आमदारकीसाठी इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:06 AM2019-04-05T01:06:19+5:302019-04-05T01:06:37+5:30

जनसंपर्क वाढवण्याची तयारी : लोकसभा निवडणूक पहिली परीक्षा

Frontline corporation's desire for MLAs | आमदारकीसाठी इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी

आमदारकीसाठी इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी

Next

शेफाली परब-पंडित 

मुंबई : उमेदवारी अर्ज दाखल होऊ लागताच गल्लीबोळांत सुरू असलेला प्रचारही आता जोर धरू लागला आहे. कुठे पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर कुठे बालेकिल्ला राखण्याची धडपड सुरू आहे. मतदारसंघात कशीही परिस्थिती असली तरी आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवकांसाठी लोकसभा निवडणूक ही पहिली परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ईशान्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदाराचा पत्ता साफ करून मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. नगरसेवकपदावरून थेट लोकसभेची तिकीट म्हणजे नगरसेवकाचे डबल प्रमोशनच म्हणावे लागेल. २०१४मध्ये शिवसेनेने नगरसेवकपदी असलेले राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले आणि ते निवडूनही आले. पक्षातील त्यांचे वजन आणि निवडणुकांमधील त्यांची कामगिरी यामुळेच ही संधी त्यांच्याकडे चालून आल्याचे बोलले जाते. त्यामुळे विधानसभेसाठीही अशीच संधी चालून येईल, अशी ज्येष्ठ नगरसेवकांना आशा आहे.

विधानसभेत आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेनेतील एका ज्येष्ठ नगरसेवकाने गेल्या काही महिन्यांपासून आपल्या इच्छुक मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही पदरात काही न पडल्यामुळे या वेळेस आमदारकीचे तिकीट मिळवायचेच, या इराद्याने शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नगरसेवक कामाला लागले आहेत. तर मनसेतून शिवसेनेत आलेल्या ज्येष्ठ नगरसेवकाचीही धडपड सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत चार स्वपक्षीय नगरसेवक विजयी झाल्यामुळे भाजपतील दुसऱ्या फळीतील नगरसेवकही तेच लक्ष्य ठेवून मतदारसंघात कामाला लागले आहेत.

२०१४ या विधानसभा निवडणुकीत मनीषा चौधरी (दहिसर), अमित साटम (अंधेरी पश्चिम), तमील सेल्वन (सायन कोळीवाडा), विद्या ठाकूर (गोरेगाव) असे भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. तर भांडुपमधून शिवसेनेचे अशोक पाटील आणि दिंडोशीतून सुनील प्रभू विजयी झाले होते.

कार्यकर्ते व सर्वसामान्यांसोबत सतत संपर्क
च्विकासकामांबरोबरच जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्कच निवडणुकीत जमेची बाजू ठरत असते. तळागाळातील कार्यकर्ते आणि प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांबरोबर नगरसेवक सतत संपर्कात असतो. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मते आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी नगरसेवकाचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो, असे जाणकारांचे मत आहे.
च्एका लोकसभा मतदारसंघात किमान ३६ नगरसेवक असतात. प्रभागातील नागरी कामे, सेवा-सुविधा यामुळे नगरसेवक घरोघरी पोहोचलेला असतो. या नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागातील जनसंपर्क व त्यांचे काम पक्षाच्या उमेदवाराला मत खेचून आणून शकतात. त्यामुळे नगरसेवकांवर विशेष जबाबदारी देण्यात येते. त्या त्या मतदारसंघातील ज्येष्ठ, अनुभवी व पक्षात चांगले वजन असलेल्या नगरसेवकांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येते.

Web Title: Frontline corporation's desire for MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.