फिल्मसिटीतील वन्यप्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 01:43 AM2019-01-05T01:43:18+5:302019-01-05T01:43:35+5:30

गोरेगाव फिल्मसिटीजवळच्या जंगलात बिबट्या आणि सांबर मृतावस्थेत आढळले होते. या प्रकरणी वनविभाग आणि फिल्मसिटीच्या सुरक्षा व्यवस्थेने केलेल्या तपासादरम्यान शुक्रवारी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

 Five people arrested for the death of wild animals in filmcity | फिल्मसिटीतील वन्यप्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक

फिल्मसिटीतील वन्यप्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक

Next

मुंबई : गोरेगाव फिल्मसिटीजवळच्या जंगलात बिबट्या आणि सांबर मृतावस्थेत आढळले होते. या प्रकरणी वनविभाग आणि फिल्मसिटीच्या सुरक्षा व्यवस्थेने केलेल्या तपासादरम्यान शुक्रवारी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मोहन भोये (२०), दशरथ हबाळे (३२), अनिल भोये (३२), राहुल हबाळे (२५) आणि गणपत दळवी (३१) या आरोपींना ठाणे वनविभागाने अटक केली. त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२च्या कलमानुसार आणि जैवविविधता अधिनियम, २००२चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी सापळे लावल्याची कबुली आरोपींना दिली.
खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी राहुल हबाळे याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अन्य काही नावे उघडकीस आल्यावर, अनिल भोये आणि गणपत दळवी या दोघांना काम करत असलेल्या गोरेगाव येथील इंदिरा गांधी संशोधन व विकास संस्थान येथून ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींची स्वतंत्र चौकशी केली असता, अजून दोन संशयितांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर, दशरथ हबाळे आणि मोहन भोये यांना वनविभागाने ताब्यात घेतले.
या प्रकरणी पुढील तपास ठाणे वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई करीत आहेत. दरम्यान, बुधवारी वनविभागाने फिल्मसिटी परिसरात केलेल्या शोध मोहिमेत विविध भागात २८ सापळे आढळून आले होते, तसेच गुरुवारी जंगलात वनविभागाला तपासादरम्यान अजून दोन सापळे सापडले.

मृत मादी बिबट्याची ओळख पटली
फिल्मसिटीमध्ये सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या मादी बिबट्याची ओळख पटली आहे. ही मादी ‘एल-२८’ असून, तिचे नाव ‘पाणी’ आहे. वनविभाग २०१५ सालापासून या मादीवर लक्ष ठेवून होता. तेव्हापासून तिचे वास्तव फिल्मसिटीच्या जंगल परिसरात होते. गेल्या वर्षी कॅमेरा ट्रॅप मोहिमेमध्ये ही मादी आपल्या पिल्लासोबत आढळली होती. गेल्या वर्षीच्या बिबट्या गणना प्रकल्पामध्ये या मादीकडून कुत्र्याची शिकार होतानाचे छायाचित्र कैद झाले होते, अशी माहिती वन्यजीव संशोधक निकित सुर्वे यांनी दिली.

Web Title:  Five people arrested for the death of wild animals in filmcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई