाडाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. ट्रान्झिट कॅम्पसाठी बांधलेली घरे तसेच म्हाडाने बांधलेल्या अन्य योजनेतील घरे गिरणी कामगारांना प्राधान्याने मिळाली पाहिजेत, अशी मागणी गिरणी कामगारांनी केली. बैठकीला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे सभापती विनोद घोेसाळकरदेखील उपस्थित होते. उपरोक्त दोन जागांवर घरांचे प्रकल्प उभे न राहिल्यास मुंबई उपनगरात शासकीय जमीन उपलब्ध करण्याचाही प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी गिरणी कामगारांना दिले.

Web Title: Homes for Mill Workers in Borivali or Kanjur; MHADA Important Steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.