मराठी माणसाच्या मुंबईत वाढलाय हिंदी टक्का; निवडणुकीत ठरणार हुकमी एक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 11:53 AM2019-02-11T11:53:12+5:302019-02-11T12:03:23+5:30

असंख्य बेटांपासून बनलेल्या मुंबई शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळातील बॉम्बेचे मुंबई नामकरण, त्याला असलेला मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी राज्याची राजधानी ही मुंबईची ओळख आता हळूहळू पुसट होत चालली आहे.

Hindi population increased in Mumbai; Will play Big role in upcoming elections | मराठी माणसाच्या मुंबईत वाढलाय हिंदी टक्का; निवडणुकीत ठरणार हुकमी एक्का

मराठी माणसाच्या मुंबईत वाढलाय हिंदी टक्का; निवडणुकीत ठरणार हुकमी एक्का

googlenewsNext

मुंबई : असंख्य बेटांपासून बनलेल्या मुंबई शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळातील बॉम्बे ते मुंबई नामकरण, त्याला असलेला मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी राज्याची राजधानी ही मुंबईची ओळख आता हळूहळू पुसट होत चालली आहे. याच मराठी माणसांच्या मुंबईचा हिंदी भाषिकांचे शहर म्हणून प्रवास सुरु आहे. याचा परिणाम हा लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीवरही होताना दिसला आहे. मराठीचा टक्का घसरल्याने शिवसेनेला भाजप वरचढ ठरत आहे. याबाबतचे चित्र गेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. 


2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार मातृभाषेमध्ये हिंदी भाषिकांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढला आहे. 2001 मध्ये ही संख्या २५.८८ लाख होती, तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली आहे. म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली आहे. तर मराठी भाषिकांमध्ये 2.64 टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. 2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत. 


ही लोकसंख्या 2011 मधील असली तरीही गेल्या 8 वर्षांमध्ये मराठी भाषिकांचा उपनगरांकडे प्रवास वाढला आहे. यामुळे 2021 च्या जनगणनेमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे. मुंबईचा आर्थिक राजधानीचा प्रवास हा सूत गिरण्यांपासून सुरु झाला होता. यानंतर इतर उद्योगधंदे वसले. याला लागणारे मनुष्यबळ कोकणातून जास्त आणि उर्वरित महाराष्ट्रातून मिळाले. यामुळे गेल्या तीन चार दशकांपूर्वी मुंबईत मराठी भाषिकांच्या टक्का कमालीचा वाढला होता. मुंबईत जन्मलेली बाळासाहेब ठाकरेंचीशिवसेना कोकणात यामुळेच फोफावली होती. मुंबईत स्थिरस्थावर झालेला व्यक्ती 'चाकरमानी इलो'च्या हाकेने कोकणातील गावांत भाव खाऊन जायचा. निवडणुका आल्या की याच चाकरमान्यांकडून कोकणात शिवसेनेचे संदेश जायचे. यामुळे शिवसेना मुंबईसोबत कोकणातही जोमाने वाढली. 


शिवसेनेकडे मुंबई महापालिका गेल्या दोन दशकांपासून आहे. देश तुमचा, मुंबई आमचीच; या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भुमिकेमुळे गेल्या लोकसभेपर्यंत लहान भावाच्या भुमिकेत असलेल्या भाजपाने आज हिंदी भाषिकांच्या जोरावर शिवसेनेला टक्कर देण्यास सुरुवात केली. कारण मराठी मतांचा टक्का कमी होत गेला आणि हिंदी भाषिकांचा वाढला. काही वर्षांपूर्वी आमदार, खासदार शिवसेना आणि काँग्रेसचे होते. तेव्हा हिंदी भाषिकांनी काँग्रेसला जवळ केले होते. मात्र, भाजपाने शिवसेनेची एकीकडे मदत घेत दुसरीकडे गुजराती, उत्तर भारतीय, बिहार अशी हिंदी भाषिकांची मोट बांधली आणि शिवसेनेला टक्कर देण्यास सुरुवात केली. यामुळे गेल्या महापालिका निवडणुकीत अवघ्या काही जागांनी भाजपाची सत्ता येतायेता राहिली. 


मराठी मतदार उपनगरांत सुखावला
मुंबईतील जागांचे भाव गगनाला भिडल्याने मराठी भाषिकांनी आपली घरे, जागा विकून ठाणे, कल्याण, पनवेल या भागात मोर्चा वळविला. ठाणे जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या ८०.४५ टक्के तर रायगड जिल्ह्यात ८७ टक्के आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील मराठी टक्का घटला. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेनेला बसला आहे. त्यातच शिवसेनेतून राज ठाकरेंनी बाहेर पडत मनसे पक्ष स्थापल्याने मराठी मतांमध्ये फूट पडली. या गोष्टी भाजपाच्या पथ्यावर पडल्या आहेत. यामुळे मुंबईतून पुढील काळातही हे हिंदी भाषिक भाजपासाठी हुकमी एक्का ठरणार आहेत.

Web Title: Hindi population increased in Mumbai; Will play Big role in upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.