मुंबापुरीची दैनापुरी! आणखी चार दिवस जोरदार पावसाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:50 AM2018-07-10T06:50:45+5:302018-07-10T06:51:18+5:30

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारीही मुंबई-ठाण्याला झोडपले. रस्त्यांत कमरेपर्यंत साचलले पाणी, वाहतुकीची कोंडी व लोकलच्या खोळंब्यामुळे मुंबईकरांच्या नाकीनऊ आले.

Four more days in the rainy | मुंबापुरीची दैनापुरी! आणखी चार दिवस जोरदार पावसाचे

मुंबापुरीची दैनापुरी! आणखी चार दिवस जोरदार पावसाचे

Next

मुंबई : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारीही मुंबई-ठाण्याला झोडपले. रस्त्यांत कमरेपर्यंत साचलले पाणी, वाहतुकीची कोंडी व लोकलच्या खोळंब्यामुळे मुंबईकरांच्या नाकीनऊ आले. आजच्या पावसाने मुंबापुरीची पार दैनापुरीच झाली.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईकरांचे हाल झाले. लोकलला गर्दी व त्यात पाऊस, अशी कसरत करत लोक कामावर पोहोचले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या. त्यातच मुंबईतील रस्त्यांवर तळे साचल्याचे दृश्य होते. त्यामुळे रस्ते वाहतुकीची कोंडी झाली. मुंबईत सोमवारी कुलाबा येथे १७०.६ मिमी तर सांताक्रुझ येथे १२२ मिमी पावसाची नोंद झाली.
दोन्ही हायवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी मार्ग, एस.व्ही. रोड, घाटकोपर येथील असल्फा रोड, सांताक्रुझ येथील मिलन सबवे, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह रेल्वे स्थानकांच्या परिसरात साचलेल्या पाण्याने मुंबईचा वेग मंदावला. कुर्ला ते सायनदरम्यानच्या रुळांवरील पाण्यामुळे मध्य रेल्वे रखडली. पश्चिम रेल्वेच्या लोकल २०-२५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. हार्बर रेल्वेमार्गावरही टिळकनगर, चेंबूर व मानखुर्द येथे साचलेल्या पाण्यामुळे सेवा काही काळ कोलमडली होती.

‘लोकल’चे तीनतेरा

चार दिवसांपासून पडणाºया पावसामुळे लोकल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. सोमवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण १८७ लोकल फेºयांना फटका बसला.
१०० लोकल फेºया विलंबाने धावल्या. शुक्रवारी मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. शनिवारी कल्याण-कर्जत मार्गावरील रेल्वेरुळ पाण्याखाली गेले होते. रविवारी घाटकोपर येथील पुलाला तडे गेल्यामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक खंडीत केली होती.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग ठप्प
पालघर जिल्ह्यातील माळजी पाडा येथे पावसाचे पाणी साचल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी पाणी वाढल्याने महामार्ग ठप्प झाला होता.

तुळशी तलाव भरला
जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुळशी तलाव सकाळी साडेसात वाजता भरून वाहू लागला आहे़

१० ते १३ जुलैदरम्यान उत्तर कोकण म्हणजे मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील.
१० ते १३ जुलैदरम्यान दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल.
१० ते १३ जुलैदरम्यान उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.
मंगळवारी मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविले
अतिवृष्टीने वसई येथे पाणी वाढले. ते मिठागर परिसरात घुसल्याने ४०० रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मिठागर भागातील १०० जणांनाही सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

मुले शाळेत गेल्यावर सुटी!
विद्यार्थी सकाळी शाळेत गेल्यावर शाळांना सुटी जाहीर केली. त्यामुळे दुपारच्या शाळांना सुटी मिळाली. सकाळी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचे परतताना हाल झाले.

Web Title: Four more days in the rainy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.