खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती, तोतया पोलीस जाळ्यात, कांदिवलीतील घटना

By मनीषा म्हात्रे | Published: April 7, 2024 06:30 PM2024-04-07T18:30:28+5:302024-04-07T18:30:41+5:30

मुंबई : कांदिवलीत पोलीस असल्याची बतावणी करून एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...

Fear of being implicated in a false crime, fake police arrested, incident in Kandivali | खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती, तोतया पोलीस जाळ्यात, कांदिवलीतील घटना

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती, तोतया पोलीस जाळ्यात, कांदिवलीतील घटना

मुंबई: कांदिवलीत पोलीस असल्याची बतावणी करून एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.

कांदिवलीतील रहिवासी असलेले सारंग फडणीस (४४)  यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे. सारंग हे लेक्चरर म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी सव्वा पाच ते पावणे सहाच्या दरम्यान कांदीवली फाटक ब्रिज जवळ ही घटना घडली. या कारवाईत पोलिसांनी मुलायम बिरबल यादव (२७), मनोज दशरथ गुप्ता (६०) या दोघांना अटक केली आहे. दोघेही नालासोपारा येथील रहिवाशी आहे. गुप्ता हा अभिलेखावरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात १६ गंभीर गुन्हे नोंद आहे.

फडणीस हे शनिवारी सायंकाळी फाटक रेल्वे ब्रिज परिसरातून जात असताना या दुकलीने त्यांना अडवले. पोलीस असल्याचे सांगून चौकशी करण्यास सुरुवात केली. बोरीवली पोलीस ठाण्याच्या हददीत घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगून त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवले. तसेच, गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच आरोपीने त्यांच्याकडील बॅग हिसकावून त्यातील किंमती ऐवज काढून घेतला.  अखेर, फडणीस यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या मदतीने दुकलीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलीस अधिक तपास करत आहे. 

Web Title: Fear of being implicated in a false crime, fake police arrested, incident in Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई