गायकवाड की मुणगेकर? काँग्रेसमध्ये पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:39 AM2019-02-11T02:39:16+5:302019-02-11T02:39:31+5:30

अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणारा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा प्रत्येक उमेदवाराची दमछाक करणारा मतदारसंघ.

 Gaikwad or Mungekar? The screw in the Congress | गायकवाड की मुणगेकर? काँग्रेसमध्ये पेच

गायकवाड की मुणगेकर? काँग्रेसमध्ये पेच

Next

- गौरीशंकर घाळे

अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणारा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा प्रत्येक उमेदवाराची दमछाक करणारा मतदारसंघ. धारावीच्या दाट झोपडपट्टीपासून दादर प्रभादेवीचा उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती. कोळीवाड्यांपासून अणुशक्तीनगर व चेंबूर परिसरातील भलेमोठे रासायनिक वगैरे प्रकल्प या मतदारसंघात मोडतात. तर, पंजाबी-सिंधी, धारावी व माटुंगा परिसरातील दक्षिण भारतीयांची वस्ती, दादर- प्रभादेवी - बीडीडी चाळीतील मराठी पट्टा, या साऱ्यात मिळेल तिथे विसावलेला उत्तर भारतीय समाज. बहुपेडी-बहुरंगी भारताचे जणू प्रतिबिंबच. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड यांचा १ लाख ३८ हजार मतांच्या आघाडीने पराभव केला होता. महापालिका नगरसेवक, स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाचा अनुभव, शिवसेनेची संघटनात्मक जाळे आणि मोदी लाट राहुल शेवाळे यांच्यासाठी जमेच्या ठरल्या.
आगामी निवडणुकीत शेवाळेच शिवसेनेचे उमेदवार असतील, हे आता नक्की झाले आहे. स्थायी समिती आणि पालिकेत रमलेले शेवाळे खासदार बनल्यावर मात्र राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. मुंबईत प्रभाव असणारे अनेक नेते दिल्लीच्या राजकारणात हरवून जातात. मतदारसंघातील संपर्क तुटत जातो. शेवाळे यांच्या बाबतीत सुरूवातीला असेच चित्र होते. तरीही या कालावधीत दिल्लीतील विविध मंत्रालयांशी शेवाळे यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले. मतदारसंघातील विविध विषयांवर अलीकडच्या काळात त्यांना मोठा फायदा झाला. शिवसेनेचा खासदार असून केंद्रातील भाजपा मंत्र्यांकडे विषय मार्गी लावणाºया निवडकांमध्ये त्यांचा समावेश होतो.
युतीच्या जागावाटपात ही जागा कायमच शिवसेनेकडे राहीली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेने मोठ्या मनाने ही जागा आरपीआयसाठी सोडावी, असे सांगत कार्यकर्त्यांचे मेळावेही आठवले यांनी घेतले. मतदारसंघात जनसंपर्क कार्यालयेही उघडली. परंतु, शिवसेना भवन, शिवाजी पार्क, महापौर निवास आताचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, सिद्धीविनायक मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक अशा शिवसेनेला भावनिकदृष्टया जवळच्या वास्तू मतदारसंघात आहेत. त्यामुळे शिवसेना आपला हक्क सोडेल अशी स्थिती नाही. आठवले यांनी युतीत बिघाडी झाल्यानंतर भाजपासोबत जाणे पसंद केले. त्यामुळे त्यांच्यासाठी शिवसेना हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता नाही. स्थानिक पातळीवर ताकद वाढली असली तरी भाजपाकडे खासदारकीसाठी उमेदवार नाही. युती झालीच नाही तर भाजपा आठवलेंसाठी ही जागा सोडण्याची शक्यता अधिक आहे.
काँग्रेसमध्ये माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह भालचंद्र मुणगेकर, राजन भोसले यांची नावे चर्चेत आहेत. गायकवाड यांच्या कन्या आमदार वर्षा गायकवाड यांच्याही नावाची काही काळ चर्चा होती. एकनाथ गायकवाड यांच्याऐवजी मुणगेकरांना उमेदवारी द्यावी, यासाठी जोराचे प्रयत्न सुरू आहेत. माजी कुलगुरू, राज्यसभेचे खासदार राहिलेले मुणगेकर एक अभ्यासू, उच्चशिक्षित दलित चेहरा म्हणून पक्षासाठी उपयोगी ठरू शकतात, असा तर्क दिला जात आहे. धारावी आणि दलित वस्त्यांमध्ये असलेला थेट संपर्क एकनाथ गायकवाड यांच्यासाठी जमेची
बाजू आहे. याच जोरावर मनोहर जोशींचा पराभव करत ते जायंट किलर ठरले होते. खासदार म्हणून धारावी आणि दलित पट्टयाबाहेर संपर्क वाढविण्याचे त्यांच्याकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. आजही
यात विशेष बदल झाला नाही. काँग्रेससमोर सध्या गायकवाड की मुणगेकर हा तिढा आहे.

सध्याची परिस्थिती
धारावीच्या दाटीवाटीत उद्योगांचे जाळे आहे. नोटाबंदी, गोवंश हत्या बंदी सारख्या निर्णयांमुळे या उद्योगधंद्याना फटका बसला आहे.
तेल व रासायनिक प्रकल्पांमुळे चेंबूर, अणूशक्ती नगर परिसरातील प्रदुषणाचा प्रश्न गंभीर आहे. वाहतूककोंडीने त्यात भरच घातली.
मागील निवडणुकीत मनसेने तिसºया क्रमांकाची मते घेतली. यंदा त्यांचे तळ्यातमळ्यात सुरू आहे. आदित्य शिरोडकर यांचे फ्लेक्स्, बॅनर सध्या विरळ होत आहेत.
छोटे पक्ष व अपक्ष मोठ्या पक्षांची गणिते बिघडवू शकतात. अशा उमेदवारांसाठी हा पोषक मतदारसंघ आहे.

Web Title:  Gaikwad or Mungekar? The screw in the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.