जादूटोणा केल्याप्रकरणी गुरूमाँला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 06:11 AM2019-07-20T06:11:35+5:302019-07-20T06:11:41+5:30

जादूटोण्याद्वारे फसवणूक केल्याच्या आरोपाखाली किरण दारुवाला उर्फ गुरू माँला (५०) ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

Gurumala arrested for witchcraft | जादूटोणा केल्याप्रकरणी गुरूमाँला अटक

जादूटोणा केल्याप्रकरणी गुरूमाँला अटक

Next

मुंबई : बारा वर्षांच्या तपानंतर साईबाबांशी थेट संपर्क करू शकत असल्याचे सांगून, जादूटोण्याद्वारे फसवणूक केल्याच्या आरोपाखाली किरण दारुवाला उर्फ गुरू माँला (५०) ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. जादूटोण्याच्या विधीदरम्यान तिने अश्लील वर्तन केल्याचा आरोपही तिच्यावर आहे.
तक्रारदार महिला लोअर परळ परिसरातच कुटुंबीयांसोबत राहते. त्या उच्चशिक्षित आहेत. घरात वाढता कलह, त्यात पतीच्या नोकरीतील अडचणींमुळे त्या निराश झाल्या होत्या. त्याच दरम्यान २०१६ मध्ये मैत्रिणीने त्यांना गुरु माँबाबत सांगितले. बावला कम्पाउंड परिसरात गुरू माँ राहते. त्यानुसार, तक्रारदार महिलेने गुरू माँकडे धाव घेतली. ‘१२ वर्षांच्या तपामुळे दैवी शक्ती प्राप्त झाली असून माझा साईबाबांशी थेट संपर्क असतो,’ असे सांगून तिने महिलेचा विश्वास संपादन केला.
महिलसेह तिच्या पतीच्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे संसारात अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यासाठी जादूटोणा, करणीद्वारे दोष मिटवावे लागतील, असे सांगून पूजापाठ सुरू केले. सुरुवातीला महिलेच्या घरी जात, तिने विधी सुरू केले. विधीदरम्यान फीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू केले. हळूहळू दागिने, भेटवस्तू घेऊ लागली. विधीदरम्यान महिलेसोबत अश्लील वर्तन वाढले. चार वर्षांत विविध कारणे पुढे करत, विविध विधींच्या नावे महिलेकडून दागिने, पैसे, महागडे कपडे अशा तब्बल १२ लाख ७५ हजार ९०० रुपयांचा ऐवज गरु माँने लुबाडला. यात दिवसेंदिवस तिच्या अपेक्षा वाढत असल्याने अखेर संशय आल्याने महिलेने सोमवारी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तपासादरम्यान गुरु माँचा प्रताप समोर येताच तिच्याविरुद्ध गुरुवारी रात्री विनयभंग, फसवणूक, महाराष्ट्र नरबळी व अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, रात्री तिला अटक करण्यात आली. शुक्रवारी तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
>‘तुमचीही फसवणूक झाली असल्यास पुढे या’
गुरू माँ गेल्या अनेक वर्षांपासून जादूटोणा, पूजाविधी करत अनेकांची फसवणूक करत आहे. तिच्याकडे जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. गरजूंचा विश्वास संपादन केल्यानंतर विविध विधींच्या नावाखाली त्यांच्याकडून ती पैशांसह महागड्या वस्तू घेत असे. त्यानंतर त्यांना धमकावत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
>व्हिडीओ क्लिपद्वारे धमकावल्याचा संशय
गुरु माँने या प्रकरणात व्हिडीओ क्लिपद्वारे महिलेचे अश्लील फोटो काढून त्याद्वारे धमकावल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Gurumala arrested for witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.