इकोफ्रेंडली तिरंगा विक्रीतून शाळेसाठी निधीसंकलन, विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:51 PM2019-01-14T15:51:24+5:302019-01-14T15:51:39+5:30

२६ नोव्हेंबरचा प्रजासत्ताक दिन असो वा, १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन, आबालवृद्धांना देशाचा राष्ट्रध्वज-तिरंगा हवाच असतो.

Funding for the school from EcoFrenlandly Tricolor sale, unique program of students | इकोफ्रेंडली तिरंगा विक्रीतून शाळेसाठी निधीसंकलन, विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

इकोफ्रेंडली तिरंगा विक्रीतून शाळेसाठी निधीसंकलन, विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

Next

मुंबई : २६ नोव्हेंबरचा प्रजासत्ताक दिन असो वा, १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन, आबालवृद्धांना देशाचा राष्ट्रध्वज-तिरंगा हवाच असतो. पण दुस-या दिवशीच हा तिरंगा रस्त्याच्या एका कडेला पडलेला असतो. अनवधानाने होणारा हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे. हा अपमान रोखण्यासाठी सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एक शक्कल लढवली आणि त्यातून निर्माण झाला- इकोफ्रेण्ड्ली तिरंगा. रविवारी सायंकाळी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात हा इकोफ्रेण्ड्ली तिरंगा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

डी. एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे संजय खंदारे यांच्या कल्पनेतून 'एक झेंडा हिरवळीचा' हा उपक्रम आखण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती देताना संजय खंदारे म्हणाले, "हा तिरंगा संपूर्णपणे इकोफ्रेण्ड्ली कागदापासून बनवण्यात आलेला आहे. तिरंगा हातात पकडण्यासाठी लाकडाच्या काडीऐवजी कागदी स्ट्रॉचा वापर केला असून या पोकळ स्ट्रॉमध्ये वांग, भेंडी यांसारख्या भाजा किंवा गुलाब, सूर्यफूल, मोगरा यांसारख्या फुलांच्या बिया व खत टाकलेलं आहे. त्यामुळे हा झेंडा कुंडीत लावल्यास त्यातून झाड उगवेल. त्यामुळे तिरंग्याचा होणारा अपमान आपोआपच रोखला जाईल."

"शाळेतील विद्यार्थ्यांना हा इकोफ्रेण्ड्ली तिरंगा बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात असून, हस्तकलेच्या वर्गात विद्यार्थी हा झेंडा बनवतील. त्यानंतर इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना इकोफ्रेण्ड्ली तिरंगा विक्रीचं महत्व समजावून सांगण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असून खासगी तसंच कॉर्पोरेट कंपन्या, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये हे विद्यार्थीच इकोफ्रेण्ड्ली तिरंग्याचं सेल्स आणि मार्केटिंग सांभाळतील", अशी माहिती शिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला २० हजार इकोफ्रेण्ड्ली तिरंग्यांच्या विक्रीचं उद्दीष्ट्य असल्याचंही राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, या इकोफ्रेण्ड्ली तिरंग्याच्या संकल्पनेचं जागतिक पेटंट घेण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असं संजय खंदारे यांनी आवर्जून सांगितलं.
.......
मराठी शाळांना आज निधीची गरज आहे. लोकोपयोगी उपक्रम राबवून शाळेसाठी निधीसंकलन कसं करता येईल, हा विचार करत असताना 'एक झेंडा हिरवळीचा' या उपक्रमाचा जन्म झाला. या उपक्रमातून होणारा नफा आम्ही शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी आमचं योगदान म्हणून देणार आहोत.
- संजय खंदारे, माजी विद्यार्थी
.......
शाळेचे अनेक माजी विद्यार्थी निधी उभारणीसाठी शाळेला मदत करत आहेत. अनेक नवनव्या कल्पना राबवण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. कल्पक उपक्रम राबवण्यासाठी माजी विद्यार्थी त्यांची नोकरी-धंदा सांभाळून शाळेला वेळ देतायत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल

Web Title: Funding for the school from EcoFrenlandly Tricolor sale, unique program of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.