भाडोत्री मातेला हायकोर्टाने दिली गर्भपाताची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:20 AM2018-12-30T00:20:21+5:302018-12-30T00:20:55+5:30

पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात अनेक व्यंगे आहे व असे मूल जन्माला आले तर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतील.

Hired Maternity HC granted miscarriage permission | भाडोत्री मातेला हायकोर्टाने दिली गर्भपाताची परवानगी

भाडोत्री मातेला हायकोर्टाने दिली गर्भपाताची परवानगी

Next

मुंबई: पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात अनेक व्यंगे आहे व असे मूल जन्माला आले तर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतील. तरीही ते मूल दगावण्याची शक्यताच अधिक आहे, असा अभिप्राय तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एका भाडोत्री मातेस गर्भारपणाच्या २४ व्या आठवड्यात गर्भपात करून घेण्याची परवानगी दिली.
सुटीकालीन न्यायाधीश न्या. भारती हरीष डांगरे यांनी शुक्रवारी हा निकाल दिल्यानंतर त्यानुसार ही भाडोत्री माता शनिवारी पुण्याच्या ससून इस्पितळात दाखल झाली. तेथे तिच्यावर गर्भपात करण्यापूर्वीच्या चाचण्या व अन्य प्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून एक दोन दिवसांत प्रत्यक्ष गर्भपात केला जाईल.
ही भाडोत्री माता मुळची बुलढाणा जिल्ह्यातील वरवंड गावची आहे. ती ज्यांचे मूल भाडोत्र माता म्हणून उदरी वाढवत आहे ते दाम्पत्य पुण्यातील आहे. या तिघांमध्ये भाडोत्री मातृत्वाने मूल जन्माला घालण्याविषयी यंदा १९ मार्च रोजी रीतसर करार झाला. त्यानुसार प्रयोगशाळेत गर्भ तयार करून त्याचे रोपण या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात केले गेले.
या गर्भारपणाचा सहावा महिना सुरु असताना नियमित वैद्यकीय तपासण्यांमध्ये गर्भात व्यंग असल्याचे दिसून आले. परंतु कायदेशीर गर्भपात करण्याची कालमर्यादा उलटून गेल्याने या भाडोत्री मातेने न्यायालायत याचिका केली. ससून इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांनी गर्भपातास अनुकुलता दर्शविणारा वरीलप्रमाणे अहवाल दिला. भाडोत्री मातेस या अवस्थेत गर्भपात करून घेण्यातील धोके समजावून सांगितल्यानंतर आणि ती ज्यांचे मूल उदरी वाढवत आहे त्या भावी पित्याचीही संमती घेतल्यानंतर न्यायालयाने गर्भपातास तातडीने परवानगी दिली.
या सुनावणीत याचिकाकर्त्या भाडोत्री मातेसाठी अ‍ॅड. नेहा
फिलिप यांनी, मुलाच्या जैवित माता-पित्यांतर्फे अ‍ॅड. शिल्पा कपिल यांनी तर सरकारतर्फे सहाय्यक
सरकारी वकील निशा मेहरा ायंनी काम पाहिले.

एक आठवड्यात निर्णय
या प्रकरणाचे गांभीर्य व निकड लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने तातडीने एक आठवड्यात याचिकेवर निकाल दिला. १९ डिसेंबर रोजी केलेली ही याचिका सुरुवातील न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. डांगरे यांच्या खंडपीठापुढे आली. नाताळाची सुटी सुरु होण्यापूर्वी खंडपीठाने या भाडोत्री मातेची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तापसणी करून अहवाल देण्याचा आदेश दिला. तो अहवाल २७ तारखेला प्राप्त झाला. सुटीकालीन न्यायाधीश म्हणून न्या. डांगरे यांच्याकडेच काम असल्याने तातडीने पुढील आदेश दिले.

Web Title: Hired Maternity HC granted miscarriage permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.